Tuesday, April 29, 2025

महामुंबई

महापे औद्योगिक क्षेत्रातील नाल्यांमध्ये रासायनिक द्रव्यांचे साम्राज्य

महापे औद्योगिक क्षेत्रातील नाल्यांमध्ये रासायनिक द्रव्यांचे साम्राज्य

नवी मुंबई (प्रतिनिधी) : येथील महापे एमआयडीसी क्षेत्रातील नाल्यात रासायनमिश्रित पाणी सोडल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नवी मुंबई शहराच्या पूर्वेला औद्योगिक कारखाने बसविलेले आहेत. या ठिकाणी आजही रस्त्यांची समस्या उग्ररूप धारण करून बसली आहे. त्याचबरोबर वृक्ष संवर्धनाचा विषय तर नेहमीच पटलावर येत असतो. त्यातच महापे एमआयडीसीमधील नाल्यांची अवस्था गंभीर स्वरूपात अडकल्याने नैसर्गिक नाले वाचवावेत, या मगणीला जोर धरू लागला आहे. या आधुनिक शहरातील नाल्यांची अवस्था पाहून बाहेरून कामानिमित्त आलेल्या घटकांकडून इतर एमआयडीसीमधील ठिकाणांची परिस्थिती चांगली असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

रासायनिक कारखान्यात निघालेल्या रासायनिक द्रव्यावर प्रक्रिया करून ते वास्तविकपणे एसटीपी प्लॅन्टमध्ये सोडलाे पाहिजे. यामागे विविध प्रकारच्या सजीवांची हानी होऊ नये तसेच प्रदूषणात वाढ होऊ नये, अशा प्रकारचा उद्देश आहे; परंतु आजच्या घडीला महापे एमआयडीसीमधील असलेले नैसर्गिक नाले मात्र लालसर व काळसर रासायनिक द्रव्याने ओसंडून वाहताना दिसून येत आहेत. दुसरीकडे, नाले स्वच्छ करण्यात येत नसल्याने घाणीचे साम्राज्य पसरल्याचे दिसत आहे. झाडेझुडपे वाढल्याने परिसरातील सौंदर्य नष्ट पावले आहेत. यावर उपाययोजना करणे अत्यंत अत्यावश्यक असल्याचे येथील व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

दरम्यान, मी स्वतः रस्ते, रुग्णालये, स्वच्छतागृहे सुसज्ज असावेत म्हणून अनेकदा विधान परिषदेत विषय मांडले आहेत. पण नैसर्गिक उत्पत्ती झालेल्या नाल्यांची अवस्था भयानक आहे. यावरही जाब विचारला जाईल.तसेच रासायनिक द्रव्ये नाल्यात सोडणे ही गंभीर समस्या आहे, असे आमदार रमेश पाटील यांनी म्हटले आहे. कार्यकारी अभियंता राठोड यांना नाल्याच्या समस्या सोडविण्यास सांगितले जाईल, असे एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी सतीश बागल यांनी म्हटले आहे.

Comments
Add Comment