Saturday, March 15, 2025
Homeमहत्वाची बातमीबाजारातील घातक खेळण्यांपासून सावधान

बाजारातील घातक खेळण्यांपासून सावधान

ज्योती मोडक

अलीकडेच वर्तमानपत्रातून लागोपाठ दोन वेळा आलेल्या एका गंभीर बातमीने लक्ष वेधून घेतले. बोरिवलीच्या एका मॉलमध्ये ‘स्टीकरविना’ विक्री करण्यात येणाऱ्या खेळणी विक्रीवर बीआयएसकडून कारवाई करण्यात आली. तसेच गोरेगाव येथील एका मॉलमध्येही अशाच तऱ्हेने मानकांशिवाय विक्री होत असलेली खेळणी जप्त करण्यात आली.

मंडळी, मॉलमध्ये खरेदी करण्यासाठी जाणारा ग्राहक वर्ग हा सर्वसाधारणपणे मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय असतो. जर का अशा ग्राहक वर्गाची फसवणूक होत असेल तर रस्त्यावर कित्येक ठिकाणी आपण लहान मुलांसाठी विकण्यात येणारी सॉफ्ट टॉईज, प्लास्टिक खेळणी बघत असतो, मग या खेळण्यांच्या गुणवत्तेचे काय? लहान मुलांच्या आरोग्याशी या खेळण्यांचा थेट संबंध येतो मग जपली जाते का ही गुणवत्ता? जपले जाते का मुलांचे आरोग्य? असे अनेक प्रश्न मनात घर करतात.

लहान मुलांची खेळणी खरेदी करताना काही गोष्टींची नक्कीच खबरदारी घेतली पाहिजे. मुलांच्या बौद्धिक विचारांना चालना देतील अशी खेळणी खरेदी करण्याचाच आग्रह धरायला पाहिजे, ती उत्तम गुणवत्तेचीच. खेळण्यामुळे मुले हिंसक/आक्रमक होतील अशा खेळण्यांची खरेदीच टाळायला हवी. खेळण्यांमध्ये छोटे भाग (Part) असतील तर ४ वर्षांच्या आतल्या वयाच्या मुलांच्या नाकात/घशात जाऊन अडकण्याची शक्यता असल्याने अशी खेळणी लहान मुलांसाठी घेऊ नये हेच श्रेयस्कर.

मंडळी, काही खेळण्यांची गुणवत्ता इतकी कमी दर्जाची असते की मुलांच्या मेंदूवर आणि मज्जासंस्थेवरही विपरीत परिणाम होऊ शकतात. शिशाची संयुग आरोग्याला हानिकारक असतात. भारतीय मानक संस्थेने (ब्युरो ऑफ इंडियन स्टॅण्डर्ड) १९ मे २०२१ रोजी काढलेल्या सूचनेनुसार १४ वर्षांखालील मुलांची जी खेळणी उत्पादक तयार करतील त्यांना ती खेळणी भारतीय मानक संस्थेकडून (Bureau of Indian Standards) प्रामाणित करून घ्यावीच लागतील.

ही खेळणी बराच काळ मुलांची करमणूक करतात, त्यांना खेळण्यात गुंतवून ठेवतात. पण म्हणूनच पालकांनी या खेळण्यांची निवड करताना त्याची गुणवत्ता, त्याचा दर्जा या बाबतीत फार जागरूक राहायला हवे. कारण गेल्या एका वर्षात ४ वयोमानापेक्षा लहान मुलांच्या बाबतीत एक लाखापेक्षा जास्त झालेल्या अपघातांवर इस्पितळात उपचार करावे लागले असा नॅशनल सेफ किड प्रोग्रॅमचा अहवाल सांगतो (National safe kid programme).

भारत सरकारने २५ फेब्रुवारी २०२० रोजी DPIIT (Department for promotion of Industry & Internal Trade) अंतर्गत, मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्री, भारत सरकार यांचेकडून जे आदेश जारी केले आहेत त्यानुसार १ सप्टेंबर २०२० पासून खेळणी मग ती उत्पादित केली गेली असोत, साठा करून स्टोअरमध्ये ठेवली असोत किंवा जी विकण्यासाठी ठेवली असोत ती सर्व खेळणी, भारतीय मानक संस्थेच्या २०१८, रेग्युलेशन्सच्या स्कीम १ श्येड्युल २ नुसार प्रमाणित केलेली असलीच पाहिजेत. जे उत्पादन आपल्या देशात केले गेले असेल, अशा उत्पादकांना ‘manak online’ या पोर्टलवर जाऊन सदर उत्पादनासाठीचे प्रमाणपत्र मिळू शकते. या उत्पादकांचे अर्ज पुढे फॉरेन मॅन्युफॅक्चुरर सर्टिफिकेशनकडे पाठविण्यात येतात. यू. एन. एन्व्हायरोमेंट प्रोग्रॅमच्या (UN Environment Programme) अहवालानुसार २५ टक्के खेळण्यांमध्ये आरोग्यास हानिकारक, असे रासायनिक द्रव्य असते. प्लास्टिक टॉइज तसेच इतर प्लास्टिक उत्पादनांना विशिष्ट प्रकारचा कडकपणा (hardness) किंवा इलास्टिसिटी (elasticity) देण्यासाठी केमिकल अॅडेटिव्हजचा (chemical Additives) वापर केला जातो. ही अॅडेटिव्हज मुलांच्या आरोग्याला घातक असतात. अशा तऱ्हेचा वापर असलेली वेगवेगळी २८ खेळणी (उत्पादने) बाजारातून परत मागविली गेली.

पीव्हीसी (Polyvinyl chloride) प्लास्टिकमध्ये जी काही रासायनिक मिश्रणं असतात ती मुलं आणि लहान बाळांच्या आरोग्यास घातक होऊ शकतात. छोटी मुलं जेव्हा ही खेळणी तोंडामध्ये घालतात, तेव्हा खेळण्यांमधून हे रासायनिक मिश्रण मुलांच्या तोंडात जाऊ शकते.

मंडळी, तेव्हा मुलांसाठी खेळणी/टॉइज खरेदी करताय, तर खूपच सावधानी बाळगा. या खेळण्यासाठीचे BIS प्रमाणपत्र म्हणजे ते एक त्रयस्थपक्षाकडून (Third Party) कडून त्या खेळण्याच्या दर्जाबद्दल, सुरक्षिततेबद्दल, खरेपणाबद्दलचे प्रमाणपत्र आहे, जे ग्राहकांसाठी खूप गरजेचे आहे. (BIS) ही ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध आहे. पूर्वी असे प्रमाणपत्र घेणे ऐच्छिक होते. पण आता शासनाने/भारतीय मानक संस्थेने ते अनिवार्य (mandatory) केले आहे. हे प्रमाणपत्र (Certificate) नसल्यास अशा तऱ्हेने केलेली विक्री ही गुन्हेगारी स्वरूपाची होते आणि त्यासाठी तुरुंगवास किंवा मोठी दंडात्मक कारवाई होऊ शकते हे लक्षात ठेवा.

सरकारी यंत्रणेकडून अशा तऱ्हेची कारवाई/चौकशी वेळोवेळी होत राहते/होत राहीलच. पण एक ग्राहक म्हणून खरेदी करताना आपण जागरूकपणे, चोखंदळपणे दर्जा आणि सुरक्षिततेची जबाबदारी ओळखूनच खरेदी केली पाहिजे हे सतत लक्षात ठेवायला हवे. तसेच अशा तऱ्हेची गुन्हेगारी स्वरूपाची विक्री कुठे होते आहे असे आढळून आल्यास त्याची माहिती शासकीय यंत्रणेला देणे/भारतीय मानक संस्थेला देणे, (फोन- ०२२-२८३१७८९२- Email – complaint @bis.gov.in) हे जागरूक ग्राहक म्हणून आपले कर्तव्य आहे.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -