Sunday, July 6, 2025

हैदराबाद-बंगळूरुत प्लेऑफसाठी चुरस

हैदराबाद-बंगळूरुत प्लेऑफसाठी चुरस

मुंबई (प्रतिनिधी) : सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु या दोन्ही संघांसाठी रविवारी होणारा सामना महत्त्वपूर्ण असणार आहे. प्लेऑफची घोडदौड जोरात सुरू झाली असून या दोन संघांमध्ये सामना जिंकण्यासाठी चुरस आहे.


रविवारी आयपीएल सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि सनरायझर्स हैदराबाद आमने-सामने येतील, तेव्हा सर्वांच्या नजरा सध्या खराब फॉर्मशी झुंज देणारे दोन महान फलंदाज विराट कोहली आणि केन विल्यमसन यांच्यावर असतील. कोहली आणि विल्यमसन या दोघांनाही यंदाच्या हंगामात अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. सध्या गुणतालिकेत बंगळूरुचे १२ गुण आहेत आणि त्यांना कोणत्याही किमतीत पहिल्या चारमध्ये कायम राहून प्लेऑफची शर्यत कायम ठेवायची आहे.


बंगळूरुने त्यांच्या मागील सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध महत्त्वपूर्ण विजय मिळवला. त्यामुळे ते या सामन्यात आत्मविश्वासाने उतरतील, तर सलग तीन पराभवांनंतर हैदराबादच्या कंपूत या क्षणी आत्मविश्वासाची कमतरता आहे. केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स संघाला प्ले-ऑफच्या शर्यतीय राहायचे असेल, तर विजय आवश्यक आहे.


सनरायझर्सविरुद्ध दोन आठवड्यांपूर्वी बंगळूरु या हंगामातील निच्चांकी धावसंख्या ६८ धावांवर सर्वबाद झाला होता. त्या पराभवानंतर त्यांनी पुढील दोन सामनेही गमावले. सलग ३ सामने हरल्यानंतर किंग्ज विरुद्धच्या विजयाने त्यांचे मनोबल वाढले आहे. दुसरीकडे, सलग पाच सामने जिंकल्यानंतर, सनरायझर्सने सलग तीन सामने गमावले आहेत, ते त्यांच्या स्टार गोलंदाजांच्या दुखापतीमुळे. त्यामुळे संघातून वगळण्यात आलेल्या मार्को यानसेनला संधी मिळू शकते. त्याने बंगळूरुविरुद्धच्या गत सामन्यात झटपट विकेट्स घेतल्या होत्या.


बंगळुरु खेळणार हिरव्या जर्सीत...


२०११ पासून एका सामन्यात संघ दर वर्षी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी हिरव्या रंगाच्या जर्सीमध्ये खेळत असतो. पण गेल्या वर्षी असे करता आल् नाही. मात्र यंदा ही परंपरा पुन्हा सुरू करत हैदराबादविरुद्धच्या सामन्यात संघ हिरव्या जर्सीत दिसणार आहे. नुकतेच बंगळुरुच्या नव्या जर्सीचं अनावरण करण्यात आले आहे. पर्यावरण सुरक्षित असेल, तर आपण सर्व सुरक्षित राहू. पर्यावरणाकडे दुर्लक्ष केले, तर पिण्यासाठी पाणी व श्वास घेण्यासाठी शुद्ध हवा राहणार नाही. कोणत्याही परिस्थितीत पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे, असा संदेश या माध्यमातून दिला जाणार आहे. संघ यासाठी सोशल मीडियावर #गो ग्रीन आणि #फॉर प्लानेट अर्थ दोन हॅशटॅग वापरत आहे.


ठिकाण : वानखेडे स्टेडियम, मुंबई. वेळ : दुपारी ३.३० वाजता.

Comments
Add Comment