तुझिया सत्तेने वेदांसी बोलणे, सूर्यासी चालणे तुझ्या सत्ते
ऐसा तू समर्थ ब्रम्हांडाचा स्वामी, वर्म हे जाणूनी रण आलो
या अभंगात संपूर्ण परमार्थ दडलेला आहे। परमेश्वर हा डोळ्यांना दिसण्याचा विषय नाही. ती सत्ता डोळ्यांना दिसत नाही. मी हवा पाहिली असे कुणी सांगितले तर तुम्हांला खरे वाटेल का? हवा हा पाहण्याचा विषय नाही. गुरुत्वाकर्षण हा पाहण्याचा विषय नाही. जिथे गुरुत्वाकर्षण पाहू शकत नाही. तिथे परमेश्वराला कसा पाहणार? जिथे आपली पाठ दिसत नाही. तिथे परमेश्वर कसा दिसणार? आरशात जे दिसते ते प्रतिबिंब असते. पाठीवरचे जाऊ द्या. आपले कपाळ तरी आपल्याला दिसते का? जन्मानंतर पाचव्या दिवशी सटवी येऊन कपाळावर लिहून जाते. असे सांगतात कपाळावर लिहिलेले कुणाला कसे दिसणार. तुला त्याने काय कानमंत्र दिला असे म्हणतात त्याचा अर्थ काय तर, त्याने तुला काय युक्ती सांगितली. त्याने तुला काय गुपीत सांगितले। कानमंत्र याचा अर्थ तुला काय ज्ञान दिले।
“गुरू तेथे ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन समाधान आधीजे।” कानमंत्र देणे म्हणजे ज्ञान देणे. कपाळावर लिहिलेले आहे,असे म्हणतो तेव्हा प्रत्यक्षांत जे लिहिलेले असते ते आपल्या सूक्ष्म जाणिवेवर लिहिलेले असते. ते कुणाला पुसता येत नाही. हा विषय जीवनविद्येत स्पष्ट केलेला आहे. जीवनविद्या हाच सर्व समस्यांवर सर्व आधीव्याधींवर, सर्व दुःखावर, सर्व संकटांवर उपाय आहे. सुखाला कारण ज्ञान म्हणून ज्ञानाचे महत्त्व अपरंपार आहे. अगदी पुरातन काळापासून आतापर्यंत अनेक लोकांच्या ही गोष्ट लक्षातच आलेली नाही. लोकांनी वैराग्य वैराग्य म्हणत संसाराकडे दुर्लक्ष केले. कुठेही गेलात तरी संसार सुटत नाही, तर तो सोडायचा कशासाठी? बायका-मुले सोडली, नोकरीधंदा सोडला तरी तुम्हाला काहीतरी करावेच लागते. घर नाही तरी आम, मठ बांधावाच लागतो. मग सोडले काय आणि धरले काय? जीवनविद्या सांगते, घरदार बायका-मुले सोडण्याच्या फंदात पडू नका. सगळे सोडून गेल्यावर देव मिळतो असा गैरसमज झालेला आहे. याचा परिणाम असा झाला की सोन्यासारखी बायको, सोन्यासारखी मुले, चांगला नोकरीधंदा हे सर्व सोडून नको त्या गोष्टींच्या मागे धावतात व पस्तावतात. परमार्थ करण्यासाठी काही सोडावे लागते हा एक गैरसमज झालेला आहे. कुठेही गेलात तरी संसार सुटत नाही. तो या ना त्या प्रकाराने करावाच लागतो. आज संसारात आपल्याला सगळ्या सुखसोयी उपलब्ध असतात व संसार सोडून जाता तेव्हा सगळ्या गैरसोयी वाट्याला येतात. घरी असतो तेव्हा सर्व सोयी असतात व घराबाहेर सर्व गैरसोयी असतात. सोयी उपलब्ध असताना जर देवाची साधना होत नाही, तर गैरसोयीत साधना करणार?
- सद्गुरू वामनराव पै