पुणे (वृत्तसंस्था) : महीपाल रोमरोर, फाफ डुप्लेसीस आणि विराट कोहली यांची सांघिक फलंदाजी आणि त्याला मिळालेल्या मॅक्सवेल, हेजलवूड यांच्या दमदार गोलंदाजीची साथ अशा सांघिक कामगिरीमुळे बंगळूरुने चेन्नईवर १३ धावांनी विजय मिळवला. या विजयासह बंगळूरुने १२ गुणांसह चौथ्या स्थानी झेप घेतली आहे.
प्रत्युत्तरार्थ फलंदाजीला आलेल्या चेन्नईला चांगली सुरुवात करता आली. पण पुढच्या फलंदाजांना त्याचे विजयात रुपांतर करता आले नाही. रुतुराज गायकवाड आणि कॉनवे ही जोडी धावा जमवण्यात यशस्वी ठरली. कॉनवेने ५६ धावा केल्या, तर रुतुराजने २८ धावा केल्या. त्यानंतर उथाप्पा, रायडू ही चेन्नईची मधली फळी अपयशी ठरली. मोईन अलीने एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न केला. पण त्याला आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात अपयश आले. बंगळूरुच्या मॅक्सवेल, हेजलवूड यांनी दमदार गोलंदाजी करत बंगळूरुला विजय मिळवून दिला. हर्षल पटेलला धावा रोखण्यात यश आले नसले तरी त्याने ३ बळी मिळवले. त्याने ४ षटकांत ३५ धावा दिल्या.
तत्पूर्वी चेन्नईने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या बंगळूरुची सुरुवात दणक्यात झाली. फाफ डुप्लेसीस आणि विराट कोहली या आजीमाजी कर्णधारांच्या सलामीवीर जोडीने बंगळूरुला नाबाद अर्धशतकाची सुरुवात करून दिली. दोघांनीही चेन्नईच्या गोलंदाजांचा खरपूस समाचार घेत बंगळूरुच्या धावांचा वेग वाढवला. त्यानंतर महीपाल रोमरोरने २७ चेंडूंत ४२ धावांची धडाकेबाज खेळी खेळली.
रजत पटीदार आणि दिनेश कार्तिक यांनी शेवटच्या षटकांत धावा केल्याने बंगळूरुने २० षटकांत १७३ धावांपर्यंत मजल मारली. महिश थिक्क्षनाने ४ षटकांत अवघ्या २७ धावा देत ३ बळी मिळवले. रवींद्र जडेजाला बळी मिळवता आला नसला तरी धावा रोखण्यात त्याला यश आले. जडेजाने ४ षटकांत अवघ्या २० धावा दिल्या. मोईन अलीने ४ षटकांत २८ धावा देत २ बळी मिळवले.