Monday, April 28, 2025
Homeताज्या घडामोडीअतिदुर्गम सागपाना व रिठीपाडा गावात पोहोचले टँकरचे पाणी

अतिदुर्गम सागपाना व रिठीपाडा गावात पोहोचले टँकरचे पाणी

प्रहार इम्पॅक्ट

मनोज कामडी

जव्हार ग्रामीण : तालुक्यातील अतिदुर्गम असलेल्या वावर-वांगणी ग्रामपंचायतमधील सागपाना व रिठीपाडा भागात टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला आहे. या भागात मार्च महिन्यापासून भीषण टंचाई निर्माण झाली असून येथील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी २ ते ३ किमी अंतरावरून मोटारसायकलवरून पाणी पिण्यासाठी घेऊन यावे लागते होते तसेच गावातील लोकांना खड्ड्यातील गढूळ पाणी वापरावे लागत असल्याची बातमी दैनिक प्रहार वृत्तपत्रातून प्रकाशित केली होती.

सदर बातमीची तातडीने दखल घेत तहसीलदार व गटविकास अधिकारी तसेच ग्रामपंचायत प्रशासनाने टँकरद्वारे दोन्ही गावांना सुरळीत पाणीपुरवठा सुरू केला. त्यामुळे येथील आदिवासी महिलांची पाण्यासाठीची होणारी वणवण तात्पुरती थांबली आहे.

वावर-वांगणी ग्रामपंचायतीने सागपाना आणि रिठीपाडा येथे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी २७ मार्चला टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी तहसीलदार व पंचायत समिती जव्हार येथील पाणीपुरवठा विभागाकडे केली होती. तसेच ग्रामपंचायतमध्ये यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्या व पंचायत समिती सदस्या यांच्याकडेही ग्रामस्थांनी मागणी केली होती. त्यांनीही यासंदर्भात पाठपुरावा केला.

तसेच ‘जव्हार तालुक्यातील वावर ग्रामपंचायतील गावपाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाईचे संकट’ या मथळ्याखाली दैनिक प्रहार वृत्तपत्रामध्ये वृत्त प्रसिद्ध होताच शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली व त्यानंतर ग्रामपंचायतीने सागपाना व रिठीपाडा येथे टँकरद्वारे दररोज दोन टँकर पाणीपुरवठा सुरळीत सुरू केला.

 

त्यामुळे गेल्या मार्च महिन्यापासून पाण्यासाठी करावी लागणारी महिलांची व ग्रामस्थांची दोन ते तीन किमीवरील भटकंती थांबली असून ग्रामस्थांनी या संदर्भात ‘दैनिक प्रहार’चे आभार व्यक्त केलेत. तसेच पाणीटंचाई कायमस्वरूपी कशी दूर होईल यासाठी प्रशासनाने उपाययोजना करावी, अशी मागणी केली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -