मुंबई (प्रतिनिधी) : आयपीएलच्या १५व्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सच्या कंपूमध्ये कोरोना विषाणूने प्रवेश करताना खळबळ उडवून दिली आहे. न्यूझीलंडचा यष्टिरक्षक, फलंदाज टिम सीफर्ट हाही बाधित आढळल्याने संघाच्या कोरोना पॉझिटिव्ह सदस्यांची संख्या सहावर गेली आहे.
सर्वोतोपरी काळजी घेऊनही आयपीएल २०२२साठीच्या बायो बबलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला. अष्टपैलू मिचेल मार्श याच्यासह पाच सदस्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आला असतानाच सीफर्ट याचाही अहवाल आला. त्यालाही कोरोनाने ग्रासले. कोरोनाची लागण झालेला मार्शनंतरचा तो दुसरा परदेशी क्रिकेटपटू ठरला. सीसीसीआयच्या ब्रेबॉर्न स्टेडियमवर बुधवारी झालेल्या पंजाब किंग्जविरुद्धच्या सामन्यापूर्वी आणखी एक क्रिकेटपटू बाधित झाल्याने त्यांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे.
कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे, त्यांना नियमानुसार सराव सत्रात सहभागी होता येईल. अजूनही काही रिपोर्ट यायचे बाकी आहेत. एकदा संपूर्ण चित्र स्पष्ट झालं की निर्णय घेतला जाईल, असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले. १६ एप्रिलपासून दिल्ली कॅपिटल्सच्या प्रत्येक सदस्याची आरटी-पीसीआर चाचणी केली जात आहे. १९ एप्रिलपर्यंत चौथ्या फेरीअखेरीस आलेल्या रिपोर्टमध्ये सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. २० तारखेचा सकाळी त्यांची आणखी एक आरटी-पीसीआर चाचणी घेतली गेली, असे त्यांनी पुढे सांगितले.
१५ क्रिकेटपटूंसह संघ स्टेडियमवर
सीफर्ट पॉझिटिव्ह आल्याचे कळताच बीसीसीआयने दिल्ली कॅपिटल्सच्या सर्व सदस्यांना आपापल्या रूममध्येच राहण्याच्या सूचना केल्या. या दरम्यान पंजाब किंग्जचा संघ ब्रेबॉर्न स्टेडियमवर पोहोचून सरावालाही लागला होता. सामना सुरू व्हायला तास शिल्लक असताना दिल्लीचा संघ केवळ १५ क्रिकेटपटू व निवडक सपोर्ट स्टाफ सदस्यांसह स्टेडियमवर दाखल झाला आहे.
राजस्थानविरुद्धचा सामना आता वानखेडेवर
पंजाबविरुद्धच्या सामन्यानंतर दिल्लीचा शुक्रवारी (२२ एप्रिल) होणारा राजस्थान रॉयल्सविरुद्धचा सामना वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. बीसीसीआयने ही माहिती दिली. कॅपिटल्सचा पुण्यातून अन्यत्र हलवलेला हा दुसरा सामना आहे.