Thursday, April 24, 2025
Homeमहत्वाची बातमी“शेअर बाजार करेक्शनच्या चक्रात”

“शेअर बाजार करेक्शनच्या चक्रात”

डॉ. सर्वेश सुहास सोमण

या आठवड्याची सुरुवात मोठ्या घसरणीसह झाली. त्यानंतर मंगळवारच्या सत्रात निर्देशांकामध्ये मोठी वाढ पाहावयास मिळाली. गुरुवारच्या सत्रात शेअर बाजाराची महिन्याची एक्सपायरी असल्याने खूप मोठी हालचाल होणे अपेक्षित होते. एक्सपायरी असल्याने पुन्हा एकदा शेअर बाजाराने बाऊन्स बॅक करत जोरदार उसळी घेतली आणि शेअर बाजाराने गुरुवारी साप्ताहिक उच्चांक नोंदविला. शुक्रवारी पुन्हा शेअर बाजारात वाढ झाली मात्र शेवटच्या काही मिनिटांमध्ये निर्देशांकात फार मोठ्या प्रमाणात नफा वसुली पाहावयास मिळाली आणि परिणामी १५० अंकांनी वर असणारी निफ्टी काही मिनिटांत कोसळली आणि नकारात्मक बंद झाली.

आपण आपल्या मागील लेखातच निर्देशांक मंदीत आहेत हे सांगितलेले होते. शुक्रवारी शेवटच्या काही मिनिटांत झालेल्या घसरणीनंतर निर्देशांकानी या पुढील आठवड्यासाठी देखील नकारात्मक संकेत दिलेले आहेत. सध्या अल्प मुदतीच्या चार्टनुसार निर्देशांकाची दिशा मंदीची असून तांत्रिक विश्लेषणानुसार (टेक्निकल अॅनालिसीस) मंदीत असणाऱ्या शेअर्समध्ये
अल्पमुदतीचा विचार करता स्टॉपलॉसचा वापर करूनच मंदीचा व्यवहार करता येईल. चार्टनुसार तान्ला सोल्युशन, गुजरात गॅस, स्टरलाइट टेक्नोलॉजी, बालाजी टेलिफिल्म्स, या शेअर्सची दिशा अल्पमुदतीसाठी मंदीची झालेली आहे. बहुचर्चित आयपीओ भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसी याच्या समभागविक्रीची घोषणा या आठवड्यात करण्यात आली. येत्या ४ मेपासून सुरू होणाऱ्या या सार्वजनिक भागविक्रीसाठी गुंतवणूकदारांना ९ मेपर्यंत अर्ज करता येईल. कंपनीने भागविक्रीसाठी ९०२ ते ९४९ हा किंमत पट्टा निश्चित केलेला आहे. सध्या एलआयसीची एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्ता ही खासगी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सर्व आयुर्विमा कंपन्यांच्या एकत्रित मालमत्तेपेक्षा जवळपास तिप्पट आहे. सरकारने हिस्सा विक्रीत केलेली कपात आणि भागविक्रीचा आकार कमी करून देखील एलआयसी हा आत्तापर्यंतचा सर्वात मोठा आयपीओ आहे.

