अनुराधा परब
निसर्ग आणि मानवाचे नाते अभिन्न आहे. निसर्गाच्याच सान्निध्यात राहात त्याचे निरीक्षण करीत तो अनेक गोष्टी शिकला आहे. त्या स्थितीशी जुळवून घेत, आजूबाजूच्या निसर्गातील गोष्टींचीच मदत घेत माणसाचे जीवन घडत गेले. सुरुवातीपासूनच निसर्गाच्या अवाढव्य पसाऱ्यामधला आपण एक अविभाज्य आणि अतिशय क्षूद्र घटक आहोत ही जाणीव आपल्या पूर्वजांच्या मनात सदैव जागृत होती. निसर्गपूजेची धारणा ही त्यातूनच विकसित झाली.
शेतीचा शोध लागल्यानंतर मानवी जगण्याला स्थिरता आली. शेतीसाठी, सामूहिक वसाहतीसाठी जंगलावरच घाव घातला गेला. कुठे तरी याचे दृश्य परिणाम निसर्गातून दिसल्यानंतरच यावर उपाय म्हणून गाववस्तीजवळचा जंगलाचा भाग राखून ठेवण्यात आला. निसर्गाची हानी होऊ नये यासाठी निसर्गाच्या भव्य तरीही अनाकलनीय आविष्काराबद्दल काही संकेत, ठोकताळे बांधले गेले. त्याच्याशी पवित्रता, भव्यतेपुढे लीनता आणि घडणाऱ्या घटितांच्या गुढतेमुळे आदरयुक्त भय या संमिश्र भावना या संकेतांशी जोडल्या गेल्या असाव्यात. त्याच भावना शतकानुशतके जोपासल्या गेल्या. हे सारे जोडले गेले ते गावातील किंवा गावाबाहेरील देवरायांशी.
देवराई अर्थात देवांसाठी राखून ठेवलेले जंगल, वनक्षेत्र. पवित्रतेबरोबरच संरक्षणाचे उद्दिष्ट साधले गेल्यामुळे हजारो वर्षे या देवराया गावांकडून सांभाळल्या गेल्या. त्यावर आधारित परंपरा, प्रथा, कथा आकाराला आल्या. त्यांची जोपासना पिढ्यानपिढ्या संस्कारित होत आली. देवराई ही कुठे एका झाडाची तर कुठे शंभर एकरापर्यंत विस्तारलेली. तिच्या विस्तारापेक्षाही तिथे नांदणारी जीवसृष्टी, सरीसृपवर्गीय विविध प्रजाती; निबिड आणि जाड खोडांनी व्यापलेल्या जंगलातील पशुपक्ष्यांची विविधता; विहिरी, तलाव, नदी, झरे यांसारखे बारमाही जलस्त्रोत यावर देवराईची समृद्धता, महत्तता अवलंबून असते. याचेच प्रतिबिंब देवराईजवळच्या गावांतील संस्कृतीवर, जीवनशैलीवरदेखील पडलेले आढळून येते. किंबहुना, निसर्गातील एक परिपूर्ण स्वविकसित अशी मानवी कुतूहलाला चाळवणारी परिसंस्था म्हणजे देवराई. पश्चिम घाटासह संपूर्ण भारतामध्ये असे गर्द वनरायांचे पुंजके आढळतात. महाराष्ट्रात निमसदाहरित आणि आर्द्रतायुक्त पानझडी या दोन प्रकारच्या देवराया आहेत.
देवरायांच्या बाबतीत तीन घटक महत्त्वाचे आहेत. त्या देवांच्या राया किंवा वने असल्याने त्यांचे रक्षण आपोआप झाले. कारण देवाला चालणार नाही, असे कोणतेही कृत्य करण्यास तिथे मज्जाव असतो. मुळात अनेक ठिकाणी तर देवराईमध्ये प्रवेश करताना चपला काढून मगच पायवाटेवरून पुढे जाण्याची प्रथा आहे. सारे काही देवाचेच असल्याने तिकडे पानालाही हात लावण्याची कुणाची बिशाद नसते. कारण तसे केले, तर मग त्यासाठी प्रायश्चित्तच घ्यावे लागते, असे गावकऱ्यांमध्ये मानले जाते. देवराई हे कायमस्वरूपी म्हणजेच आठवड्याचे सातही दिवस आणि दिवसाचे चोवीस तास देवाचे वास्तव्य असलेले ठिकाण, त्यामुळे कुणी कुठे काही वाईट कर्म केलेले असेल तर या ठिकाणी येऊन देवाची माफी मागता येते. त्यामुळे देवराया या देवाच्या अस्तित्वाने भारलेल्या आहेत, अशी लोकधारणा आहे. कोकणात आणि त्यातही खासकरून सिंधुदुर्गामध्ये ही धारणा अधिक पक्की आहे.
