Sunday, May 4, 2025

महामुंबई

३३७ अतिधोकादायक इमारती

३३७ अतिधोकादायक इमारती

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेने मुंबईतील सी-१ श्रेणीतील अतिधोकादायक व मोडकळीस आलेल्या इमारतींची यादी जाहीर केली असून मुंबईत एकूण ३३७ अतिधोकादायक इमारती आहेत, तर ३३७ इमारतींपैकी मुंबई शहर विभागात ७०, पूर्व विभागात १०४, तर पश्चिम उपनगरात सर्वाधिक १६३ इमारती आहेत.

दरम्यान मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दर वर्षी पावसाळापूर्व विविध कामे आणि उपाययोजना केल्या जातात. नाल्यांमधून गाळ काढणे, रस्ते दुरुस्ती यांच्यासोबतच मुंबई महानगरातील निवासी घरांची आणि अनिवासी जागांची तपासणी करुन त्यांची धोकादायक आणि अतिधोकादायक श्रेणी निश्चित केली जाते. त्यानुसार मुंबईतील निवासी व अनिवासी इमारतींचे सर्वेक्षण नुकतेच करण्यात आले होते. यात अतिधोकादायक ३३७ इमारती समोर आल्या आहेत.

तर मुंबई शहर विभागात ७० इमारती अतिधोकादायक घोषित करण्यात आल्या आहेत. या ७० इमारतींमध्ये ए विभाग ४, बी विभाग ४, सी विभाग १, डी विभाग ४, ई विभाग १२, एफ/दक्षिण विभाग ५, एफ/उत्तर विभाग २६, जी/दक्षिण विभाग ४ आणि जी/उत्तर विभाग १० अशा विभागनिहाय इमारतींचा समावेश आहे. पश्चिम उपनगरांचा विचार करता १६३ पैकी एच/पूर्व विभागात ९, एच/पश्चिममध्ये ३०, के/पूर्व विभागात २८, के/पश्चिम विभागात ४०, पी/दक्षिण विभागामध्ये ३, पी/उत्तर विभागात १३, आर/दक्षिण विभागात १०, आर/मध्य विभागामध्ये २२ आणि आर/उत्तर विभागात ८ इमारती सी-१ श्रेणीमध्ये समाविष्ट आहेत. पूर्व उपनगरातील १०४ इमारतींपैकी एम/पश्चिम विभागात १६, एम/पूर्व विभागामध्ये १, एल विभागात १२, एन विभागात २०, एस विभागात ६ आणि टी विभागात ४९ इमारतींचा समावेश आहे.

विशेष म्हणजे या अतिधोकादायक व मोडकळीस आलेल्या इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांनी नागरिकांनी त्वरित निवासस्थान रिक्त करावे, तातडीने सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे तसेच या इमारत स्वतःहून मालकांनी निष्कासित कराव्यात, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे. धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतीत राहणाऱ्या नागरिकांनी खबरदारीची उपाययोजना म्हणून त्वरित सुरक्षितस्थळी स्थलांतरित व्हावे, असे आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. संजीव कुमार आणि उपआयुक्त (अतिक्रमण निर्मूलन) चंदा जाधव यांनी प्रशासनाच्या वतीने केले आहे.

तसेच अतिधोकादायक इमारतींबाबत अधिक माहितीसाठी महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाच्या १९१६ / २२६९४७२५ / २२६९४७२७ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. कोणत्याही प्रकारची हानी टाळण्याच्या दृष्टीने जागरुक राहणे, ही नागरिकांची देखील जबाबदारी असून त्याकामी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

Comments
Add Comment