या भागविक्रीच्या माध्यमातून केंद्र सरकारचा ३.५ टक्के हिस्सा समभाग विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. केंद्र सरकारला यातून जवळपास २१ हजार कोटी इतका मोठं निधी मिळण्याची अपेक्षा आहे. यातील १० टक्के समभाग हे पॉलिसी धारकांसाठी राखीव असतील. शिवाय त्यांना प्रति समभाग ६० रुपयांची सूट मिळेल. वैयक्तिक गुंतवणूकदारांना किमान १५ समभागांसाठी बोली लावता येईल. १६ मेपर्यंत बोलीदारांच्या डीमॅट खात्यात शेअर्सचे वाटप होईल. त्यानंतर १७ मे रोजी समभाग सूचीबद्ध होण्याची शक्यता आहे. मागील आठवड्यात झालेल्या घसरणीनंतर “कॅनफिन होम्स” या शेअरने अल्पमुदतीच्या चार्टनुसार ६११ ही अत्यंत महत्त्वाची पातळी तोडत मंदी सांगणारी रचना तयार केलेली असून ५९२ रुपये किमतीला असणाऱ्या या शेअरमध्ये पुढील काळात आणखी घसरण होणे अपेक्षित आहे, त्यामुळे पुढील काळात या शेअरमध्ये मंदीचा व्यवहार केल्यास चांगला फायदा होऊ शकेल. मध्यम मुदतीच्या चार्टनुसार या आठवड्यासाठी निर्देशांक सेन्सेक्सची ५६००० आणि निफ्टीची १६८०० ही अत्यंत महत्त्वाची पातळी आहे. जर या पातळ्या तुटल्या तर निर्देशांकात आणखी मोठी घसरण होऊ शकते. शुक्रवारच्या सत्रात झालेल्या कामकाजानंतर अल्पमुदतीसाठी निर्देशांक करेक्शन अर्थात मोठ्या मंदीचे संकेत देत आहेत. चार्ट देत असलेले संकेत पाहता येणारा आठवडा हा अत्यंत महत्त्वाचा आहे.

येणाऱ्या आठवड्यात निर्देशांक सेन्सेक्स, निफ्टी आणि बँकनिफ्टी यामध्ये आणखी मोठी घसरण पाहावयास मिळू शकते. ज्यामध्ये निफ्टी १६८०० पर्यंत घसरण दाखवू शकतो. निफ्टीने जर पुढील काळात १६८०० ही पातळी तोडली, तर मात्र निर्देशांक निफ्टीमध्ये आणखी ४०० ते ५०० अंकांची घसरण होऊ शकते. कमोडीटी मार्केटमध्ये टेक्निकल अॅनालिसीसनुसार कच्चे तेल अजूनही तेजीत असून जोपर्यंत कच्चे तेल ७३०० या पातळीच्या वर आहे तोपर्यंत कच्चे तेलात आणखी वाढ होऊ शकते. अल्पमुदतीसाठी सोने या मौल्यवान धातूची दिशा तेजीची असून मध्यम मुदतीच्या चार्टनुसार जोपर्यंत सोने ५०८०० या पातळीच्या वर आहे तोपर्यंत सोन्यात आणखी वाढ होणे अपेक्षित आहे.

अल्पमुदतीसाठी चांदी या मौल्यवान धातूची दिशा तेजीची असून मध्यम मुदतीच्या चार्टनुसार जोपर्यंत सोने ६५००० या पातळीच्या वर आहे तोपर्यंत चांदीत आणखी वाढ होणे अपेक्षित आहे. निर्देशांक हे पुन्हा एकदा करेक्शन अर्थात मंदीच्या अवस्थेत आहेत. त्यामुळे शेअर्स खरेदी किंवा विक्री करीत असताना योग्य स्टॉपलॉसचा वापर करूनच व्यवहार करावेत. मध्यम मुदतीसाठी १६८०० ही पातळी अत्यंत महत्त्वाची असून जर ही पातळी बंद तत्त्वावर तुटली तर मात्र छोट्या आणि मोठ्या सर्वच शेअर्समध्ये आणि निर्देशांकात मोठे करेक्शन येऊ शकते. त्यामुळे मध्यम मुदतीसाठी गुंतवणूक करीत असलेल्या गुंतवणूकदारांनी या पातळीकडे लक्ष ठेवावे. शेअर बाजारात मंदी असताना शांत राहून योग्य संधीची वाट पाहणे हे देखील तितकेच महत्त्वाचे असते. घाई गडबडीत केलेला व्यवहार हा आपल्याला नुकसान करून देण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे शेअर बाजारात यशस्वी होण्यासाठी अभ्यासासोबत संयम महत्त्वाचा आहे. पुढील काळात निर्देशांकात मोठी घसरण अपेक्षित असल्याने सर्व पैसा एकाचवेळी न गुंतवता टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -