Thursday, April 24, 2025
Homeसंपादकीयतात्पर्यरूप खुलवणारी रूपाली

रूप खुलवणारी रूपाली

अर्चना सोंडे

मध्यमवर्गीय समाजात एकेकाळी ब्यूटिपार्लरमध्ये जाणं म्हणजे अशिष्ट मानले जाई. नटणं, सजणं म्हणजे जणू नट्यांचाच अधिकार असे समजले जाई. मध्यमवर्गीय कुटुंबातील रूपाली पुढे जाऊन इतर महिलांना सौंदर्य बहाल करणारा व्यवसाय करेल, असे जर कुणी भाकित केले असते, तर त्याला मूर्खात काढले गेले असते. मात्र रूपालीने जिद्द बाळगली. तिच्या जीवनसाथीने तिला तितकीच खंबीर साथ दिली. आज सौंदर्यप्रसाधन क्षेत्रात तिने घट्ट पाय रोवत लेडी बॉस कशी बनते, याचं जिवंत उदाहरण निर्माण केलं आहे. ही लेडी बॉस म्हणजे ग्लॅम व्होग सलोनची संचालिका रूपाली शिंदे-वंजीवाले. रूपाली चारचौघांसारखीच एका टिपिकल मराठी मध्यमवर्गीय कुटुंबातील एक. तिचे बाबा रामचंद्र शिंदे म्हणजे नाकासमोर चालणारी व्यक्ती. आई सुनीता शिंदे पण तशाच साध्या. त्यामुळे रूपाली आणि तिच्या भावंडांवर असेच संस्कार झाले. बाबा एका सिमेंट कंपनीत कामाला होते. एवढ्या जणाचं कुटुंब सांभाळणं हे ऐंशीच्या दशकात तसं एक दिव्यच होतं. मात्र त्यांनी मुलांना उत्तम शिक्षण दिलं. त्यांना चांगले संस्कार दिले. त्यांच्या शिक्षणासाठी कष्ट घेतले. रूपालीने आई-बाबांच्या कष्टाची जाण ठेवत उच्चशिक्षण घेतले. मुलुंड विद्यामंदिरातून तिने शालेय शिक्षण घेतले. सोमय्या महाविद्यालयातून कला शाखेची पदवी मिळवली, तर मुंबई विद्यापीठातून समाजशास्त्र शाखेची पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.

रूपालीला फॅशन डिझाइनर व्हायचं होतं. फॅशन डिझाइनर होण्य़ासाठी भरपूर खर्च असतो हे तिला माहीत होतं. त्यामुळे तिने आपल्या इच्छेला तिलांजली दिली. तिची दुसरी आवड होती ब्यूटिपार्लर. यामध्ये मात्र तिने एका ब्यूटिपार्लरमध्ये नोकरी मिळवली. सकाळी ८ ते रात्री ९ असे तब्बल १३ तास ती ब्यूटिपार्लरमध्ये राबायची. एवढं काम करून पगार मिळायचा फक्त ५०० रुपये. पण रूपाली आनंदात होती. कारण तिला तिच्या आवडीची गोष्ट शिकायला मिळत होती. किती कमाई होते यापेक्षा काय शिकतो हे तिच्यासाठी महत्त्वाचं होतं.

एका वर्षाच्या अनुभवानंतर आपण हे काम स्वतंत्रपणे करू शकतो हा आत्मविश्वास तिला आला. मात्र ब्यूटिपार्लर उभारणं खूप खर्चिक होतं. एवढं भांडवल गाठीशी नव्हतं आणि ते भांडवल देणारा कोणी गुंतवणूकदार देखील ओळखीचा नव्हता. त्यामुळे ब्यूटिपार्लर सुरू करण्याऐवजी फ्रीलान्स काम घेण्य़ास तिने सुरुवात केली. घरी जाऊन ती महिलांचे आपल्या कौशल्याद्वारे सौंदर्य खुलवू लागली. ब्युटी आणि मेकअप ही तिची स्पेशियालिटी ठरली. अशा प्रकारे १६ वर्षे तिने विविध स्त्रियांचे सौंदर्य खुलविण्याची सेवा दिली. एकेकाळी १३ तास नोकरीत राबून महिना ५०० रुपये कमावणारी रूपाली एका वेळेस १२ हजार रुपयेसुद्धा मानधन घेऊ लागली. नोकरी आणि आपला व्यवसाय यातील दरी तिच्या लक्षात आली. या १६ वर्षांत हजारो महिलांना तिने आपल्या कौशल्याने सौंदर्य खुलविण्य़ास सहाय्य केले.

स्वार्थन वंजीवाले यांसोबत रूपालीचा विवाह झाला. रंग तयार करणाऱ्या एका मल्टिनॅशनल कंपनीत उपव्यवस्थापक म्हणून स्वार्थन कार्यरत आहे. लग्नानंतर खऱ्या अर्थाने रूपालीच्या उद्योजकीय आयुष्याला कलाटणी मिळाली. स्वार्थन आणि सासरची सर्व मंडळी रूपालीसोबत भक्कमपणे उभी राहिली. टिटवाळ्य़ाला राहणारी रूपाली मुंबई, नवी मुंबई, ठाणे, बदलापूर अशा ठिकाणी जाई. एवढंच काय तर रायगड, रत्नागिरी, पुणे, अहमदनगर, कोल्हापूर अशा महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांतून रूपालीला ऑर्डर्स असायच्या. ब्युटी, मेकअप, नववधूचा मेकअप ही रूपालीची खासियत होती. किंबहुना या तिन्हींसाठी रूपालीला ऑर्डर्स मिळायची. रूपालीची ती एक ओळखच बनून गेली होती.

रूपालीची प्रवासामुळे होणारी ही दगदग पाहून घरातूनच काम करण्याचा सल्ला सासरच्या मंडळींनी दिला. घरातल्या बेडरूमचं रूपांतर ब्यूिटपार्लरमध्ये झालं. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळू लागला. कोरोना काळ हा खऱ्या अर्थाने खडतर काळ होता. मात्र रूपाली कोरोनाचे सर्व नियम पाळून आपल्या महिलांना आरोग्यदायी सेवा देत होती. “आपण ज्या पद्धतीने मेकअप करता, त्यामुळे मनावरचं दडपण दूर होतं. एकदम रिलॅक्स वाटतं.” महिलांची ही प्रतिक्रिया रूपालीच्या दर्जेदार सेवेची जणू पावतीच ठरते. रूपालीने कोरोना काळातच ठाण्याच्या घोडबंदर येथील हावरे सिटीमध्ये ‘ग्लॅम व्होग

सलून बाय रूपाली’ सुरू केले. आपल्या या व्यावसायिक प्रवासात पती स्वार्थन आणि मुलगा स्वरांश यांचा सिंहाचा वाटा आहे. ते सोबत असल्यामुळेच हा प्रवास सुखकर झाला, असं रूपाली प्रांजळपणे नमूद करते. कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचं असेल, तर आवड महत्त्वाची आहे. याल कष्टाची जोड मिळाल्यास आपण नक्कीच यशस्वी होतो, असा कानमंत्र रूपाली देते.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -