विशाल कपूर
संयुक्त राष्ट्रांनी, स्वीकार केलेल्या शाश्वत विकास उद्दिष्ट्ये अर्थात एसडीजी-७ उद्दिष्टांअंतर्गत, २०३०पर्यंत ऊर्जा प्राप्त करण्याची संधी सुनिश्चित करणे हे एक महत्त्वाचे फलित अपेक्षित आहे. ऊर्जेपासून वंचित राहिल्याने त्याचा जनतेच्या जीवनमानाच्या गुणवत्तेवर हानिकारक परिणाम होतो. रोजगारासाठी आर्थिक संधी घटण्याबरोबरच ऊर्जा दारिद्र्यामुळे आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रातही विपरीत सामाजिक परिणाम होतात. ऊर्जा प्राप्त करण्याच्या संधीच्या अभावाचा सर्वात मोठा परिणाम होतो तो समाजातल्या वंचित घटकांवर. महिलांच्या काबाडकष्टात भर पडण्याबरोबरच घरात वीज नसल्याने अशा घरातल्या लोकांना, उर्वरित जगापासून विलग असल्याच्या भावनेकडे नेते.
२०१४ पर्यंत भारतातल्या जनगणना केलेल्या एकूण १८३७४ गावात वीज पोहोचली नव्हती. १५ ऑगस्ट २०१५ मध्ये लाल किल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, देशभरातल्या ज्या गावांमध्ये अद्याप वीज नाही, अशा गावांमध्ये १००० दिवसांत वीज पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला. दीन दयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजनेद्वारे (डीडीयूजीजेवाय) आव्हानात्मक कालमर्यादेत हे कार्य पूर्णत्वाला नेणे हे प्रचंड मोठे काम होते. देशाच्या ऊर्जा मंत्रालयाच्या अनेक महिन्यांच्या चिकाटीनंतर २८ एप्रिल २०१८मध्ये मणिपूरच्या डोंगराळ भागात वसलेल्या लीसांग या छोट्या गावात विजेचा पहिला दिवा प्रज्वलित करून भारताने १००% ग्राम विद्युतीकरणाचा ऐतिहासिक टप्पा साध्य केला. ही कहाणी केवळ आकडेवारीची नव्हे तर निश्चय, परिश्रम आणि दुर्धर अडचणींवर मात करण्याची आहे. ग्राम विद्युतीकरणाच्या अखेरच्या टप्यात दुर्गम अशा प्रांतांचा-डोंगराळ भाग, नद्या आणि डाव्या जहालवाद्यांचे प्राबल्य असणाऱ्या भागांचा समावेश होता.
हे काम पूर्णत्वाला नेण्यासाठी, देशाचा कानाकोपरा उजळवण्याचा निर्धार घेऊन देशव्यापी ‘टीम पॉवर’ या ऊर्जा चमूची स्थापना करण्यात आली. पारदर्शकता आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करण्यासाठी, नव्या महत्त्वाच्या टप्यावर आधारित देखरेख प्रणाली विकसित करण्यात आली. सुरुवातीपासून अखेरच्या टप्प्यापर्यंतच्या प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यात आली आणि सर्वेक्षणे करण्यापासून ते खरेदी, पायाभूत ढाचा उभारणे आणि विद्युतीकरण अशा प्रत्येक तपशीलाची नोंद घेतली गेली. राष्ट्रीय ग्रीडशी जोडणी होऊ शकली नाही अशा गावांच्या विद्युतीकरणासाठी कल्पक ऑफ ग्रीड उपायांचा अवलंब करण्यात आला. अनेक दुर्गम भाग रस्तामार्गेही जोडलेले नव्हते. अनेक भागात, विद्युतीकरणासाठी आवश्यक साहित्य, भारतीय हवाई दलाच्या सहाय्याने खाली सोडण्यात आले.भारतातली सुमारे दोन तृतियांश जनता ग्रामीण भागात राहते. तथापि मुलभूत सुविधांची वाढती प्राप्ती आणि ग्रामीण भारताचा होणारा कायापालट यामुळे ग्रामीण आणि शहरी भाग यांच्यातली रेषा पुसट होत चालली आहे. इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर, दूरचित्रवाणी आणि मोबाइल यासारख्या आधुनिक सुविधा आता केवळ शहरी भागांपुरत्याच मर्यादित राहिलेल्या नाहीत. ग्रामीण भागातल्या मुलांना अभ्यासासाठी आता केवळ सूर्यप्रकाशावरच अवलंबून राहावे लागत नाही. देशाच्या अंतर्गत भागाच्या विकासावर सातत्यपूर्ण लक्ष केंद्रित करण्याबरोबरच गावे झपाट्याने मुख्य प्रवाहाशी जोडली जात आहेत. ‘स्वातंत्र्यप्राप्तीची ७५ वर्षे ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ आपण साजरा करत असताना, प्रत्येक कामगिरी ही अंत्योदय दृष्टिकोन साकार करणाऱ्या भारताच्या दिशेने अधिक जवळ जाणारे पाऊल हवे, यावर आपला कटाक्ष असला पाहिजे.