देवरायांनी त्यामुळेच अनेक दंतकथा, मिथकांनाही जन्म दिला. म्हणजे आत शिरलेली व्यक्ती, प्राणी हे पुन्हा बाहेर येऊ शकत नाहीत, अशा समजाला शतकानुशतके दृढता मिळत गेली ती इथल्या निबिडतेमुळेच. भय या भावनेला धाक पूर्वजांकडून दाखवला गेला असावा तो मानवी कक्षेबाहेरील देव नामक शक्तीचा. या भयापोटीच गावखेड्यांजवळील जंगलांचे रक्षण होईल, हा पूर्वजांचा होरा खरा ठरला. हे जंगल राखणाऱ्या निराकार शक्तिस्वरूपाला वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावे दिली गेली. या वनांविषयीची गुढता, अगम्यता यामुळे देवराई ही स्थानिक पवित्र परंपरेचा अविभाज्य भाग झाली. या देवरायांना आखीव-रेखीव सीमा नाहीत तरीही त्यांचा परिसर हा त्या अज्ञात शक्तीकडून राखला जातो, ह्याच धाकातून राखणदार ही संकल्पना अस्तित्वात आलेली असावी. जंगलाला राखणे आणि त्याची राखण करणारी शक्ती या दोन्हींची सांगड देवतांशी घातली गेली.
देवरायांचा पुरातत्त्वशास्त्र, मानववंशशास्त्र आणि भारतविज्ञान या दृष्टिकोनांतून अभ्यास केलेल्या संशोधक डॉ. धर्मानंद कोसंबींनी असे म्हटले आहे की, अशा परिसरावर देखरेख करणाऱ्या सामर्थ्यवान शक्ती ५० ते ६० टक्के मातृदेवता असतात. कधी त्या एकएकट्या, तर कधी समूहाने त्या पाषाण (तांदळा) रूपात दिसतात. देवराईमध्ये वाघजाई, मरीआई, कालकाई या मातृदेवता तरी असतात किंवा भैरवनाथ, शंभू, भैरोबा, डुंगोबा आदी पुरुषदेव तरी असतात. त्यामुळे देवराया हे फक्त देवांसाठी राखीव वन नसून गावासाठी ती एक जागृत व्यवस्था असते. त्या व्यवस्थेचा धार्मिक गरजांसाठी जसे की, कौल घेणे, शिमग्यातील शिंपणे, पालखी, सहाण तसेच दैनंदिन गरजांसाठी म्हणजे देवराईतल्या झाडांचा पडलेला पालापाचोळा, औषधी वनस्पती गोळा करण्यासाठीसुद्धा गावकीचे मत घेतले जाते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकेकाळी देवरायांची संख्या शेकड्यांत होती. मार्लेश्वर, सावंतवाडीजवळील वेर्ले, वेंगुर्ल्याजवळील किल्ले निवती, हेवाळे-बांबर्डे वगैरे ठिकाणी मोठ्या देवरायांची नोंद करण्यात आलेली आहे. शेकडो वर्षे जुने मोठाल्या बुंध्यांचे वृक्ष, मलबारी धनेश, माडगरूडासारख्या पक्ष्यांकरिता सुरक्षित अधिवास, गूळवेल, अनंतमूळ, काडेचिरायत अशा औषधी वनस्पतींचे आगार, केवड्याची बने इत्यादी तऱ्हेतऱ्हेची वनसंपदा इथे आढळून येते. बॉम्बे नॅचर हिस्ट्री सोसायटीने १९९९ साली या संदर्भात एक अहवाल तयार केला होता, त्यानुसार राज्यात ३६०० हून अधिक देवराया आहेत. देवराई ही एक शिखर परिसंस्था असून तिच्यात सर्वोच्च नैसर्गिक वैविध्य, जनुकीय पिढी, बीज पेढी तसेच जलपेढीही असते, असे संशोधनाअंती लक्षात आले आहे. या देवरायांनी गाव-खेड्यातील श्रद्धास्थानांवर आधारलेल्या एका संस्कृतीस जन्म दिला. त्या संस्कृतीने देवभयास्तव का होईना जैववैविध्याचे जतन केले आणि त्यातूनच मिथके आणि दंतकथांचे विश्व उभे राहिले. या विश्वाने पुन्हा एकदा संस्कृतीच्या माध्यमातून आपसूक जतनाचे कार्य केले, असे हे चक्र गेली काही हजार वर्षे अव्याहत सुरू आहे.
(ज्येष्ठ पत्रकार, प्राचीन भारतीय संस्कृती अभ्यासक) [email protected]