मुंबई (प्रतिनिधी) : यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीला रवींद्र जडेजाला कर्णधार म्हणून नियुक्त करण्याचा चेन्नई सुपर किंग्जचा निर्णय ‘चुकीचा’ असल्याचे मत भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवाग याने व्यक्त केले आहे.
सेहवाग म्हणाला की, आयपीएल २०२२ च्या सुरुवातीला रवींद्र जडेजाला कर्णधार म्हणून नियुक्त करण्याचा चेन्नई सुपर किंग्जचा निर्णय ‘चुकीचा’ होता. आयपीएलचा हा हंगाम सुरू होण्याच्या काही दिवस आधी धोनीने संघाचे कर्णधारपद जडेजाकडे सोपवण्याचा निर्णय घेतला. मात्र गतविजेत्या संघाची कामगिरी खराब राहिली. संघाला आठ पैकी फक्त दोन सामनेच जिंकता आले. यानंतर जडेजाने कर्णधारपद परत धोनीकडे देण्याचा निर्णय घेतला.
सेहवागने आयपीएल २०२२ मधील चेन्नईच्या खराब कामगिरीचे मुख्य कारण म्हणून फलंदाजांचा खराब फॉर्म असल्याचे सांगितले आहे. तो म्हणाला, “रुतुराज गायकवाडने सुरुवातीला धावा केल्या नाहीत. संघाची सुरुवात खराब झाली. फलंदाजांनी धावा केल्या नाहीत आणि अशा स्थितीत हंगाम खराब होणे निश्चितच होते. धोनी सुरुवातीपासूनच कर्णधार असता तर बरे झाले असते आणि कदाचित सीएसकेने इतके सामने गमावले नसते, असे सेहवाग म्हणाला.