सुकृत खांडेकर
जर्मनीच्या दौऱ्यावर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेथील भारतीय समुदायाशी थेट संवाद साधला आणि गेल्या सात-आठ वर्षांत भारताने जगात कशी चौफेर विलक्षण प्रगती केली आहे, हे सांगून लक्षावधी भारतीयांची मने जिंकली. पंतप्रधानांचे भाषण चालू असताना समोर बसलेल्या जर्मनीमध्ये स्थायिक झालेल्या भारतीय लोकांकडून सतत मोदी…… मोदी… असा जयघोष चालू होता. मोदींच्या भाषणावर टाळ्या वाजवून सतत प्रतिसाद दिला जात होता. मोदी द ग्रेट लिडर, वर्ल्ड लिडर अशा शब्दांत तेथील भारतीय जनतेने मोदींवर प्रशंसेचा वर्षाव केला. मोदींचा हा कार्यक्रम भारतीय वृत्तवाहिन्यांनी थेट प्रक्षेपित केला. पंतप्रधान मोदींचे जर्मनीतील भारतीय समुदायाने जंगी स्वागत केले. राजधानी बर्लिनमध्ये मोदींच्या स्वागताचे फलक झळकत होते. बर्लिनमधील पाॅट्सडैमर प्लाज थिएटरमध्ये भारतीय लोकांपुढे मोदींनी संवाद साधला. यावेळी त्यांनी तेथील एका गटाबरोबर ड्रमवादनाचा आनंदही लुटला. भारतीय दूतावासाने हा कार्यक्रम योजला होता. पंतप्रधानांनी आपल्या एक तासाच्या भाषणात सात- आठ वर्षांत आपल्या कारकिर्दीत भारत कसा बदलला आहे आणि वेगाने बदलतो आहे, याची अनेक उदाहरणे दिली. देशावर सर्वाधिक सत्ता भोगणाऱ्या काँग्रेसचे नाव न घेता त्या पक्षाच्या अकार्यक्षम कारभारावर टीका केली. आपले केंद्रात सरकार आल्यापासून लक्षावधी लोकांना हजारो कोटींचे अर्थसहाय्य दिले गेले किंवा मदत म्हणून रक्कम दिली गेली. पण ही रक्कम त्यांच्या थेट बँक खात्यात जमा झाली. त्यात कुठेही घपला झाला नाही किंवा पैशात कपात झाली नाही. पंतप्रधान म्हणाले, काँग्रेसच्या काळात एक रुपया दिल्लीहून पाठवला की, खालपर्यंत जेमतेम पंधरा पैसे पोहोचत असत. पंचाऐंशी पैसे कोणता तरी पंजा काढून घेत असे. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनीच ही गोष्ट भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर बोलताना सांगितली होती. तेव्हा एक रुपयातील ८५ पैसे भ्रष्टाचारात जात असत. आता लाभधारकांच्या थेट बँक खात्यात पैसे जमा होत असल्याने त्यात टक्केवारी मारली जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. काँग्रेसच्या काळात सर्वत्र ‘वर्क इन प्रोग्रेस’ असे फलक लावलेले दिसायचे. एखादा रस्ता तयार झाला की, पाण्याच्या पाइपलाइनसाठी खणला जायचा, नंतर विजेच्या केबल्स टाकण्यासाठी खोदला जायचा, नंतर ड्रेनेज कामासाठी खोदला जायचा, नंतर टेलिफोनच्या केबल्ससाठी खोदला जात असे. त्यामुळे त्या रस्त्यावर सतत ‘वर्क इन प्रोग्रेस’ असा बोर्ड कायम झळकत असायचा. देश तोच आहे, फायली त्याच आहेत, नोकरशहा तेच आहेत, सरकारी मशीनरी तीच आहे, पण देश आता वेगाने बदलतो आहे, हे त्यांनी अभिमानाने सांगितले. भारतात इंटर कनेक्टिव्हिटी सर्वात वेगवान आहे. भारतात आता ५-जी तंत्रज्ञान येत आहे. रिअल टाइम पेमेंटमध्ये सर्वात मोठी भागीदारी भारताची आहे.
