Tuesday, July 16, 2024
Homeसाप्ताहिककोलाजएवढे लक्षात ठेवा...

एवढे लक्षात ठेवा…

माधवी घारपुरे

मातोश्री वृद्धाश्रमाला भेट द्यायची म्हणून आमच्या सोसायटीतल्या आम्ही ज्येष्ठ नागरिकांनी एक बस ठरवली आिण तास दीड तासांची मजा घेत, लहान मुलांच्यासारखा सहलीचा आनंद घेत, वेड्यावाकड्या आवाजात गाणी म्हणत, चेष्टा-मस्करी करत वृद्धाश्रमात पोहोचलो.

आश्रमाचं वातावरण खरोखरीच माेहविणारं होतं. निसर्गाच्या कुशीत, डोंगराच्या रांगांनी वेढलेलं, जवळून जलदायिनी वाहत असलेली, फळभाग आणि नारळांच्या बागेत तो वृद्धाश्रम वसलेला होता. प्रसन्न चित्ताच्या सेवकवर्गाने आमचे स्वागत केले. जरा माहिती करून घेतली. अर्थातच जुजबी कार्यक्रम झाला तोही सर्व ज्येष्ठांच्या बरोबर. नंतर दिवसभर थांबून संध्याकाळी आम्ही परतणार होतो. प्रत्येकजण प्रत्येकाशी बोलत होता. तिथल्या प्रत्येकालाच आम्हाला भेटून आनंद झालेला. त्यांचा चेहरा सांगत होता. सदाकाका म्हणाले, “कुणी भेट द्यायला आले की, आम्हाला वाऱ्याची मंद झुळूक आल्यासारखे वाटते. माणसं, चेहरे, कपडे, बोलणं नेहमीपेक्षा वेगळं कानावर पडतं, नाहीतर आमचा एक विंदावेडा म्हणतो, तसं ‘तेच ते’ अन् ‘तेच ते’.”
नरसोपंत आमच्याकडे एकाला सांगत होते, “टाकून दिल्यासारखे आमच्यासारखे आलेले लोक पाहतात. ‘ती नजर’ आम्हाला जास्त त्रास देते. काही तसे असतीलही पण मी मात्र स्वेच्छेने इथं आलोय. मला पेन्शन आहे. मुलगा नाही. मुलीला त्रास का घायचा?” मी मनात म्हटलं की, अजूनही मुलगा-मुलगी भेद आहेच!

एका कोपऱ्यात एक गृहस्थ होते. ते एक कवितासंग्रह वाचत बसले होेते. मी बोलायचा प्रयत्न केला, पण त्यांनी मला दुर्लक्षित केले. क्षणिक माझा अहंकार जागा झाला. पण त्याची जागा विवेकाने घेतली आणि मी मनाला समजावत पुढे गेले. जाता जाता कानावर शब्द आले, चिंता जगी या सर्व या, कोणा न येई टाळता…

उद्योग चिंता घालवी, एवढे लक्षात ठेवा.

अरेच्चा ! हाच तर तो विंदा वेडा नसेल? कारण ही कविता विंदाची! त्या गृहस्थांना मी नीट पाहून घेतला आणि पुढे गेले. एका आजीला भेटले. ती म्हणाली, “हे बघ पोरी, इथे जेवण नाश्ता, डॉक्टर सगळं चांगलं आहे, पण जोवर आपले हातपाय चालताहेत तोवर सगळे आपले. जागेवर बसलो, आडवे पडलो की, कोणी कुणाचं नव्हे. मग घर काय आणि आश्रम काय” जाता जाता ती त्रिकालाबाधित सत्य सांगून गेली. साडेबारा एकला आम्हाला सर्वांना जेवायला वाढले. जेवण साधेच पण रूचकर होते. आजोबांना कसं बोलतं करायचं?

जेवल्यावर विश्रांती न घेता त्या आजोबांच्या समोर पाठ करून झाडं बघत बघत मी मोठ्याने म्हणू लागले,

“हिरव्या-पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी…”
मागून आजोबांचा आवाज आला, “काय म्हणताय तुम्ही? परत म्हणा”
मला या पायवाटेवरून पुढे रस्ता करता आला. ही कविता त्यांना पूर्ण म्हणून दाखवली. विंदा मला काॅलेजमध्ये शिकवायला होते, हे कळल्यावर तर त्यांना मी फारच जवळची झाले. आमच्या गप्पा चांगल्या रंगल्यावर मी मूळ प्रश्नावर आले जो मला डांचत होता.

“आजोबा, सगळे एकत्र येत असताना तुम्ही मात्र एकटेच असे अलिप्त का बसता?”

