लता मंगेशकर पुरस्कार देशवासीयांना समर्पित
पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर’ पुरस्कार पंतप्रधान मोदींना प्रदान
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मी पुरस्कार शक्यतो टाळतो. पुरस्कारांमध्ये रमणारा माझा पिंड नाही; परंतु लतादीदींच्या नावाने देण्यात येणारा पुरस्कार मी टाळू शकतच नव्हतो. माझे ते दायित्वच होते. लतादीदींचे सूर हे युवा पिढीसाठी प्रेरणादायी असून संगीताची शक्ती ही लतादीदींमधून दिसली. लतादीदींच्या गाण्यांमध्ये राष्ट्रभक्तीची अनुभूती असून मला मिळालेला हा पुरस्कार मी सर्व देशवासीयांना अर्पण करतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले.
मास्टर दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानच्या वतीने रविवारी षण्मुखानंद सभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पहिला-वहिला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले, उषा मंगेशकर आणि आदिनाथ मंगेशकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
या वर्षीपासून सुरू झालेल्या गानसम्राज्ञी ‘लता दीनानाथ मंगेशकर’ या पहिल्या पुरस्काराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले मानकरी ठरले आहेत.
मोदी पुढे म्हणाले, लतादीदी प्रत्येकाच्या होत्या. त्यामुळे त्यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कारही प्रत्येकाचाच आहे, संगीत फक्त साधना नाही, तर ती भावना आहे. अव्यक्तला व्यक्त करणारे शब्द, ऊर्जा, चैतन्य देणारा नाद, यांचा मिलाफ म्हणजे संगीत आहे. संगीताची ही ताकद म्हणजे लतादीदी होत्या. आम्ही सौभाग्यवान आहोत की, लतादीदींना पाहू शकलो. मंगेशकर कुटुंबाने संगीताच्या या यज्ञात पिढ्यान् पिढ्यांची आहुती दिली आहे. लतादीदी कर्तृत्वाने मोठ्या होत्या. संगीतक्षेत्रावर तब्बल ८० वर्षे त्यांनी आपला ठसा उमटवला. ग्रामोफोन, रेकॉर्ड, कॅसेट, सीडी, पेनड्राइव्ह ते ऑनलाइन, अशा सर्व स्थित्यंतराच्या त्या साक्षीदार होत्या. देशाच्या या अमृत महोत्सवी वर्षांत मंगेशकर कुटुंबाचे योगदान प्रत्येक घरात पोहोचले पाहिजे, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमास राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, उषा मंगेशकर, आशा भोसले, आदिनाथ मंगेशकर, उद्योग मंत्री सुभाष देसाई, भाजप नेते विनोद तावडे आदी उपस्थित होते. संस्थाध्यक्ष पं. हृदयनाथ मंगेशकर प्रकृती अस्वास्थ्यामुळे हजर राहू शकले नाहीत. ते रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे आदिनाथ मंगेशकर यांनी स्पष्ट केले.