Monday, July 15, 2024
Homeअध्यात्मसहनशक्ती हाच उत्तम उपाय

सहनशक्ती हाच उत्तम उपाय

सहन करणे ही मोठी तपश्चर्या आहे. तसेच ती मोठी शक्ती आहे. ती तुम्हाला संसारात सुख, शांती, समाधान व ऐश्वर्य द्यायला समर्थ आहे. आपल्यावर काही वेळेला संकटे येतात. त्यावेळी आपण घाबरून जातो. आपल्याला काहीच सुचत नाही. माणसाचा तोल जातो व संसार बिघडतो. यावेळी सहनशक्ती पाहिजे. संकंट आपल्यावर का आले? याला आपण जबाबदार आहोत की दुसरे कुणी जबाबदार आहे? या संकंटाचे मूळ काय आहे? एवढा अभ्यास केलात, तर संकंटातून पार व्हाल. इथे माणसे घाबरून जातात त्यांचा तोल जातो. काही मंडळी आत्महत्या करतात. कारण त्यांचा तोल जातो. इथे तुम्हाला तोल सांभाळता आला पाहिजे. संगीतात ताल असतो. जीवनसंगीतात तोल सांभाळता आला पाहिजे. हा तोल सांभाळता आला, तर जीवनात खूप प्रगती कराल व तुमची भरभराट होईल. गंमत म्हणजे जेव्हा व्याधी होतात, तेव्हा लोक देवाला दोष देतात किंवा आणखी कुणाला तरी दोष देतात. देवाचा कोप झाला म्हणतो पण आपल्याला व्याधी का झाली? व्याधी झाली याचा अर्थ देवाने सूचना केली की काहीतरी बिघडलेले आहे, ते दुरूस्त कर. पहिली गोष्ट आपण डॉक्टरकडे जातो.

व्याधी आपल्याला का आली याचे मूळ लक्षात घेऊन तुम्ही स्वतःला सुधारायचे व तुमच्या घरच्या लोकांना सुधारायचे. संसारात अनेक गोष्टी वाट्याला येतात तेव्हा त्यातून पार पडायचे असेल, तर सहनशक्ती हाच उत्तम उपाय आहे. ही सहनशक्ती असेल, तर संसारात तरून जाल व ही सहनशक्ती नसेल, तर संसारसागरात बुडून जाल. सहनशक्तीचा अभ्यास करायचा की न करायचा, हे तू ठरव. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. सांगायचा मुद्दा संसार वाईट नाही हे जीवनविद्या पुन्हा पुन्हा सांगते. संसार दुःखमूळ हे खरे नाही. दुःखाचे मूळ काय? तुमच्या ठिकाणी शहाणपणाचा अभाव आहे हे दुःखाचे मूळ आहे. जीवनविद्या सांगते ज्याच्याजवळ शहाणपण नाही त्याला सुखी करण्याचे सामर्थ्य ब्रम्हदेवात पण नाही. बुवा, बाबा, उदीभस्म सोडाच, पण ब्रम्हदेवातही हे सामर्थ्य नाही. शहाणपण हाच नारायण व नारायण तेथे सुख, शांती, समाधान. शहाणपणाचा एक पैलू म्हणजे सहनशक्ती आहे. समता, सभ्यता सामंजस्य, समाधान, लवचिकता, नम्रता हे शहाणपणाचे सात पैलू आहेत. या सात पैलूंपैकी एक जरी तुमच्याकडे नसेल, तरी जीवनांत प्रॉब्लेम्स निर्माण होतात. या सात पैलूंपैकी एक जरी पैलू तुम्ही आत्मसात केलात, तरी बाकीचे पैलू तिथे येतात हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. तुमच्या ठिकाणी जर नम्रता असेल, तर बाकीचे गुण तिथे येतात. अशा प्रकारे या सात पैलूंपैकी एक जरी पैलू तुम्ही आत्मसात केलात, तरी बाकीचे पैलू तिथे येतात.

– सद्गुरू वामनराव पै

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -