डॉ. लीना राजवाडे
शरीराचे पोषण, वाढ ही अन्नापासूनच होते. एवढेच नव्हे तर, खरं तर आपण जे अन्न खातो त्यातूनच हे शरीर बनते. आईच्या पोटात गर्भावस्थेपासून ते पुढे स्वतंत्र व्यक्ती म्हणून अगदी मृत्यूपर्यंत शरीरातील प्रत्येक अणू हा अन्नापासून घडतो. आहार याविषयी भारतीय वैद्यक शास्त्र खूपच विस्ताराने प्रयोगसिद्ध सिद्धांत मांडताना दिसते. आहारशास्त्र हे आधुनिक काळात अगदी अलीकडे विकसित होणारी शाखा आहे; परंतु आयुर्वेद शास्त्र संहितांमधील आहार विषय वाचल्यावर लक्षात येते की, वेदकालीन आहारशास्त्रदेखील तितकेच सिद्ध होते. आजही त्या संहितांमधील सिद्धांत व्यवहारात तसेच लागू होताना प्रत्यक्ष अनुभवायला येतात. यापुढील लेखातून आपण अगदी मुळापासून याबद्दल समजून घ्यायचा प्रयत्न करू. आज बघू
आहार म्हणजे काय? आहाराने काय मिळते?
आहारो प्राणिनाम् मूल : सर्व प्राणिमात्रांचे जिवंत राहणे आहारावरच अवलंबून असते.
आहार : तेजवर्धनः आहाराने शक्ती वाढते.
आहार : समुत्साहवर्धन : आहार (मनुष्याला) दीर्घोद्योगी, सुखी, उत्साही ठेवतो.
आहार : ओजोवर्धनः – ओज म्हणजे शरीर धारण करणाऱ्या सर्व धातूंमधील तेज होय. आहार हे तेज जगण्याची ऊर्जा वाढवतो.
आहार आयुवर्धन : आहाराने आयुष्य वाढते.
आहार : सद्योबलकृत् – आहाराने लगेच शक्ती/ताकद मिळते.
आहार : देहधारकः – आहाराने शरीराची स्थिती टिकून राहते.
आहार : अग्निवर्धकः – आहाराने पचनशक्ती वाढते.
अन्नं वृत्तिकराणाम् श्रेष्ठम् – दीर्घायुष्य मिळवून देणाऱ्या गोष्टींमध्ये आहार सर्वात महत्त्वाचा आहे.
अन्नपानं समिद्भि : – आहारसेवन हा अग्निहोत्रसमान विधी आहे.
प्राण : प्राणभृताम् अन्नम् – शरीरातील पंचप्राणांचा आत्मा आहारात आहे.
काले भुक्तम् अन्नं प्रीणयति – योग्य वेळी खाल्लेले अन्न समाधान देते.
आरोग्यलिप्सये अनिष्टं आहारं न अश्नियात् – ज्याला नीरोगी राहायचे आहे, त्याने वाईट किंवा अयोग्य अन्न खाऊ नये.
सकस आहार खाण्यामुळे पुढील अनेक गोष्टी मिळतात.
अन्ने वर्ण : प्रतिष्ठितम् – त्वचेचा रंग चांगला राहतो.
सौस्वर्यम् प्रतिष्ठितम् – आवाज चांगला राहतो.
जीवितं प्रतिष्ठितम् – निरोगी आयुष्य लाभते.
प्रतिभा प्रतिष्ठितम् – सृजनशीलता चांगली राहते.
सुखम् प्रतिष्ठितम् – आयुष्य सुखाने जगता येते.
तुष्टिम् प्रतिष्ठितम् – वृत्ती समाधानी राहते.
पुष्टिम् प्रतिष्ठितम् – शरीराचे पोषण चांगले होते.
बलं प्रतिष्ठितम् – ताकद टिकून राहते.
मेधा प्रतिष्ठितम् – आकलनशक्ती चांगली होते.
आहारकल्पनाहेतून् स्वभावादीन् विशेषतः।
समीक्ष्य हितमश्नीयाद्देहो हि आहारसंभव:।
शरीर हे आहारामुळेच बनले असल्याने (प्रत्येक माणसाने) आहारविचार, पाककृती, आहारात समाविष्ट पदार्थ त्यांचे गुणधर्म समजावून घ्यावेत. त्यातील स्वतःला काय योग्य, अयोग्य हेदेखील समजून घ्यावे व त्याप्रमाणे अन्न खावे.
या अनेक सूत्रांचा विचार किती व्यापक आहे हे लक्षात येईल. शरीर आणि मन यांचे स्वास्थ्य, काम करण्यासाठी लागणारी ताकद, ऊर्जा देणारा आहार हा महत्त्वाचा होय. हा आहार नेमका कसा असतो. आहारातील पदार्थ हे रसांनी काम करतात. रसनेनी म्हणजे जिभेनी समजणारी चव होय. समजावून घेऊ.
आहारातील रस कल्पना
आपण खातो त्या अन्नपदार्थाला मग ते कोणत्याही पद्धतीचे, कोणत्याही प्रांतातील असले तरी त्याला एक विशिष्ट चव असते. व्यवहारात आपल्याला यापैकी फक्त काहीच चवीचे पदार्थ माहीत आहेत. उदाहरणार्थ, गोड, तिखट, खारट. वास्तविक यापेक्षा अधिक चवीचे पदार्थ आपल्या भारतीय आहारशास्त्रात सांगितलेले आहेत. त्या चवींना ‘रस’ अशी संज्ञा आहे. हे रस एकूण सहा प्रकारचे असतात ते म्हणजे गोड, आंबट, खारट, तिखट, कडू आणि तुरट.
या सहा चवींचे पदार्थ कोणते, ते खाल्ले असता आपल्याला त्यापासून कोणते फायदे मिळतात व ते जास्त प्रमाणात खाल्यास काय तोटे होतात, हे पुढील लेखात आपण अधिक विस्ताराने पाहू.
आजची गुरुकिल्ली
प्राण: प्राणभृताम् अन्नम्
जगण्यासाठी शक्ती ऊर्जा ही अन्नामुळे मिळते.