Saturday, July 20, 2024
Homeसाप्ताहिककोलाजछत्रपतींच्या वेड्या शूरवीरांची गाथा लवकरच भेटीला...

छत्रपतींच्या वेड्या शूरवीरांची गाथा लवकरच भेटीला…

दीपक परब

आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या विलक्षण संघर्षमय, कठोर परिश्रमयुक्त आणि गनिमीकाव्यामुळे नाट्यमय व तितक्याच शौर्याने धगधगणाऱ्या जीवनगाथेचे वेड साऱ्यांनाच आहे. त्यांच्या जीवनातील प्रत्येक क्षण म्हणजे वीररसाने ओतप्रोत भरलेला अग्निकुंडच म्हणावा लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांवर कितीही नाट्ये, महानाट्ये आणि सिनेमे आले तरी त्या इतिहासाचा परामर्ष घेणे कुणालाही शक्य नाही. अशा महान छत्रपतींच्या स्वराज्यातील सरसेनापती प्रतापराव गुजर आणि सहा वीर यांच्या भल्या मोठ्या पराक्रमावर आधारित अशा दोन (मराठी व हिंदी) चित्रपटांची निर्मिती सध्या सुरू आहे. ज्येष्ठ दिग्दर्शक, निर्माते महेश मांजरेकर यांनी महाराष्ट्र दिनाच्या दिवशी ‘वीर दौडले सात’ आणि ‘वो सात’ या दोन सिनेमांची घोषणा केली.

मांजरेकर यांच्या या बहुचर्चित मराठी, हिंदी सिनेमांचे टीझर नुकतेच रिलीज झाले. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे काव्य आणि भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्वर्गीय सुरावटींनी ‘शिवकल्याण राजा’ या विशाल ध्वनिफितीच्या माध्यमातून शिवरायांच्या पराक्रमाची गाथा घराघरांत फार पूर्वी पोहोचली आहे. याच ध्वनिफितीमधील ‘वेडात मराठे, वीर दौडले सात’ या वीरश्रीतील गाण्याने कित्येक पिढ्यांना वेड लावले असून त्याच वीरांच्या शौर्य गाथेवर आधारित हे दोन सिनेमे तयार होत आहेत. शिवरायांच्या काळातल्या या सात वीरांच्या भीमकाय पराक्रमाचे, स्वामिनिष्ठेचे, सर्वस्व अर्पण करण्याचे दुसरे उदाहरण असूच शकत नाही. स्वराज्याचे शत्रूंपासून रक्षण करताना या सात वीरांनी बेधडकपणे आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्यावर आधारित या सिनेमांच्या टीझरमुळे शिवप्रेमी, सिनेमाप्रेमींसह साऱ्यांचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सन १६७३ मधील ही घटना असून आदिलशहाचा हुकूम घेऊन बहलोलखान हा छत्रपती शिवाजी महाराजांवर हल्ला करायला निघाला होता.

बहलोलखानचे सैन्य प्रचंड आणि महाराजांकडे तर मोजकेच मावळे होते. पण त्यांच्या आदेशाचे पालन करून सरसेनापती प्रतापराव गुजर आणि सहा वीर अगदी शत्रूवर तुटून पडले, प्राणपणाने लढले. मराठी टीझर इन्स्टाग्रामवर शेअर करत महेश मांजरेकरांनी लिहिले आहे, ‘छत्रपतींचा आदेश, वाहे सळसळत्या रक्तात, वीर वीर वीर वीर वीर वीर, दौडले सात’.बहलोलखान नावाचा आदिलशाही सरदार मराठा स्वराज्यात धुमाकूळ घालत होता. त्याच्याकडून रयतेवर अन्याय होत होता. शिवाजी महाराजांनी प्रतापराव गुजर यांना आदेश दिले की, बहलोलखानचा बंदोबस्त करावा.

मराठ्यांच्या गनिमीकाव्याने बहलोलखानला बेजार केले. वेळ पाहून तो मराठ्यांना शरणही आला होता. पण शरण आलेल्यांना मृत्यूदंड न देण्याची प्रथा हिंदुधर्मात आहे. त्यामुळे प्रतापरावांनी त्याला समज देऊन सोडून दिले. मात्र हा दगाबाज बहलोलखान पुन्हा स्वराज्यावर चालून आला. अशा दगाबाजाला सोडून दिल्याबद्दल शिवाजी महाराजांनी प्रतापरावांची चांगलीच कानउघाडणी केली. तेव्हा राजे प्रतापरावांना म्हणाले होते की, बहलोलखानाला पकडल्याशिवाय मला तोंड दाखवू नका. शिवरायांचे हे वाक्य गुजर यांच्या जिव्हारी लागले.

त्यांनी आपल्या सहा सहकाऱ्यांसोबत कूच केली. या सात वीरांमध्ये होते विसाजी बल्लाळ, दीपोजी राऊतराव, विठ्ठल अत्रे, कृष्णाजी भास्कर, सिध्दी हिलाल आणि विठोजी शिंदे. शौर्याच्या वेडात हे सात वीर बहलोलखानावर तुटून पहले. अखेर त्या सात शूरवीरांना यशस्वी होण्यासाठी जीव गमवावा लागला. प्रतापराव गुजरांची भूमिका महेश मांजरेकर साकारणार आहेत. पण इतर सहा वीर आणि शिवाजी महाराज कोण साकारणार, हे अजून गुलदस्त्यात आहे. हे सिनेमे येत्या दिवाळीत रिलीज होणार आहेत.

parabdeepak191@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -