नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रणजी ट्रॉफीच्या नॉक-आउट सामन्यांच्या वेळापत्रकात बीसीसीआयने बदल केला आहे. ४ जूनपासून सुरू होणारे उपांत्यपूर्व फेरीचे सामने आता ६ जूनपासून सुरू होणार आहेत. अंतिम सामना २० जूनऐवजी २२ जूनला चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे.
रणजी ट्रॉफीच्या नॉक-आउट सामन्यांच्या वेळापत्रकात केलेल्या बदलाचे कारण बीसीसीआयने स्पष्ट केलेले नाही. मात्र १९ जूनला चिन्नास्वामी स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी२० सामना खेळला जाणार असल्याचे सूत्रांकडून समजते.
दरम्यान त्याच मैदानात रणजी ट्रॉफीचा अंतिम सामनाही खेळला जाणार आहे. त्यामुळे बीसीसीआयने नॉक-आउट सामने पुढे ढकलले असल्याचे सूत्रांकडून समजते. बीसीसीआयने सर्व राज्यांच्या संघांना याबाबत सूचना दिल्या आहेत. नवीन वेळापत्रकानुसार आता उपांत्य फेरीचे सामनेही १२ जूनऐवजी १४ जूनपासून सुरू होणार आहेत. हे सामने बंगळूरमधील विविध स्टेडियममध्ये खेळले जाणार आहेत.
रणजी ट्रॉफीचे लीग स्टेज सामने आयपीएल सुरू होण्याआधी खेळले गेले होते. बंगाल, झारखंड, मुंबई, उत्तराखंड, कर्नाटक, उत्तर प्रदेश, पंजाब आणि मध्य प्रदेश या संघांनी स्पर्धेच्या नॉकआउट सामन्यांसाठी पात्र आहेत. दरम्यान ४ जूनपासून सुरू होणारे उपांत्यपूर्व फेरीचे सामने आता ६ जूनपासून सुरू होणार आहेत. अंतिम सामना २० जूनऐवजी २२ जूनला चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळला जाणार आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांनाही या सामन्यांची उत्सुकता आहे. तसेच खेळाडूही या सामन्यांसाठी सराव करत आहेत.