Tuesday, April 29, 2025
Homeमहामुंबईनवी मुंबईत पापड, मिरगुंडी, चकल्या, वेफर्स, कुरडयांची जंत्री

नवी मुंबईत पापड, मिरगुंडी, चकल्या, वेफर्स, कुरडयांची जंत्री

पावसाळ्यातील पुरवठा साहित्यासाठी महिलांची लगबग

नवी मुंबई (प्रतिनिधी) : दर वर्षीप्रमाणे याही वर्षी उष्णतेचे प्रमाण वाढतेच आहे. एप्रिल महिन्यात विविध प्रकारचे खाद्यपदार्थ व उपवासाचे पदार्थ चांगल्या प्रकारे सुकले जातात. त्यामुळे महिला वर्गाकडून खाद्यपदार्थ बनवण्याच्या कामाला वेग आला आहे.

खाद्यपदार्थ महिला वर्ग बनवतातच. पण त्याच्या जोडीला मसाल्याचे पदार्थदेखील उन्हात सुकवून बनवायच्या प्रक्रियेला वेग आला आहे. त्यामुळे मोकळ्या जागेवर महिला वर्गाची हे खाद्यपदार्थ बनवून वाळवण्याच्या प्रक्रियेला वेग आलेला पाहायला मिळत आहे. लगबग पाहायला मिळत आहे. दरम्यान, कोरोनाच्या काळात या पदार्थामुळे चांगलाच फायदा झाल्याचे पाहायला मिळाले असल्याचे महिला वर्गाचे म्हणणे आहे.

एप्रिल महिना खाद्यपदार्थ बनाविण्यास अत्यंत महत्त्वाचा असल्याने महिला या महिन्यात जितके जास्त खाद्यपदार्थ बनविले जातील त्याकडे त्यांचे लक्ष असल्याचे दिसून येत आहे.

आताच्या घडीला महिलावर्ग पावसाळ्यात असणाऱ्या श्रावण महिना, वट पौर्णिमा तसेच विविध उपवासाचे दिवस जास्त प्रमाणात असतात. त्यासाठी साबुदाण्याचे पापड, चकल्या, बटाटा वेफर व चकल्या यांसारख्या पदार्थांची जंत्री जोरदारपणे सुरू आहे. दुसरीकडे मसाले पदार्थ सुकवायचे कामदेखील जोमाने सुरू आहे. मसाले पदार्थ आताच सुकवून दळले, तर ते वर्षभर ताजे व तजेलदार रहात असल्याने महिला या पदार्थाकडे पाहत आहेत.

पावसाळ्यात दैनंदिन जेवणाचा आस्वाद चांगला मिळवा. म्हणून जेवणाबरोबर खाण्यासाठी पूरक पदार्थांची देखील रेलचेल चालू आहे. यामध्ये कुरडया, खारोडी, उडीद डाळीपासून बनविले जाणारे पापड, मिरगुंडी, तांदळापासून पापड्या, पापड, गव्हाच्या कुरडया, सांडगे, शेवया आदी खाद्यपदार्थ बनविण्याचे काम पहाटेपासून सुरू आहे. यामागे उन्हाचा ससेमिरा टाळणे, हा उद्देश असल्याचे महिला वर्गाचे म्हणणे आहे.

कोरोनाच्या दीड-दोन वर्षांच्या कालावधीत अनेकदा लॉकडाऊन लागले होते. त्यावेळी नागरिकांना घराबाहेर पडायलादेखील मिळाले नाही. पावसाळ्याच्या आधी बनवलेले पदार्थ फायदेशीर ठरले. तसेच आर्थिक मंदी असल्याने फायदा झाला असल्याचे गृहिणींचे म्हणणे आहे.

उन्हाळ्यात उष्णता मोठ्या प्रमाणात असते. या काळात विविध प्रकारचे खाद्य उत्कृष्टपणे सुकतात. त्यामुळे हे पदार्थ वर्षभर टिकून राहत असतात. कधी जेवणामध्ये भाजी नसली, तर या पदार्थांचा फायदा चांगला होतो. तसेच उपवासाचे पदार्थदेखील फायदेशीर ठरतात. – लक्ष्मी सकपाळ, गृहिणी

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -