इस्तांबुल (वृत्तसंस्था) : इस्तांबुलमध्ये सुरू असलेल्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये भारतीय महिलांनी धमाकेदार कामगिरी करत पुढच्या फेरीत प्रवेश केला. निखत जरीन (५२ किलो), परवीन (६३ किलो) आणि मनीषा (५७ किलो) यांनी बुधवार विजय मिळवला.
जरीनने मेक्सिकोच्या हेरेरा अल्वारेजला ५-० असे एकतर्फी पराभूत केले. परवीननेही युक्रेनच्या मारिया बोवाला ५-० असे पराभूत करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. ५७ किलो वजनी गटात मनीषाने नेपाळच्या काला थापाला झोपवत तिसऱ्या फेरीत दणक्यात प्रवेश केला. मनीषाला पहिल्या फेरीत बाय मिळाली होती.
यंदाच्या वर्षात स्ट्रैंड्जा मेमोरिअलमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्या निखतने विजयी घोडदौड कायम ठेवली. तिने पहिल्या फेरीत अल्वारेजला सहज पराभूत करत बाहेरचा रस्ता दाखवला. तेलंगणाच्या २५ वर्षीय जरीनचा सामना २०२१ आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्य पदक पटकावणाऱ्या मंगोलियाच्या लुटसाइखानी अल्तांतसेतसेगशी होणार आहे.