स्वाती पेशवे
पं. शिवकुमार शर्मा यांनी संतूर या वाद्याला देशाच्याच नव्हे, तर जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं. त्यांच्या अभ्यासपूर्वक साधनेनं आणि तरल अभिव्यक्तीनं हे वाद्य सर्वसामान्यांना परिचित झालं. लोकांना त्यातील गोडवा समजला आणि बघता बघता त्याचा नाद लागला. असं हे आपल्या मनस्वी वादनानं लळा लावलेलं उत्तुंग व्यक्तिमत्त्व आता हरपलं आहे. त्यांची उणीव कधीही भरून येण्याजोगी नाही.
प्रख्यात संतुरवादक पं. शिवकुमार शर्मा यांच्या निधनानं झालेलं दु:ख आणि संगीतविश्वाची झालेली हानी शब्दांमध्ये वर्णन करता येण्याजोगी नाही. संतूर आणि शिवकुमार हे एक अद्वैत आहे. सतार म्हटलं की, रवीशंकर आणि विलायत खान नजरेसमोर येतात, सनई म्हटलं की, बिस्मिल्ला खान समोर येतात तसंच संतूर म्हटलं की, डोळ्यांसमोर येणारा चेहरा पं. शिवकुमार शर्मांचा असतो. या दिग्गजांबरोबर अन्य काही नावंदेखील त्या त्या वाद्यांशी संबंधित असली तरी या लोकांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली, ती स्वत:च्या अलौकिक प्रतिभेच्या बळावर… पं. शिवकुमार शर्मा यांनी संतूर या वाद्याला देशाच्याच नव्हे, तर जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवलं. त्यांच्या अभ्यासपूर्वक साधनेनं आणि तरल अभिव्यक्तीनं हे वाद्य सर्वसामान्यांना परिचित झालं. लोकांना त्यातील गोडवा समजला आणि बघता बघता त्याचा नाद लागला. असं हे आपल्या मनस्वी वादनानं लळा लावलेलं उत्तुंग व्यक्तिमत्त्व आता हरपलं आहे. त्यांची उणीव कधीही भरून येण्याजोगी नाही.
आपल्या वडिलांकडून म्हणजेच पं. उमादत्त शर्मा यांच्याकडून शिवजींनी संगीताचे धडे गिरवले. बनारस घराण्याचे पं. उमादत्त शर्मा सगळी वाद्ये वाजवत असत, खेरीज ते उत्तम गात असत. शिवजी त्यांच्याकडूनच तबला शिकले. ते आकाशवाणीवर साथीला असायचे. हिराबाई, भीमसेनजी यांच्यासारख्या दिग्गज गायकांना त्यांनी तबल्याची साथ केली आहे. थोडक्यात सांगायचं, तर सुरुवातीला तबल्यावरच त्यांची हुकूमत होती. त्यामुळेच ते उत्तम तबलवादक होणार, अशीच काहींची अटकळ होती. पण वडिलांनीच त्यांच्या हातात संतूर दिलं आणि या वाद्यानं त्यांना वेड लावलं. पुढचा इतिहास आपण सगळेच जाणतो.
१९५४-५५ च्या सुमारास ते मुंबईत आले. ‘झनक झनक पायल बाजे’ या व्ही. शांताराम यांच्या चित्रपटासाठी त्यांनी प्रथम संतूर वाजवलं. त्याआधी चित्रपट संगीतात संतूर कधीच वापरलं गेलं नव्हतं. हे काश्मीरचं वाद्य आहे. त्याचं मूळ पर्शियन आहे. तिकडे सुफी संगीतामध्ये ते वापर जातं. पण वर उल्लेख केलेल्या चित्रपटाच्या संगीतकारांनी म्हणजेच वसंत देसाई यांनी हे वाद्य ऐकून त्याला आपल्या संगीतात समाविष्ट केलं. ते लोकांना इतकं आवडलं की, पुढे ते चित्रपटसंगीताचा एक भाग बनून राहिलं. अर्थात तेव्हाचं संतूर आणि आताचं संतूर यात फरक आहे. कारण कालौघात शिवजींनी या वाद्यात आवश्यक ते बरेच बदल घडवून आणले. शास्त्रीय संगीतामध्ये आठ अंग असतात. त्या अंगांमध्ये मिंड हे एक अंग असतं. मिंड सतारीमध्ये येते, सारंगीत येते पण अधी ती संतूरमध्ये नव्हती. त्यामुळे शास्त्रीय संगीतविश्वानं हे वाद्य अव्हेरलं होतं. त्याला या संगीतात मान्यता दिली गेली नव्हती. पण ही उणीव भरून काढण्यासाठी शिवजींनी प्रचंड काम केलं, संशोधन केलं आणि वाद्यामध्ये योग्य ते बदल घडवून आणले. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच पुढे शास्त्रीय संगीतविश्वालाही या वाद्याची दखल घ्यावी लागली.
