Tuesday, March 18, 2025
Homeमहाराष्ट्रपालघरबोईसरमध्ये महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ

बोईसरमध्ये महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ

पोलिसांचा धाक उरला नसल्याची चर्चा

बोईसर (प्रतिनिधी) : औद्योगिक नगरी बोईसर-तारापूर परीसरात महिला आणि अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या असून गावगुंड आणि रोडरोमियोंच्या दहशतीने संध्याकाळनंतर महिलांना आपल्या घराबाहेर पडणे मुश्किल झालं आहे. मागील तीन दिवसांत बोईसर परिसरात दोन अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या लागोपाठ दोन घटना घडल्या असून पोलिसांचा धाक उरला नसल्याने गुन्हेगारीचा आलेख सतत वाढत असून कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.

बोईसर पोलीस स्टेशन हद्दीत चोरी आणि घरफोडी याशिवाय अल्पवयीन मुलांचे अपहरण, अमली पदार्थ विक्री यांसोबतच अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढताना दिसत असल्याने पालक भयभीत झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी सालवड शिवाजी नगर येथील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती, तर धोडीपूजा येथील एका लहान मुलाची हत्या करून त्याचा मृतदेह नाल्यात फेकण्यात आला होता. तारापूर औद्योगिक वसाहतीमुळे बोईसर आणि परिसरात लाखो कामगार राहत असून यामध्ये परप्रांतिय कामगारांची संख्या लक्षणीय आहे.

बोईसर परीससरातील धनानी नगर, दांडीपाडा, गणेश नगर, भैय्यापाडा, अवधनगर, धोडीपूजा, सालवड शिवाजीनगर या भागात असलेल्या झोपडपट्टीमध्ये अनेक गावगुंड, पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार, अमली पदार्थ विक्री करणारे, सोनसाखळी चोर सारखे अट्टल गुन्हेगारांचे वास्तव्य असून त्याचबरोबर शहरातील विविध शाळा-कॉलेजेस आणि क्लासेसचा परिसर, एसटी बस डेपो परिसर, ओसवाल ड्रीम हाऊस, गोकुळ स्वीट कॉर्नर, यशपद्मा बैठक कॅफे, साईबाबा मंदिर, नवापूर नाका, यशवंतसृष्टी, चित्रालय परिसर, रेल्वे ट्रॅकनजीकची झोपडपट्टी, परमिट बार, पानटपऱ्या आणि पडिक जागा या ठिकाणी रोडरोमिओ, गावगुंड, ड्रगिस्ट, चरशी, गांजाफूके, दारूडे, गर्दुल्ले यांचा दिवस-रात्र अड्डा जमत असून एमआयडीसीत काम करणाऱ्या महिला, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थिनी आणि बाजारात खेरेदीसाठी येणाऱ्या महिला यांची छेडछाड, अश्लिल हावभाव, द्विअर्थी कमेंट्स करित महिला आणि मुलींना खजिल केले जात आहे. यामुळे संध्याकाळनंतर महिला आणि मुलींना घराबाहेर पडणे मुश्किल झाले असून बाहेर गेलेली आपली मुलगी सहिसलामत घरी परतेल की नाही, या चिंतेत पालकवर्ग आहे.

गुन्हेगारांवर वचक ठेवण्यात बोईसर पोलीस कमी पडत असल्याची भावना नागरिकांमध्ये असून गर्दीच्या ठिकाणी तसेच गावगुंड आणि रोडरोमियोंच्या नेहमीच्या अड्ड्यावर साध्या वेशातील पोलिसांनी नियमीत गस्त घालणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे अट्टल गुडांचे आश्रयस्थान असलेल्या संशयित जागांवर वेळोवेळी कोंबिंग ऑपरेशन करून आपला धाक निर्माण करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्याचबरोबर पोलीस स्टेशनमध्ये आपल्या तक्रारी घेऊन येणाऱ्यांच्या तक्रारींचीदेखील योग्य शहानिशा करून त्यावर जलद कार्यवाही करणे आवश्यक आहे, तरच बोईसर परिसरातील बिघडेली कायदा-सुव्यवस्था पुन्हा रूळावर येण्याची शक्यता आहे.

सध्या शहरात अमली पदार्थांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याच्या गंभीर घटना समोर येत आहेत. त्याचबरोबर बोईसर शहरात काही महिन्यांपासून महिला अत्याचाराच्या घटनेत ही वाढ झाली आहे. या घटना समाजाला काळीमा फासणाऱ्या असून अशा विकृत माणसांवर तत्काळ कठोर कारवाई पोलीस प्रशासनाकडून केली, तर अशा घटनांना कुठे तरी आळा बसून बोईसरसह जिल्ह्यातील महिला स्वतःला सुरक्षितपणाची भावना त्यांच्यात निर्माण होऊ शकते.
– भावना विचारे, जि. प. सदस्य पालघर, बविआ पालघर जिल्हा महिला अध्यक्ष

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -