डॉ. पल्लवी परुळेकर – बनसोडे
‘त्यांच्या भकास डोळ्यांत
नव्हत्या बाहुल्या दृष्टीच्या
मी डोळस तरीही
अंध जाहल्या सावल्या सृष्टीच्या…’
लग्नानंतर जवळजवळ तब्बल दहा-बारा वर्षांनी पुन्हा एम.ए.ला प्रवेश… माहेरचं फुलपाखरी जीवन संपलं आणि शहाणपणाचं सासर जबाबदारीचं अस्तित्व समजावून गेलं… मनातल्या तळघरात आपण काहीच करत नाही, ही खंत ढोपरात डोकं घालून बसली होती… वर मान करून राहून गेलेलं सारं पुन्हा करण्यासाठी आतला आवाज धडपडत होता. अनुभवांचं गाठोडं सोबत होतंच… आयुष्याचे मार्मिक ओरखडेही सोबतीला होतेच. शिक्षण हेच एक माध्यम आहे जे स्वतःला सिद्ध करण्यासाठी पूरक आहे. उशिरा का होईना, पण आयुष्याचे अनुभव मला घडवत होते. कित्येक प्रसंग जगायचं कसं, जगणं कसं असतं याचे दाखले देत मला घडवत होतं आणि मला घडायचं होतं, शिकायचं होतं… ‘स्व’ जाणीव जिवंत ठेवायची होती.
असेच एकदा संसाराच्या रामरगाड्यातून उसंत काढत रोजच्याच बेताच्या मानसिकतेत निघाले. घुसमटलेला प्रवास श्वास रोखत रोखतच पावलांसोबत चालत होता. रिक्षा, ट्रेन, बस मग पायी निघत एकदाचा एम. ए. मराठी भाग दोनचा वर्ग आला.
प्रयत्न करूनही उशिरा पोहोचल्याची खंत सोबत होतीच; परंतु… ‘वाट तुडवताना’ उत्तम कांबळे यांचं पुस्तक शिकायला मिळणार याची उत्सुकताही होतीच… वर्गावर पोहोचले. वृषाली एकटीच वर्गात. थोडंसं दार लोटून मी आत शिरले. सरांचं शिकवणं सलग चालू होतं. मी आल्याचं त्यांना जाणवलं नाही. ते शिकवत राहिले. मीही चटकन वही काढून पानावर संदर्भ मांडत गेले. पुस्तक समोर ठेवून बोटं फिरवत वाचावं तसं ते बोलत होते. जणू काही आपण पुस्तकच वाचतोय. अधूनमधून ‘काही प्रश्न आहेत का?’ ते विचारत होते. पुन्हा सलग आशय चालू. आत्मकथनाच्या नायकाने आत्मकेंद्री होऊन निवडलेली वाट कोणकोणत्या वळणाने गेली, त्याचं आत्मभान, सामाजिक दृष्टिकोन, वाचनाच्या भुकेने नायकाचा ‘स्व’ कसा विकसित होत गेला, याचं विश्लेषण करत सर बोलत होते. कुठेही न थांबता, न विसरता ते सलग विषय मांडत होते. काही वेळानंतर मी लिखाणापेक्षा श्रवण भूमिका स्वीकारली. एरव्ही पुस्तक वाचताना किंवा पुस्तक वाचून झाल्यावरही काही गोष्टी अस्पष्ट होत जातात; परंतु सरांचं मात्र तसं होत नव्हतं. ते सलग एकाच गतीने पान उलगडत होते. अजून एक अपंगत्व मी जवळून पाहत होते उघड्या डोळ्यांनी…
त्याचक्षणी सकाळचा तो प्रसंग आठवला. नायगाव स्टेशनला मी लेडीज डब्या ठिकाणी चर्चगेट गाडीसाठी उभी होते. त्यावेळी माझ्या शेजारी एक अंध व्यक्ती उभी होती. थोड्याफार फरकाने त्यावेळी त्या अंध व्यक्तीला त्यांच्याच ओळखीच्या बाईंनी प्रश्न केला की, “तुम्हाला कसं कळतं की डबा इथे येणार?” त्यावर ते चटकन म्हणाले, ‘हे वर मशीन जे टिक्-टिक् करतं. त्या आवाजाच्या सावल्या आम्हाला सावध करतात. तो सिग्नल असतो आमच्या अंधत्वाचा…’ चेहऱ्यावर पुसटसंही दुःख नव्हतं त्या आंधळेपणाचं, उलट मिश्कीलपणाचा जणू बुरखा पांघरलेला… एरव्ही कधीही नजरेस न आलेली, ऐकलेली ती टिक् टिक् मला अस्वस्थ करून गेली. त्यानंतर आज पुन्हा साबळेसरांचं नुसतं पांढरं फिरणारं बुब्बुळ, पुसटसाही काळा ठिपका नसलेलं या जाग्या डोळ्यांना अंध करत होतं. प्रसन्न चेहरा, शिकविण्याची कसब, आत्मविश्वास डोळसांना लाजवणारा. डोळे असूनही ते आयलायनर, नाहीतर काजळाने रंगवून सौंदर्य मिरविणारे आम्ही आणि गॉगल्सच्या नावाखाली वासनेच्या नजरा चुकवणारा चेहरा या पलीकडे काहीच समोर येत नव्हतं.
याच विचारात आणखी एक अंध आठवण पाय पसरून बसली. परवा लेक्चरसाठी आम्ही तिघी बाईंची वाट पाहत बाहेर थांबलो होतो. तेवढ्यात एक बाई दुसरीचा हात धरून पायरी चढली आणि जवळच असलेल्या आमच्या प्यूनकाकांनी विचारलं, “लॅपटॉप लागेल का? काढून ठेवू ?”
त्यावर त्या म्हणाल्या, “हो काका, प्लीज.” मला कळेनाच या अंध बाई आणि लॅपटॉप… विषय तिथेच सुटला होता… पण आज तेही अंधत्व मला नजरेआड करता येत नव्हतं. लाज वाटत होती स्वतःची. डोळ्यांत वेदनेचं जडत्व साचलं. पापण्यातल्या त्या अश्रूंत सारं अंधुक भासलं. तेव्हा खरंतर त्यांच्या अंधत्वाची तीव्रता माझ्या डोळ्यांनी सोसली…
पहलगाममध्ये निष्पाप हिंदू पर्यटकांवर थेट धर्म विचारून गोळ्या झाडण्यात आल्या... ३७० हटवल्यानंतर, काश्मीरने लोकशाहीच्या दिशेनं…
नवी दिल्ली : काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा परिपाक आता भारत सरकारने कठोर…
जम्मू-काश्मीरमधील निसर्गसंपन्न, सुंदर ठिकाण म्हणजे पहेलगाम. अनेक वर्षांपासून इथे पर्यटकांची मोठी वर्दळ असते. पण नुकताच…
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा परिणाम माता वैष्णवदेवी यात्रेवरही पाहायला मिळत आहे. जम्मू काश्मीर: पहलगाममधील (Pahalgam Terror…
काश्मीरच्या निळ्याशार आकाशाखाली, निसर्गाच्या कुशीत… पुन्हा एकदा दहशतीचा अंधार दाटलाय. निसर्गदृश्यांचं स्वर्ग जिथं वाटायचं, तिथंच…
मुंबई: अनेक लोकांना हा प्रश्न पडला आहे की सोन्याचे भाव १ लाख पर्यंत कसे पोहोचले.…