मी शिवजींना प्रथम १९६४ मध्ये पाहिलं. पं. जगन्नाथबुवा पुरोहित यांच्या एकसष्टीच्या कार्यक्रमात त्यांनी वाजवलं होतं. त्यावेळी ते साधारणत: तिशीचे असतील. तेव्हाच त्यांचं व्यक्तिमत्त्व, त्यांचं आदबशीर वर्तन आणि अर्थातच बहारदार वादन याची छाप मनावर पडली होते. त्यानंतर सायनला ‘वल्लभ संगीतालया’त मी त्यांचे अनेक कार्यक्रम ऐकले. तो काळ त्यांच्या कारकिर्दीच्या जडणघडणीचा होता. मात्र तेव्हापासूनच त्यांची छबी अत्यंत प्रभावशाली अशीच राहिलेली आहे. कलाकारानं मौन पाळणं, वाजवी बोलणं अत्यंत महत्त्वाचं असते. ही बाब शिवजींनी कायम पाळली. पाल्हाळ न लावता ते अतिशय मोजकं बोलायचे. इंग्रजी आणि इतिहास या विषयांमध्ये द्विपदवीधर असणाऱ्या शिवजींची बुद्धी अतिशय तल्लख होती. ऊर्दू, इंग्रजी, हिंदी भाषेवर त्यांचं कमालीचं प्रभूत्व होतं. या गुणांनीही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अनोखा उजाळा मिळवून दिला.
१९६८मध्ये रविशंकरजींनी २५ ते ३० कलाकारांना घेऊन अमेरिकेचा दौरा आयोजित केला होता. शिवजी, हरीजी, कार्तिक कुमार, रामनारायणजी, अभिषेकीबुवा आदींचा त्यात समावेश होता. शिवजी कायम त्या दौऱ्याची आठवण सांगायचे. त्या दौऱ्यामुळेच खऱ्या अर्थानं ‘संतूरचे राजदूत’ अशी त्यांची ओळख निर्माण झाली. या दौऱ्यामध्ये त्यांनी संतूरचा प्रसार केला आणि योग्यरीत्या जगाला या वाद्याची ओळख घडवली. थोडक्यात परदेशात हे वाद्य लोकप्रिय होण्यास हा दौरा साह्यभूत ठरला आणि तेव्हापासून संतूर वादनाच्या नव्या अध्यायाची सुरुवात झाली.कलेसाठी कला करणाऱ्या कलाकारांमधील एक नाव म्हणजे पं. शिवकुमार शर्मा! कलेवर नितांत प्रेम करणारे ते मनस्वी कलाकार होते. त्यांनी केवळ कार्यक्रम केले नाहीत, तर कायमच कलेप्रतीची वचनबद्धता जपली. पं. रविशंकर, माझे वडील, अभिषेकी, कुमार गंधर्व, भीमसेनजी, किशोरी अशा कलेसाठी जगणाऱ्या पिढीतल्या लोकांमधले ते एक होते. नाव, प्रसिद्धी, पैसा ही सगळी ‘बाय प्रॉडक्ट’ असतात. पण मुळात कलाकारानं कलेसाठी जगावं लागतं. प्रत्येक कार्यक्रमासाठी आपल्यातील शंभर टक्के देण्याची इच्छा आणि क्षमता त्याच्यामध्ये असावी लागते. शिवजींमध्ये ती ठासून भरलेली होती.
