नवी मुंबई (वृत्तसंस्था) : जसप्रीत बुमराच्या विलक्षण गोलंदाजीमुळे प्रतिस्पर्ध्यांना अवघ्या १६५ धावांवर रोखणे मुंबईला जमले. पण दुसरीकडे कोलकाताच्या कमीन्स, साऊदी आणि सुनील नरीन या त्रिकूटाने कमालीची गोलंदाजी करत मुंबईला पराभवाचा धक्का दिला. इशन किशन वगळता अन्य फलंदाजांना आलेले अपयश मुंबईच्या पराभवाचे कारण ठरले.
कोलकाताच्या १६६ धावांच्या फारशा मोठ्या नसलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी फलंदाजीला आलेल्या मुंबईच्या फलंदाजांच्या निराशेचा कित्ता सोमवारीही कायम राहीला. सलामीवीर इशन किशनने कोलकाताच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने आपले वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले.
पण दुसऱ्या फलंदाजाकडून त्याला साथच मिळाली नाही. किशन एका बाजूला तळ ठोकून होता, मात्र दुसऱ्या बाजूला मुंबईच्या फलंदाजांना लागलेली गळती शेवटपर्यंत थांबलीच नाही. त्यामुळे १६६ धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करणे मुंबईला जमले नाही. आणि मुंबईने हा सामना ५२ धावांनी गमावला. या सामन्यातील पराभवामुळे मुंबईने ११ सामन्यांतील ९ सामने गमावले आहेत. कमीन्स, साऊदी आणि सुनील नरीन या त्रिकूटाने मुंबईच्या फलंदाजीचा कणाच मोडला. त्यामुळे मुंबईला मोठ्या फरकाने हा सामना गमवावा लागला.
प्रथम फलंदाजीला आलेल्या कोलकाताला व्यंकटेश अय्यर आणि अजिंक्य रहाणे या जोडीने चांगली सुरुवात करून दिली. व्यंकटेश अय्यरने धडाकेबाज कामगिरी केली. त्याला अजिंक्यने संयमी साथ दिली. अय्यरने २४ चेंडूंत ३ चौकार आणि ४ षटकांरांच्या जोरावर ४३ धावांची खेळी केली. रहाणेने २४ चेंडूंत २५ धावांचे योगदान दिले. कोलकाताच्या दोन्ही सलामीवीरांना बाद करण्यासाठी कार्तिकेया धाऊन आला. कार्तिकेयाने सॅम्सकरवी झेलबाद करत अय्यरचा अडथळा दूर केला. रहाणेचा त्रिफळा उडवत दुसराही बळी कार्तिकेयानेच मिळवला. त्यानंतर नितीश राणाने फलंदाजीची सूत्रे हाती घेतली. त्याला दुसऱ्या फलंदाजाकडून हवी तशी साथ मिळाली नाही. तरीही तो धावा जमवण्यात मागे पडला नाही. त्याचवेळी मुंबईने बुमराच्या रुपाने आपल्या ताफ्यातील अस्त्र बाहेर काढले.
बुमराच्या आक्रमक गोलंदाजीसमोर कोलकाताचे फलंदाज निष्प्रभ झाले. मात्र तरीही राणाला धावा काढण्यापासून रोखता आले नाही. राणाने २६ चेंडूंत ४३ धावा करत कोलकाताला सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली. रिंकू सिंगनेही नाबाद २३ धावांचे योगदान दिले. बुमराने ४ षटके अप्रतिम टाकली. त्याने केवळ १० धावा देत ५ बळी मिळवले.