Tuesday, April 29, 2025
Homeमहामुंबई‘हुनर हाट’च्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताला बळकटी

‘हुनर हाट’च्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताला बळकटी

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे प्रतिपादन

मुंबई (प्रतिनिधी) : हुनर हाटसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारत साकार करण्याला बळकटी मिळत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केले. देशाच्या प्रत्येक भागातील ‘स्वदेशी’ आणि ‘व्होकल फॉर लोकल’च्या व्यापक सामर्थ्याचा अनुभव आणि कला आणि कौशल्य यांच्या प्रदर्शनाची संधी देणाऱ्या हुनर हाटची ४० वी आवृत्ती १६ ते २७ एप्रिल दरम्यान वांद्रे-कुर्ला संकुलात सुरू आहे. या ‘हुनर हाट’ चे औपचारिक उद्घाटन रविवारी केंद्रीय माहिती आणि प्रसारण, क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

या प्रदर्शनात, ३१ पेक्षा अधिक राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतील जवळपास १,००० विणकर, शिल्पकार, कारागीर आपली हस्तनिर्मित दुर्मीळ स्वदेशी उत्पादने घेऊन सहभागी झालेले आहेत. ज्यात मोठ्या संख्येने महिला कारागीर आणि शिल्पकारांचा समावेश आहे, असे ठाकूर म्हणाले. यावेळी केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाचे सचिव एस पी सिंह टेवटिया व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी बोलताना ठाकूर पुढे म्हणाले २०१६ मध्ये सुरू झालेल्या या उपक्रमात विविध राज्यातील उत्पादनांची माहिती घेऊन याबद्दलची माहिती आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाते. स्किल इंडिया उपक्रमाअंतर्गत नक्वी यांच्या मंत्रालयातर्फे उस्ताद योजनेच्या माध्यमातून कौशल्य प्रशिक्षण देण्याचे काम होत आहे. याचा युवकांनी लाभ घेत नोकरी मागणारे न होता नोकरी देणारी व्यक्ती व्हावे असे ठाकूर म्हणाले.

या उपक्रमातून ९ लाख रोजगार निर्माण करण्याचे मोठे कार्य अल्पसंख्याक मंत्री नक्वी यांनी पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली केले आहे असे सांगत ठाकूर म्हणाले की या उपक्रमाच्या संचालनात कोणत्याही कलाकाराला स्थलांतरित व्हावे लागले नाही हे याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. तसेच कारागिरांना स्वतःच्या गावातच राहून स्वतःचे उत्पन्न दुप्पट, चौपट करण्याची संधी देण्याचे कार्य माध्यमातून नक्वी यांनी केले आहे. दुबई आणि बहुतेक आखाती देशांमध्ये आज सर्वात जास्त संख्येने कुशल भारतीय लोक कार्यरत आहेत असे निरीक्षण नोंदवून ठाकूर म्हणाले की तेजस उपक्रमाअंतर्गत येत्या एका वर्षाच्या आत ३० हजार भारतीयांना कौशल्य प्रशिक्षण देऊन दुबईमध्ये पाठविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

हुनर हाटला भेट द्या आणि एक भारत श्रेष्ठ भारत संकल्पनेचा अनुभव घ्या असे केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री आणि राज्यसभेचे उपनेते मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले. राज्यसभा सदस्य प्रकाश जावडेकर यांनी सांगितले की, आता तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे देशाच्या एका कोपऱ्यातील गावात तयार होणारी वस्तू जगभरात पोहोचते आणि तिची विक्री होते.

‘हुनर हाट’चे मुख्य आकर्षण

देशाच्या विविध भागांतील पारंपरिक पदार्थांचा आस्वाद घेण्याची सोय ‘हुनर हाट’मधील फूड कोर्टच्या माध्यमातून केली आहे. याशिवाय, ‘मेरा गाव मेरा देश’, ‘विश्वकर्मा वाटिका’, दररोज होणारे सर्कशीचे खेळ, ‘महाभारता’चे सादरीकरण, प्रसिद्ध कलावंतांच्या गीत-संगीताचे कार्यक्रम, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव पॅव्हेलियन, सेल्फी पॉइंट इत्यादी, मुंबई इथे आयोजित ‘हुनर हाट’चे मुख्य आकर्षण आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -