Friday, July 19, 2024
Homeसंपादकीयतात्पर्यमुंबई महापालिकेच्या कामावर भाजपचे लक्ष

मुंबई महापालिकेच्या कामावर भाजपचे लक्ष

सीमा दाते

२०१७ साली काही फरकानेच भाजपला आपली सत्ता मुंबई महापालिकेवर मिळवता आली नाही, तर शिवसेनेची एकहाती सत्ता मुंबई महापालिकेवर आली आणि महापौर हा शिवसेनेचाच झाला. त्यानंतर मात्र भाजपने मुंबई महापालिकेत पहारेकऱ्याची भूमिका स्वीकारली आणि आजतागायत भाजप आपली पहारेकाऱ्याची भूमिका निभावत आहे.

मुंबई महापालिकेतील काम, कंत्राटे, प्रस्ताव, कोणते प्रस्ताव किती दराने दिले, कोणता कंत्राटदार आहे या सगळ्यांकडे भाजप व्यवस्थित लक्ष ठेवून होती आणि त्यामुळे मुंबई महापालिकेतील कामे पारदर्शक झाली, असे म्हणावे लागेल. भाजपचे माजी गटनेते प्रभाकर शिंदे, माजी नगरसेवक भालचंद्र शिरसाट, राजेश्री शिरवडकर, विनोद मिश्रा या नगरसेवकांनी कायम आवाज उठवला होता. एखादा प्रस्ताव चुकीचा असेल, संपूर्ण माहिती प्रस्तावाची नसेल तर तो मंजूर होऊ नये म्हणून भाजपच्या या माजी नगरसेवकांचे आंदोलन, घोषणाबाजी सुरू असायची. सत्ताधारी महापालिकेत चुका करू नये यासाठी भाजप डोळ्यांत तेल घालून कामकाज पाहत होती हेही खरे आहे. विशेष म्हणजे आता प्रशासकाची नियुक्ती झाल्यानंतर भाजप तेवढीच आक्रमक पाहायला मिळत आहे.

७ मार्च २०२२ला महापालिकेतील नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यानंतर ८ मार्च २०२२ ला मुंबई महापालिकेवर प्रशासक म्हणून पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र प्रशासक नियुक्तीनंतर भाजप शांत बसली नाही, तर प्रशासकांच्या हालचाली, त्यांच्या कामकाजावर भाजपची करडी नजर असून प्रशासक काळात जर होणाऱ्या कामात अनियमितता आढळली, तर भाजप त्या विरोधातही आवाज उठवण्याचा तयारीत आहे. आधीच भाजपने सत्ताधाऱ्यांकडून झालेले अनके घोटाळे, निविदे प्रक्रियेतील अनियमितता समोर आणली होती.

खासकरून महापालिकेतील नगरसेवकच नाही तर भाजपचे नेते, आमदार या सगळ्यांचेच मुंबई महापालिकेच्या कामकाजवर लक्ष आहे. भाजप आमदार आशीष शेलार नितेश राणे, अतुल भातखळकर, अमित साटम या सगळ्यांनीच गेल्या काही दिवसांपासून मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार बाहेर काढला आहे. विशेष म्हणजे मुंबईतील प्रत्येक भागात आता भाजपने पोलखोल अभियान सुरू केले आहे. हेच महत्त्वाचे चेहेरे या अभियानात आहेत. मुंबईतील विभागातील भ्रष्टाचार, पालिकेने न केलेली कामे या सगळ्यांवर या अभियानातून लक्ष घातले जाते.

भाजपने मुंबई महापालिकेच्या पेंग्विन देखभाल कंत्राट, रस्ते कामातील कमी दराने निविदा, राणी बाग कामातील निविदा या सगळ्या कामातील निविदेच्या नियमिततेबाबत भाजपने आवाज उठवला होता. विशेष म्हणजे केवळ सत्ताधाऱ्यांवरच नाही, तर प्रशासकावर भाजपचे लक्ष आहे. मुंबई महापालिकेवर प्रशासकाची नियुक्ती झाल्यानंतरही भाजप आक्रमक आहे. नालेसफाईच्या कामाची पाहणी केल्यानंतर भाजपने त्याबाबत असलेल्या त्रुटी आयुक्तांना दाखवून दिल्या आहेत. त्यामुळे भाजप कायम पालिकेच्या कामकाजावर लक्ष ठेवून आहे हे नक्की.

सध्या नालेसफाईच्या कामांची पाहणी केल्यानंतर कोणती कंत्राटे कोणत्या कंत्राटदाराला दिली आहे आणि कोणत्या दराने, किती गाळ बाहेर काढला या सगळ्यांची माहिती सध्या भाजप नेते मिळवत आहे. त्यामुळे लवकरच नालेसफाईच्या कामाबाबत भाजप बोलणार आहे हे नक्की. मुंबई महापालिकेवर प्रशासकाची नियुक्ती केल्यानंतर मुंबईतील विकासकामांचे काहीच प्रस्ताव मंजूर करण्यात आले होते, त्यानंतर नालेसफाईचा प्रस्तवा मंजूर करण्यात आला. मात्र त्याआधी भाजपकडून मुंबईतील नाल्यांची पाहणी करण्यात आली होती. एकीकडे महापालिकेवर प्रशासकाची नियुक्ती केल्यानंतर मुंबईकारांचा वाली कोण अशी परिस्थितीत निर्माण झाली होती. मात्र ज्या पद्धतीने गेले काही दिवस भाजप मुंबईतील कामांचा पाठपुरावा करत आहे, त्यावरून मुंबई महापालिकेने कामात कोणतीही अनियमितता करू नये यासाठीच प्रयत्न असल्याचे पाहायला मिळत आहे.

लवकरच आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत. सत्ताधारी पक्ष शिवसेना आणि भाजप या दोघांचेही पालिका निवडणुकीसाठी जोरदार प्रयत्न पाहायला मिळत आहेत. यात आता उडी घातलीय आहे ती महाराष्ट्र निवनिर्मान सेनेने. त्यामुळे आता होणारी महापालिकेची निवडणूक अटीतटीची होणार आहे. पण सध्या सत्ताधारी पक्षाच्या कामांकडे आणि प्रशासकांच्या हालचालींवर भाजप आणि मनसेचे करडी नजर आहे.

तर निवडणुका पाहता भाजप आधीच अॅक्शन मोडमध्ये आहे. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीसाठी भाजपने आधीपासूनच तयारी करून ठेवली असून मुंबईसाठी महत्त्वाच्या नेत्यांवर जबाबदारी दिली आहे. आमदार नितेश राणे, प्रसाद लाड, आशीष शेलार, अतुल भातखळकर यांसारखे मोठे चेहरे सध्या उतरले आहेत. लोकांमध्ये जाण, संवाद साधणं, समस्या सोडवणं ही सगळी कामे या नेत्यांकडून केली जाऊन घराघरांपर्यंत भाजप पोहोचत आहे. इतकेच नाही तर महापालिकेत होत असलेल्या गैरव्यवहारांना देखील यांनी बाहेर काढल्यामुळे या निवडणुकीत भाजपकडे मतदारांचा कौल जाण्याची शक्यता दिसत आहे.

seemadatte@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -