विलास खानोलकर
साईबाबांचे दर्शन घेताना साईचरित्रकार अण्णा दाभोलकर मंत्रमुग्ध झाले. त्यांच्या डोळ्यांत पाणी आले. बाबांच्या चरणावर मस्तक ठेवून ते म्हणाले, “बाबा, आपला हा आशीर्वाद मला पुरेसा आहे. तोच माझे जीवन मार्गी लावेल. मला सांभाळून घ्या एवढी विनंती आहे.” बाबा म्हणाले, “मी तुला जे काही सांगितले ते चांगले लक्षात ठेव, त्याचेच मनन कर, त्याचाच ध्यास घे. नित्य त्याचेच ध्यान कर म्हणजे तो परमदयाळू परमात्मा आपोआप प्रकट होईल. दृश्यजगत आणि त्यातील घडामोडी हा सर्व भ्रम आहे. समुद्राच्या पाण्यावर लाटेचे येणे तिचे पुढे धावणे आणि शेवटी किनाऱ्यावर आपटून फुटणे यात काय निर्माण झाले आणि काय नाश पावले? लाटा, फेस, बुडबुडे, भोवरे जसे एकाच पाण्याचे स्वरूप आहे तसे विविधतेने नटलेले विश्वही एकाच परमात्म्याचे स्वरूप आहे. सृष्टीरूपाने मायेचे जे काही कार्य चालू आहे ते झाले गेले सारखेच समजावे. जे नाशिवंत आहे त्याच्या मागे न लागता जे नित्य आहे, त्याचा कधीही नाश होत नाही, जे अखंड सुख आहे ते साधून घेण्याचा प्रयत्न करावा. अर्थात विषयांच्या मागे न लागता मनाला ईश्वरी चिंतनाची सवय लावावी.
जोपर्यंत आत्मस्वरूपाने ज्ञान होत नाही तोपर्यंत चांगले ध्यानही लागत नाही. आत्मस्वरूपाचे ज्ञान झाले की मग त्याचाच ध्यास धरावा, सतत आत्मानुसंधानात राहावे, चित्ताची अखंड शांती तिलाच समाधी म्हणतात. स्वतःसह सर्व प्राणिमात्रांमध्ये चैतन्यरूपात एकच ईश्वरीतत्व कार्य करीत आहे, हे लक्षात येताच सर्व प्रकारचे द्वैत आपोआपच नाहीसे होते आणि जीव मुक्तीचा आनंद भोगतो. सर्वत्र एकच चैतन्य व्यापून आहे हे समजणे हीच ज्ञानाची सिद्धी आहे.”
साई माझे गुरू
नाम घेता काम सुरू ।।१।।
साऱ्या संकटांना पुरू
शत्रूला पुरून उरू ।।२।।
जगभर एकच नाम
साईनाथ साईनाथ ।।३।।
रामनामातच आहे
साईनाम, साईनामातच रामनाम ।।४।।
साई म्हणे काम करा झकास
नका राहू उगा भकास ।।५।।
चटपट झटपट करा काम
ठेवा साबत साईनाम ।।६।।
हसत हसत घ्या रामनाम
आनंदाने घ्या मारुती नाम ।।७।।
दिवसा म्हणा रामरक्षास्त्रोत्र
रात्री म्हणा मारुतीस्त्रोत्र ।।८।।
ईश्वरच आहे आनंदाचा स्त्रोत्र
तोच पुरुवतो अन्न, धान्य, वस्त्र ।।९।।
राहा तुम्ही आनंदी मस्त
साईनामात मजेत मस्त ।।१०।।