Wednesday, April 23, 2025
Homeकोकणरायगडमोठ्या मच्छीमार नौकांना डिझेल कोटा व परतावा मिळणार

मोठ्या मच्छीमार नौकांना डिझेल कोटा व परतावा मिळणार

मोठ्या मच्छीमारांना दिलासा

अलिबाग (प्रतिनिधी) : १२० अश्वशक्तीपेक्षा जास्त इंजिन क्षमता असणाऱ्या यांत्रिकी मासेमारी नौकांना १२० अश्वशक्तीची मर्यादा काढून डिझेल कोटा व डिझेल परतावा पूर्ववत करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी दिले आहेत. त्यामुळे मोठ्या नौका असणाऱ्या मच्छीमारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मच्छीमार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत सह्याद्री अतिथीगृह येथे मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी झालेल्या चर्चेत याबाबतच्या सूचना देण्यात आल्या. राज्य सरकारने मोठ्या म्हणजे १२० अश्वशक्तीपेक्षा मोठ्या इंजिन क्षमतेच्या यांत्रिकी मच्छीमार नौकांचा डिझेल कोटा आणि परतावा रोखला होता.

यासंदर्भात मच्छीमार संस्थांनी त्यांच्याकडे संपर्क साधून तो पूर्ववत करण्याची विनंती केली होती. सद्यस्थितीत मासेमारी पद्धतीमध्ये झालेले बदल, मासेमारीचे क्षेत्र, मासेमारी सफरीचे दिवस व इतर सर्व बाबींचा विचार करता १२० अश्वशक्तीपेक्षा जास्त इंजिन क्षमता असणाऱ्या नौकांना डिझेल कोटा व प्रतिपूर्ती मंजूर करण्याची तरतूद शासन निर्णयामध्ये करण्याची आवश्यकता आहे. याबाबत शुद्धीपत्रक काढून लवकरच १२० अश्वशक्तीवरील यांत्रिकी नौकांना करमुक्त डिझेल परतावा सुरू करण्याचे निर्देश विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

राज्यातील यांत्रिकी नौकांसाठी सन २००५ पासून मूल्यवर्धित कर प्रतिपूर्ती योजना राबवण्यात येत आहे. राज्यातील १७० मच्छीमार सहकारी संस्था या योजनेचा लाभ घेत आहेत. या योजनेनुसार मच्छीमार सहकारी संस्थाना यांत्रिकी मासेमारी नौकांसाठी खरेदी केलेल्या डिझेलच्या मूल्यवर्धित कराची रक्कम थेट लाभार्थी हस्तांतरणाद्वारे मच्छीमार लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यात येते. तथापि, १४ जानेवारी १९९७ च्या अर्धशासकीय शासन पत्रानुसार या योजनेस पात्र होण्यासाठी ६ सिलेंडर व १२० अश्वशक्ती क्षमतेच्या मर्यादेची अट टाकण्यात आली होती.

१५ ते २२ फेब्रुवारी २०२१ या कालावधीमध्ये ठाणे व पालघर येथील मत्स्यव्यवसाय विभागाच्या कार्यालयाचे महालेखापाल यांच्याकडून लेखापरिक्षण करण्यात आले. लेखापरिक्षण अहवालामध्ये सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय, ठाणे-पालघर कार्यालयाकडून १२० अश्वशक्तीवरील सहा सिलेंडर क्षमतेच्या नौकांना डिझेल कोटा व त्यानुसार कर परतावा मंजूर केला असल्याबाबत आक्षेप नोंदवण्यात आला होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -