नवी मुंबई (प्रतिनिधी) : पहिल्या संडे स्पेशल सामन्यात सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्जवर ७ विकेट आणि ७ चेंडू राखून मात करताना आयपीएलच्या १५व्या हंगामात सलग चौथा विजय मिळवला. आयपीएलच्या यंदाच्या मोसमात विजयाचा चौकार ठोकणारा तो पहिला संघ ठरला.
पंजाबचे १५२ धावांचे माफक आव्हान हैदराबादने १८.५ षटकांत ३ विकेटच्या बदल्यात पार केले. कर्णधार केन विल्यमसन (३ विकेट) लवकर माघारी परतला तरी दुसरा सलामीवीर अभिषेक शर्मा (२५ चेंडूंत ३१ धावा) तसेच राहुल त्रिपाठी (२२ चेंडूंत ३४ धावा), आयडन मर्करम (२७ चेंडूंत नाबाद ४१ धावा) तसेच निकोलस पुरनच्या (३० चेंडूंत नाबाद ३५ धावा) उपयुक्त योगदानामुळे सामन्याचा निकाल लागायला १९वे षटक उजाडले तरी आरामात विजय मिळवला.
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. नवोदित उम्रान मलिकसह (४ विकेट) आणि अनुभवी भुवनेश्वर कुमार (३ विकेट) या मध्यमगती दुकलीने प्रभावी मारा करताना पंजाबला २० षटकांत १५१ धावांत गुंडाळताना कॅप्टनचा निर्णय सार्थ ठरवला. मुंबईविरुद्धच्या पायाच्या अंगठ्याच्या दुखापतीमुळे पंजाब संघ नियोजित कर्णधार मयांक अग्रवालविना मैदानात उतरला. त्याच्या अनुपस्थितीत शिखर धवनकडे नेतृत्वाची धुरा आली. मात्र, धवनसह आघाडी फळी फ्लॉप ठरली. शिखर ८ धावा काढून बाद झाला. प्रभसिमरन सिंग (१४ धावा) आणि वनडाऊन जॉनी बेअर्स्टोने (१२ धावा) थोडा प्रतिकार केला तरी त्यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. लियाम लिव्हिंगस्टोनने ३३ चेंडूंत ५ चौकार आणि ४ षटकारांसह ६० धावांची तडाखेबंद खेळी करताना पंजाबचा डाव सावरला.
हैदराबादचा हा सलग चौथा विजय आहे. ६ सामन्यांतून चौथ्या विजयासह त्यांनी टॉप फोरमध्ये स्थान मिळवले. पंजाबला ६ सामन्यांत तिसरा पराभव पाहावा लागला.
७ धावांत पंजाबच्या ५ विकेट, चार भोपळे
१९व्या षटकात ५ बाद १५१ धावा अशा स्थितीत पंजाब होता. मात्र तळातील पाच फलंदाज ७ धावांच्या फरकाने बाद झाले.