Sunday, October 26, 2025
Happy Diwali

कोरोना रुग्ण सापडताच संपूर्ण उत्तर कोरिया लॉकडाऊन

कोरोना रुग्ण सापडताच संपूर्ण उत्तर कोरिया लॉकडाऊन

प्योंगयांग : उत्तर कोरियाने एक कोरोना रुग्ण आढळल्यानंतर संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याची घोषणा किम जोंग उन यांनी केली आहे. कोरोना महामारी सुरू झाल्यानंतर दोन वर्षांनी प्रथमच उत्तर कोरियात कोरोना बाधित आढळून आला आहे. या पहिल्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर किम जोंग उन यांनी गुरुवारपासून देशभरात कडक निर्बंधांसह अनिश्चित काळासाठी लॉकडाऊन लागू केला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी किम जोंग उन यांनी प्रशासनाला कोविड-१९ प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, राजधानी प्योंगयांगमध्ये काही नागरिकांची कोविड चाचणी करण्यात आली. यामध्ये एका व्यक्तीला कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटची लागण झाल्याचे आढळून आले. या रुग्णाला तात्काळ विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले असून त्याच्यावर योग्य ते उपचार सुरू करण्यात आले आहेत.

रिपोर्टनुसार, प्योंगयांगमधील काही लोक ओमायक्रॉनच्या संपर्कात आले होते. यावेळी लोकांची नेमकी संख्या किंवा कोणत्या माध्यमातून त्यांना संसर्ग झाला याची माहिती उघड करण्यात आलेली नाही. ८ मे रोजी संसर्ग झालेल्या लोकांचे नमुने गोळा करण्यात आले होते.

Comments
Add Comment