पालघर (प्रतिनिधी) : राज्यातील विविध शासकीय कार्यालयात शहीद जवान, माजी सैनिक, शहिदांच्या विधवा, कर्तव्यावर कार्यरत असणारे सैनिक याचे कुटुंबिय यांची अनेक शासकीय कामे असतात. शासन दरबारी प्रलंबित कामांचा तत्काळ निपटारा करण्यासाठी ७५व्या स्वातंत्र्यदिनाच्या महोत्सवानिमित्त १ मे १५ जून २०२२ या कालावधीत संपूर्ण राज्यात अमृत जवान अभियान २०२२ राबविण्यात येणार असल्याची माहिती कृषी, माजी सैनिक कल्याण मंत्री तसेच पालघरचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी दिली.
महसूल, भूसंपादन पुनर्वसन, अशा प्रकारचे विविध दाखले, पोलिस विभागाकडील तक्रारी, ग्रामविकास विभागाच्या विविध योजना, कृषी विभागाकडील विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी प्रस्ताव, सहकार विभागाकडील कर्ज प्रकरणे, परिवहन विभागाचे परवाने अशा इतर कामांसाठी विशेष मेळावे घेऊन शहीद जवान, माजी सैनिक व सेवेत कार्यरत सैनिकांचे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी अभियान राबविण्यात यावे, असे निर्देश भुसे यांनी सर्व विभागाला दिले होते. त्यानुसार सदरचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.
विविध समस्यांचे निवारण करण्यासाठी तालुका व जिल्हा स्तरीय समिती स्थापन करण्यात आलेली आहे. जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतील, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, पोलीस अधिक्षक, आयुक्त महानगरपालिका, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, उपवनसंरक्षक, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, अधिक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, अधिक्षक अभियंता जलसंपदा विभाग अधिक्षक अभियंता महावितरण, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, माजी सैनिक जिल्हा संघटनेचा एक प्रतिनिधी, संरक्षण विभागातील एक प्रतिनिधी अशी सदस्यांची समिती असेल. या समितीमध्ये निवासी उपजिल्हाधिकारी सदस्य सचिव असतील, तर तालुका स्तरावर उपविभागीय अधिकारी याचे अध्यक्षतेखाली, उपविभागीय पोलीस अधिकारी, गटविकास अधिकारी सहा. निबंधक सहकारी संस्था तालुका कृषी अधिकारी, मुख्याधिकारी आदींचाही समावेश असेल, असे भुसे पुढे म्हणाले.
दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिनाच्या धर्तीवर ‘अमृत जवान सन्मान दिन’ आयोजित करण्यात यावा, हे अभियान राबविण्यासाठी स्वतंत्र कक्षाची जिल्हा व तालुका स्तरावर स्थापन करण्यात येणार आहे. प्रत्येक तहसिल कार्यालयात एक खिडकी कक्ष या तत्त्वाप्रमाणे सहायता कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. या कक्षासाठी स्वतंत्र कर्मचऱ्याची नेमणूक होणार असून दुपारी १२ ते ३ या कालावधीत विभागांकडील विविध तक्रार अर्ज स्विकारण्यात येतील व सबंधितांना प्राप्त झालेल्या अर्जाची पोहोच तत्काळ देवून अर्ज संबंधित विभागाकडे वर्ग होणार आहे. प्रलंबित तक्रारी निवारण्यासाठी प्रत्येक विभागाला ठराविक कालमर्यादा असेल व त्याचे सनियंत्रण जिल्हाधिकारी करतील असेही पालकमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.