नवी दिल्ली : इलेक्ट्रीक स्कूटरमध्ये आगी लागण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. यात काही जणांचा मृत्यूही झाला आहे. यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या कंपन्यांना फॉल्टी स्कूटर रिकॉल करण्याचे आदेश दिले होते. आता त्यांच्या मंत्रालयाने या वाहन कंपन्यांना नव्या स्कूटर, बाईकचे लाँच थांबविण्याचे आदेश दिले आहेत.
जोवर इलेक्ट्रीक स्कूटरला का आग लागतेय, याचा तपास पूर्ण होत नाही, तोवर नवीन स्कूटर, बाईकचे लाँचिंग थांबविण्यास या कंपन्यांना सांगितले आहे. रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने इलेक्ट्रीक स्कूटर उत्पादन करणाऱ्या कंपन्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत कठोर पाऊल उचलण्यात आले आहे.
जोवर दुचाकींना लागणाऱ्या आगीचे कारण स्पष्ट होत नाही किंवा त्यावर उपाययोजना, दुरुस्ती केली जात नाही तोवर इलेक्ट्रीक कंपन्यांनी त्यांच्या नव्या स्कूटर लाँच करू नयेत, असे तोंडी आदेश देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. नितीन गडकरी यांनी गेल्या आठवड्यात इलेक्ट्रिक वाहन निर्मात्यांना आगीच्या घटनांनंतर सदोष इलेक्ट्रिक दुचाकी परत मागवण्यास सांगितले होते. यानंतर Ola, Okinawa आणि Pure EV ने जवळपास ७००० स्कूटर माघारी बोलविल्या आहेत.
सोमवारी या कंपन्यांचे अधिकारी आणि गडकरींच्या मंत्रालयांचे अधिकारी यांच्यात या कारणावरून बैठक झाली. यावेळीही कंपन्यांना या स्कूटर माघारी बोलविण्यास सांगण्यात आले. यासाठी या कंपन्यांना मोटर वाहन कायद्याची देखील आठवण करून देण्यात आली. यामध्ये सरकार देखील ही वाहने माघारी बोलवून घेऊ शकते आणि कंपन्यांवर जबर दंड आकारू शकते, असे सांगण्यात आले. तसेच ज्या कंपन्यांच्या स्कूटरना अद्याप आगी लागण्याचे प्रकार घडलेले नाहीत, त्यांनाही यातून सूट देण्यात आलेली नाही. या कंपन्यांनीही सुधारणा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.