ते हसले, “अगं वेडा म्हणतात मला, विंदा वेडा. मी आहेच विंदा वेडा, पण तुला माहीत नाही?” “मी तोतया आहे तोतया.”
“तोतया आणि तुम्ही कुणाचा? काहीतरी काय सांगता?”
“सांगून सांगून थकलो, पण आता जीवन संपत आलं म्हणून त्या विंदाला आणि शेक्सपिअरला जवळ घेऊन बसतो.”

To be or not to be? जगावं की मरावं, हा एकच प्रश्न!

“आजोबा, मला कळेल असं काही सांगता का?”
आजोबा सांगू लागले. मी देहाचे कान करत ऐकू लागले.
“पोरी, मी प्रभाकर. प्रभाकर सुलताने. वडील होते. आता मी नव्वदी केव्हाच ओलांडली. एका सैनिकाचं बांधीव अंग म्हणून अजूनही धडधाकट आहे. मला दोन लहान भाऊ आणि एक बहीण. गोरेगावला आमचा बंगला आहे. भावाची मुलं असतीलही.”

“मग तुम्ही घरी कधी गेलाच नाहीत?”

“न जायला काय झालं? त्याचं असं झालं की, मी सुभाषबाबूंच्या आझाद हिंद सेनेत होतो. कॉलेजला असल्यापासूनच सुभाषबाबूंच्या भाषणांनी प्रेरित झालो होतो. वडिलांच्या परवानगीनेच ग्रॅज्युएट झाल्यावर रितसर सैन्यात दाखल झालो. तुला खोटं वाटेल, पण १९४० ते ४४ चार वर्षे मी सुभाषबाबूंबरोबर होतो. एका बॉम्बहल्ल्यात आमच्यापैकी दहाजण मृत्युमुखी पडले. आम्ही शत्रूच्या एरियात घुसलो होतो.”
मी एकटा बेशुद्ध होतो. ३ दिवस तसाच होतो. पायाला मात्र इजा झाली होती. मला पकडून नेले. माझे हालही बरेच झाले. पण, मला मारले नाही. ६ महिन्यांनंतर माझा पत्ता नाही म्हटल्यावर आम्हा १० जणांच्या घरी आम्ही मारले गेलो, अशी रितसर पत्र गेली.

मी भारतात आलो, तेव्हा स्वातंत्र्य मिळाले होते. खूपच आनंदाने मी घरी परतलो, तर घरातल्या सर्वांनी मला पाहिल्यावर भुताला पाहतोय असं पाहिलं. मला स्पष्ट सांगितलं की, आमचा प्रभाकर गेलेलं सरकारी पत्र आमच्याकडे आहे. तू कुणीतरी तोतया आहेस, तुला इथे थारा नाही. मी आई-बाबांविषयी विचारले, तर हृदयविकाराच्या झटक्याने बाबा गेलेले आणि दोन वर्षांतच लगेच आईपण गेलेली कळले. त्या बॉम्बहल्ल्यापेक्षा आजचे बॉम्ब माझ्यावर पडत होते आणि मी घायाळ होत होतो. मी सगळ्यांच्या जन्मतारखा, लहानपणीच्या घटक, नातेवाईक सारे सारे सांगितले. पण पाणी वाळूत गेले. बहीण जरा विव्हळ झाली, पण दोघा भावांनी तिला मागे खेचले. मी गेल्यावर बाबांनी माझ्या नावावर काही ठेवले नव्हते, पण कायद्याने काही द्यावे लागले तर? ही भीती असावी. मी नुसता राहीन, मला इस्टेट नको, असेही सांगितले, पण व्यर्थ. स्वार्थापोटी पोरी, माणूस माणसाला ओळख देत नाही. शेवटी निरूपायाने मी मित्राकडे गेलो. त्याने मला कडकडून मिठी मारली. महिनाभर तिथे होतो. त्यानेही भावांना समजावण्याचा प्रयत्न केला, पण ते सरकारी पत्र होते ना!

मीच मागे लागलो म्हणून त्याने वृद्धाश्रमात आणले. इथे मला स्वातंत्र्यसैनिक म्हणून निम्मे पैसे केले. ते तोच भरतोय. मित्र गेला पण या काकाचे पैसे त्याची मुले भरतात. स्वातंत्र्यसैनिक म्हणून पेन्शन
मिळावी, यासाठी मित्राने खूप प्रयत्न केले, पण कागदोपत्री माझ्या मृत्यूची नोंद आणि इतर पुरावे मजजवळ काहीच नाहीत. “एकदाच जयहिन्द’ म्हणून पेन्शन घेणारेही आहेत, पण एका दृष्टीने पेन्शन नाही हेच उत्तम. कारण, भारतमातेची सेवा करून त्याचा मोबदला घ्यायचा का? मित्र ऋणासाठी फक्त मी कासावीस होतो. बस झाले, जा आता, असं म्हणून आजोबा उठले. म्हणत होते,

“माणसाला शोभणारे युद्ध एवढेच या जगी
त्याने स्वत:ला जिंकणे, एवढे लक्षात ठेवा…!”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -