मे महिन्याचा उकाडा वाढला आहे. ग्रामीण भागात त्याची झळ जाणवत आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत आड गावात राहणाऱ्या जनतेला तालुक्याच्या, जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी एसटी बस हे आजही परवडणारे वाहन म्हणून मानले जाते. मात्र गेल्या पाच-सहा महिन्यांपूर्वीच्या संपामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांबाबत प्रवासी तसेच राज्यातील जनतेला सहानुभूती होती. शेवटच्या टप्प्यात आंदोलनाने आक्रमक दिशा घेतली. ही दिशा फरकटली की योग्य होती याचा विचार करायला कर्मचाऱ्यांना वेळ नव्हता. शरद पवार यांच्या सिल्वर ओक येथील घराबाहेरील आंदोलनानंतर, एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची दिशा बदलली. गुणरत्न सदावर्ते यांच्या अटकेनंतर कर्मचाऱ्यांनी आपली नोकरी बरी, अशी सावध भूमिका घेत, कामावर रुजू होण्याचा निर्णय घेतला. त्यातून एप्रिल, मे महिन्यांत एसटी बस आज सर्व जिल्ह्यात धावताना दिसत आहेत.
एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरणासह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप होता. तसेच या संपाबाबत उच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. न्यायालयाने कर्मचाऱ्यांना २२ एप्रिल २०२२ पर्यंत कामावर रुजू होण्याचे निर्देश दिले होते. न्यायालयाने दिलेल्या मुदतीत मोठ्या प्रमाणात संपकरी कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. त्यानुसार आतापर्यंत महामंडळात ८३ हजार कर्मचारी हजर झाले आहेत. हजर झालेल्या कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने महामंडळाने राज्यातील एसटीची वाहतूक सुरू केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.
कोरोना पूर्वकाळात एसटी महामंडळाच्या बसेसमधून राज्यात दररोज ६५ लाख प्रवासी प्रवास करत होते. एसटी महामंडळाला प्रवासी वाहतुकीतून प्रत्येक दिवशी २१ कोटी रुपयांचा महसूल मिळत होता. कोरोना काळात मुंबई-ठाण्यात एसटी कर्मचाऱ्यांनी सेवा केली. मुंबईतील लाइफलाइन पूर्णत: बंद होती. त्यावेळी बेस्ट बसच्या मार्गावरून एसटीच्या बस धावत होत्या. नांदेड, वर्धा, गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातील कर्मचाऱ्यांना कोरोना काळात मुंबईकरांची सेवा करण्याची संधी मिळाली होती. त्यामुळे राज्य सरकारबरोबर वाटाघाटी होऊनही संप चिघळला होता, तरीही एसटी संपाबाबत सर्वसामान्य व्यक्तीच्या मनात एक सहानुभूती होती. संपाच्या जोखड्यातून बाहेर पडून एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर जाण्याचा जो निर्णय घेतला तो खरंच स्वागतार्ह आहे. कुठल्याही कागदपत्रांच्या पूर्ततेमध्ये न अडकता एसटी कर्मचाऱ्यांना तातडीने रुजू करून घेण्याच्या हालचालींना वेग आला आहे. महामंडळाने बडतर्फ केलेल्या अकरा हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याची संधी देण्यात आली आहे. ज्या कर्मचाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे, अशा कर्मचाऱ्यांबाबत योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांना शेवटपर्यंत संधी देण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर ९६ टक्क्यांहून अधिक एसटी कर्मचारी आता कामावर रुजू झाले आहेत. या सर्व प्रकारात अलिबाग येथील एसटी कर्मचाऱ्यांसंबंधी बातमी सकारात्मक आहे. अलिबाग येथील कर्मचाऱ्यांनी पुन्हा कामावर रुजू होताना एक संकल्प केला की, नव्या जोशाने आम्ही एसटीचे उत्पन्न वाढण्याचा प्रयत्न करू. कर्मचाऱ्यांच्या या सकारात्मक बाजूमुळे एसटीला पुन्हा चांगले दिवस येऊ शकतात. सध्या राज्यभरात १२ हजार ५८६ एसटी बसेसमार्फत ३१ हजार ५०० पेक्षा अधिक एसटीच्या फेऱ्या सुरू असून प्रवासी संख्या २२ लाखांपर्यंत पोहोचली आहे. त्यातून एसटी महामंडळाला दररोज सरासरी १३ कोटी २५ लाख एवढा महसूल मिळत आहे, ही जमेची बाजू आहे.
सध्या महामंडळाच्या ताफ्यात १६ हजार एसटी बसेस आहेत. त्यापैकी १२ हजार एसटी बसेस रस्त्यावर धावत आहेत. तसेच ४ हजार बसेस वेगवेगळ्या कारणाने आगारात बंद पडून आहेत. संपामुळे या बस धूळखात बसल्या होत्या. त्या लवकरात लवकर दुरुस्त करून मार्गस्थ करणे हे एसटी महामंडळापुढील महत्त्वाचे आव्हान आहे. तसेच आता एसटी महामंडळाने खासगी वाहतूकदारांशी असलेल्या स्पर्धेचा विचार करून, पावले उचलली पाहिजेत. ज्या मार्गावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्या मार्गावर फेऱ्या वाढविण्याची गरज आहे. एसटी बसबद्दल नव्या पिढीला काही वाटत नसेल; परंतु मागच्या पिढीला एसटी बसमध्ये बसायला जागा मिळावी यासाठी आमदार, खासदार यांचे पत्र आणावे लागत होते, याची चांगली आठवण आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून फिरताना, सीमा भागातून जाताना रस्त्यावर लालपरी दिसली म्हणजे आपण महाराष्ट्रात आहोत, याचा वेगळा आनंद वाटत असे. तीच एसटीची ओळख पुढील काळात कायम राहू दे. एसटी कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काच्या मागण्या पदरात पडू दे. अशा अपेक्षा यानिमित्ताने करायला हरकत नाही.