गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स

मुंबई (प्रतिनिधी) : हार्दिक पंड्याचा गुजरात टायटन्स प्ले-ऑफच्या उंबरठ्यावर असून शुक्रवारी होणाऱ्या मुंबईविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवल्यास ते प्लेऑफचे तिकीट निश्चित करतील. विक्रमी ५ वेळचा चॅम्पियन असलेला मुंबई संघ आधीच प्ले-ऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर आयपीएलच्या १५व्या हंगामातील त्यांची मोहीम संपण्यापूर्वी आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी त्यांना आणखी काही विजय आपल्या खात्यात नक्कीच जोडायचे आहेत.


मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या त्यांच्या मागील सामन्यात हंगामातील पहिला विजय मिळवून सुटकेचा निःश्वास टाकला. दुसरीकडे, अव्वल स्थानी असलेल्या गुजरात टायटन्स त्यांचा शेवटचा सामना पंजाब किंग्जकडून हरल्याने त्यांची पाच सामन्यांची विजयी मालिका खंडित झाली. पराभवानंतरही, गुजरात टायटन्स १० सामन्यांतून १६ गुणांसह गुणतालिकेत आघाडीवर आहे आणि शुक्रवारी विजय मिळवल्यास ते प्ले-ऑफमध्ये स्थान निश्चित करणारा पहिला संघ बनतील. दुसरीकडे, मुंबई इंडियन्सचा विचार केला तर ते गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर असून स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. पण गेल्या सामन्यात मुंबईला राजस्थानवर ५ गडी राखून मोसमातील पहिला विजय मिळाला. आता मुंबईला आपल्या या सामन्यात विजयाची घोडदौड कायम राखता येईल का? हे पाहावे लागेल.


सूर्यकुमार फलंदाजीत मुंबईचा स्टार खेळाडू आहे; परंतु भरवशाचे फलंदाज रोहित व ईशानचा खराब फॉर्म स्पर्धेत कायम आहे, तर धडाकेबाज फलंदाज किरॉन पोलार्डला आतापर्यंत त्याच्या ‘फिनिशर’ भूमिकेला न्याय देता आलेला नाही. गोलंदाजीतही जसप्रीत बुमरा किफायतशीर असला तरी तो हवे तसे विकेट घेऊ शकला नाही. डॅनियल सॅम्स, रिले मेरिडिथ यांनी मधल्या काळात चांगली कामगिरी केली असली तरी मुंबईकडे बुमराशिवाय कोणताही विश्वसनीय गोलंदाज नाही. तर गुजरातकडे शमी, लॉकी फर्ग्युसन, अल्झारी जोसेफ आणि रशीद या गोलंदाजांच्या उपस्थितीमुळे सर्वात धोकादायक गोलंदाजी आक्रमण आहे.


मुंबई इंडियन्स करू शकते इतरांचा खेळ खराब


मुंबईसाठी प्ले-ऑफचे दरवाजे बंद आहेत; परंतु हा संघ आता स्वतःची प्रतिष्ठा वाचवण्यासाठी जिंकण्याचा प्रयत्न करेल आणि उर्वरित सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्स इतर संघांची समीकरणे बिघडवण्याचा प्रयत्न करेल. मुंबईकडे गमावण्यासारखे काहीही नसताना ते आता संघातील तरुण प्रतिभेला आजमावून पाहू शकतात. तसेच स्पर्धा अंतिम टप्प्यात आलेली असताना इतर संघांची डोकेदुखी वाढवू शकतात. अंतिम टॉप ४ कोण असतील? हे ठरवण्यासाठी या शेवटच्या टप्प्यात मुंबईची कामगिरी महत्त्वपूर्ण असेल. त्यामुळे गुजरातला हरवून नि उर्वरित सामने जिंकून मुंबई इतरांच्या प्ले-ऑफच्या आशा धूळीस मिळवू शकतो.


हार्दिकचा जुन्या मित्रांशी सामना


हार्दिकसाठी गुरुवारचा हा दिवस खूप भावनिक असेल. कारण, तो या दिवशी या आयपीएलमध्ये पहिल्यांदाच आपली कारकिर्द घडवणाऱ्या संघाशी सामना करेल. हार्दिकने आपल्या कारकिर्दीची सुरुवात मुंबई इंडियन्समधून केली असून या मोसमात तो गुजरात टायटन्सचा कर्णधार आहे. यंदाच्या मोसमात मुंबई गुणतालिकेत अगदी तळाला आहे आणि अशा परिस्थितीत तालिकेत अव्वल असलेल्या आपल्या संघाला पुन्हा विजयी मार्गावर नेण्याचा हार्दिकचा प्रयत्न असेल.


ठिकाण : ब्रेबॉर्न स्टेडियम वेळ : रात्री ७.३० वाजता

Comments
Add Comment

वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये पोहोचणारा ऑस्ट्रेलिया ठरला पहिला संघ, बांगलादेशला केले पराभूत

मुंबई: आयसीसी महिला वर्ल्डकप स्पर्धेतील एका महत्त्वपूर्ण सामन्यात, ऑस्ट्रेलियाने बांगलादेशचा १० गडी राखून

अभिषेक शर्मा आणि स्मृती मानधनाला आयसीसी प्लेअर्स ऑफ द मंथ पुरस्कार

दुबई : भारतीय क्रिकेटपटू अभिषेक शर्मा आणि स्मृती मानधना यांनी सप्टेंबर २०२५ साठी आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार

WTC Time Table : पाकिस्तानच्या विजयाने टीम इंडियाला फटका, पाहा कोण आहे अव्वल

नवी दिल्ली: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) २०२५-२०२७ च्या गुणतालिकेत एक महत्त्वपूर्ण बदल झाला आहे. पाकिस्तान

IND vs AUS: इंग्लंड, वेस्ट इंडिजनंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलची खरी परीक्षा

मुंबई: शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाला आहे. इंग्लंड आणि वेस्ट

२०३० च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी अहमदाबादची यजमान शहर म्हणून शिफारस, अंतिम निर्णय २६ नोव्हेंबरला

नवी दिल्ली : २०३० मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या (Commonwealth Games) यजमान शहरासाठी भारताच्या 'अहमदाबाद'

"तो कुठेही जाणार नाही!" विराट कोहलीच्या RCBमधील भविष्यावर मोहम्मद कैफ यांची प्रतिक्रिया!

कोहली RCBमध्येच राहणार, निवृत्तीच्या अफवांना पूर्णविराम नवी दिल्ली : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या रॉयल