एकवेळ अहिर भैरवसारखा राग ठीक आहे, पण शुद्ध सारंग, जोग कंस यासारखे राग संतूरवर योग्य त्या प्रभावानिशी वाजवणं अतिशय कठीण आहे. पण शिवजींनी ही कठीण बाबही सहजसाध्य करून दाखवली. अर्थातच यामध्ये त्यांचा रियाज, चिंतन, मनन आणि स्वत:चे विचार-योगदान या सगळ्याचीच मदत झाली. यात ते कुठेच कमी पडले नाहीत. पाठ केलेलं गाणंं व उत्स्फुर्तपणे गायलेलं गाण यात फरक असतो. कुठलीही गोष्ट प्रथम पचवावी लागते, ती मनात उतरावी लागते. त्यातही शास्त्रीय संगीतात प्रावीण्य मिळवणं हे अत्यंत आव्हानात्मक काम आहे. प्रत्येक कार्यक्रम हे कलाकारासाठी एक नवं आव्हान असतं. शिवजींनी हे आव्हान लिलया पेललेलं दिसतं. मी त्यांच्याकडून एक एक राग दोन-तीन वेळाही ऐकला आहे. पण तो ऐकताना कधीच ती आधीची पुनरावृत्ती असल्याचं जाणवलं नाही. खरं सांगायचं, तर हेच कलाकाराचं सर्वात मोठं योगदान असतं.
कला सादर करणं हा आत्मानंद असतो, अभिव्यक्ती असते त्याचबरोबर ती रसिकांप्रती असणारी बांधिलकीदेखील असते. शिवजींनी या बांधिलकीचाही नेहमीच आदर केला. तिकीट काढून ऐकायला येणाऱ्या प्रेक्षकांना आपल्यातील सर्वोत्तम दिलं पाहिजे, असं ते नेहमी म्हणायचे. आता ही बांधिलकी जपणारी काही मोजकी नावं राहिली आहेत, याचं वाईट वाटतं. आता लोक प्रसिद्धीच्या मागे लागले आहेत. पण प्रसिद्धी मिळवण्यासाठी आधी सिद्धी प्राप्त करावी लागते, हे त्यांच्या लक्षात येत नाही. संगीत हा धर्म बनवल्याशिवाय, त्याला शरण गेल्याशिवाय सिद्धी प्राप्त होत नाही. ही बाब समजली म्हणून शिवजींची पिढी आदर्श ठरली. प्रगतीची अनेक शिखरं पादाक्रांत करुनही त्यांचा रियाज कधी चुकला नाही. एकदा संगीताला वाहून घेतल्यानंतर साधनेसाठी पूर्ण वेळ देताना अवघा दोन-तीन तास झोप घेणारी ही पिढी होती. केवळ दोन-चार राग आले म्हणजे संगीत कळलं असं होत नाही. संगीताची व्यापकता कळण्यासाठी सातत्यानं त्यात रहावं लागतं. मनात सतत गाणं असावं लागतं. ही बाब आता कमी झाली आहे, असं म्हणण्यापेक्षा हा मार्ग दाखवणारे लोक आता कमी झाले आहेत असं मला वाटतं. वागण्या-बोलण्याप्रमाणेच कलाकाराचं मोठेपण त्याच्या अशा विचारांमध्येही असतं. त्यांच्या शारीरिक उंची आणि देखणेपणाप्रमाणेच वृत्तीतही ही सगळी वैशिष्ट्य सामावली होती. म्हणूनच त्यांच्या मुखावर एक वेगळं तेज आणि बोलकी शांतता दिसायची. लौकिकार्थानं आता ते हरपलं असलं तरी संतूरचे सूर कानी पडतील, तेव्हा तेव्हा ती शांत आणि लोभस मूर्ती नजरेसमोर तरळून जाईल. शिवजींना विनम्र आदरांजली.