मुंबई : आयपीएलमध्ये अनेक खेळाडू दुखापतीमुळे संघाबाहेर होत आहेत. याआधी चेन्नईचा दीपक चहर दुखापतीमुळे संपूर्ण हंगाम खेळू शकलेला नाही. त्यात आता संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला आहे. प्ले-ऑफमध्ये पोहोचण्यासाठी संघर्ष करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जसाठी ही निश्चितच चांगली बातमी नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुसोबतच्या सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करताना तो जखमी झाला होता. दुखापतीमुळे दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या मागच्या मॅचमध्येही जडेजा खेळू शकला नव्हता.
मागच्या काही दिवसांपासून जडेजाच्या दुखापतीवर लक्ष ठेवले जात आहे. पण यात फार सुधारणा झालेली नाही. त्यामुळे चेन्नई फार धोका पत्करणार नाही कारण, त्यांचे प्ले-ऑफला पोहोचणे जवळपास अशक्य आहे. जडेजा जर आयपीएलमधून बाहेर झाला, तर हा ब्रेक त्याच्यासाठी फायद्याचा ठरू शकतो. कारण, भारताच्या आगामी मालिका तसेच टी-२० वर्ल्ड कप बघता, दुखापतीतून सावरण्यासाठी आणि गेलेला फॉर्म परत मिळवण्यासाठी त्याला ही विश्रांती फायदेशीर ठरू शकते.
जडेजासाठीही आयपीएल २०२२ निराशाजनक राहिल. त्याने १० सामन्यांत फक्त ५ विकेट घेतल्या आणि ११६ रन केले. आयपीएल सुरू व्हायच्या २ दिवस आधी जडेजाला चेन्नईचा कर्णधार करण्यात आले होते. पण जडेजाच्या नेतृत्वात चेन्नईचा लागोपाठ ४ सामन्यांमध्ये पराभव झाला. जोरदार टीका होऊ लागल्यानंतर आणि दबाव वाढल्यानंतर जडेजाने कॅप्टन्सी सोडण्याचा निर्णय घेतला होता.