भारताच्या कालबद्ध व वेगवान विकासाचा आराखडा पंतप्रधानांनी जर्मनीमधील भारतीय जनतेपुढे मांडला. देशातील तरुणांना गतिमान विकास हवा आहे, त्यासाठी राजकीय स्थिरता आणि प्रबळ इच्छाशक्तीची आवश्यकता असते. केंद्रात मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार येण्यापूर्वी देशात तीन दशके असलेली राजकीय अस्थिरता २०१४ मध्ये संपुष्टात आली. देशातील जनतेला सकारात्मक बदल आणि वेगवान विकास हीच अपेक्षा आहे, त्यासाठीच २०१४ मध्ये भारतीय जनतेने भाजपला पूर्ण बहुमत दिलेच. पण २०१९ मध्ये तीनशेपेक्षा जास्त जागा देऊन मोदी सरकार आणखी मजबूत केले. रोजगार, शिक्षण, उद्योग, व्यवसाय अशा प्रत्येक क्षेत्रात भारतीय जीवनमान सुधारले आहे. सर्व आघाड्यांवर आज गुणवत्ता प्राप्त झाली आहे. देशाच्या प्रगतीसाठी गतिशक्ती राष्ट्रीय विकास आराखडा मोदी सरकारने तयार केला आहे. सरकारमधील प्रत्येक मंत्रालय, प्रत्येक विभाग आपल्या प्रगतीसाठी अॅडव्हान्स प्लॅन तयार करू शकतो, अशी व्यवस्था निर्माण केली आहे.
देशाची सूत्रे हाती घेतल्यापासून मोदींनी देशातील उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी २०१४ नंतर स्टार्टअप इंडिया योजना सुरू केली. सुरुवातीला केवळ २०० ते ४०० स्टार्टअप्स होते, आता ही संख्या ६८ हजारांपेक्षा जास्त झाल्याचे मोदींनी सांगितले तेव्हा भारतीय नागरिकांनी टाळ्यांचा कडकडाट करून मोदींचे अभिनंदन केले. मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असतानाचा त्यांनी एक किस्सा सांगितला. गुजरातमध्ये मी सीएम म्हणून नोकरी करीत होतो, असे त्यांनी मिष्कीलपणे म्हणताच उपस्थितांत मोठा हशा पिकला. तेथील नोकरशहांशी आपण संवाद साधताना त्यांची मुले काय करतात, असे उत्सुकतेने विचारायचो. तेव्हा बाबूंकडून हमखास उत्तर ऐकायला मिळायचे की, मुले आयएएसची तयारी करीत आहेत…. देशाचा पंतप्रधान म्हणून दिल्लीत आल्यावर भारत सरकारच्या सेवेतील बाबूंना उत्सुकतेने हाच प्रश्न विचारतो, तुमची मुले काय करतात? त्यांच्याकडून उत्तर ऐकायला मिळते, मुले स्टार्टअपमध्ये गुंतली आहेत…. भारतात हेच नवे वातावरण आहे. गेल्या सात वर्षांत देशात मोठे परिवर्तन झाले आहे. मोदींनी जेवढ्या विश्वासाने स्टार्टअपचा मुद्दा मांडला तेवढ्याच उत्साहाने त्यांनी खादीचा मुद्दा मांडला. खादीला प्रोत्साहन दिल्यामुळे डबघाईला आलेला हा उद्योग आता एक लाख कोटींच्या पुढे गेला आहे. लोकल को ग्लोबल बनाने में आप मेरा साथ दें, असे आवाहनही त्यांनी भाषणातून केले. योगा ही आमची पारंपरिक औषधी ताकद आहे. २१ जून आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा होतो, ही भारताची कमाई आहे. भारतात एलईडी बल्बचा मोठा प्रचार झाला. देशात ३७ कोटी एलईडी बल्ब वाटले गेले. त्यातून ४८ अब्ज किलो वॅट विजेची बचत झाली, चार कोटी टन कार्बन उत्सर्जन कमी झाला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात भारतात ५०० दिवसांत ५० हजार जुने तलाव (जलाशये) पुनरुज्जीवित केले जाणार आहेत. गावांमध्ये अमृत सरोवर योजना राबवली जात आहे. ज्या गावातून आपण विदेशात आलात, त्या गावात अमृत सरोवर निर्माण करण्यात आपण इथून मदत करू शकता, असेही आवाहन मोदींनी केले. वसुधैव कुटुंबकम हा आमचा मंत्र आहे, असे सांगत मोदींनी जर्मनीमधील भारतीयांच्या हृदयात कायमचे स्थान मिळवले.
तुम्ही माझे ‘आयकॉन’ आहात…
पंतप्रधान मोदी बर्लिनच्या दौऱ्यावर असताना एक लहान गोड मुलगी त्यांना भेटली व तिचा व्हीडिओ सर्वत्र व्हायरल झाला. मोदींनी तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवून तिला आशीर्वादही दिले. भारतीय वंशाच्या या मुलीने मोदींना एक पेटिंग दाखवले. मोदींचे चित्र रेखाटलेले होते. मोदींनी तिला कौतुकाने विचारले, हे चित्र काढायला किती वेळ लागला? ती म्हणाली एक तास. मोदींनी नंतर तिला विचारले, तू हे चित्र का काढलेस? त्या मुलीने उत्तर दिले, तुम्ही माझे ‘आयकॉन’ आहात. …मोदींनी ते चित्र हातात घेऊन तिच्याबरोबर फोटोही काढून घेतला.