श्रीजी होममध्ये २९ कोटींचे मनी लॉण्ड्रिंग
मुंबई : मेहुण्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची भागिदारी असलेल्या श्रीजी होम कंपनीत मनी लॉण्ड्रिंग झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्यांनी केले आहेत. श्रीजी कंपनीशी आपला संबंध नसल्याचे मुख्यमंत्री जाहीर करणार का, असा सवाल सोमय्यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. किरीट सोमय्या यांनी आपण ठाकरे सरकारचा आणखी एक घोटाळा बाहेर काढणार असल्याचे काल सांगितले होते. त्यानुसार सोमय्या यांनी शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर आर्थिक गैरव्यवहाराचे नवे आरोप केले आहेत.
श्रीजी होम कंपनीने दादरमध्ये एक मोठी इमारत बांधली आहे. त्या कंपनीत २९ कोटी ६२ लाख २९ हजार ३२० रुपयांचे मनी लॉण्ड्रिंग झाल्याचा आरोप सोमय्यांनी केला आहे. श्रीजी होममध्ये मुख्यमंत्र्यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर भागीदार आहेत. श्रीजी होममध्ये दोन टप्प्यांत मनी लॉण्ड्रिंग झाले. आधी ५ कोटी ८६ लाख रुपये आणि त्यानंतर २३ कोटी ७५ लाख रुपये कंपनीत गुंतवले गेले, असा आरोप सोमय्यांनी केला. याबद्दलचे पुरावे माझ्याकडे आहेत. मुख्यमंत्री किंवा पोलिसांनी पुराव्यांची मागणी केल्यास सर्व पुरावे देईन, असेही सोमय्या म्हणाले.
श्रीजी होम कंपनीचे कार्यालय वांद्र्यात आहे. या कंपनीत श्रीधर पाटणकरांची भागिदारी आहे. ते या कंपनीत संचालक आहेत. शिवाजी पार्क परिसरात असलेल्या केटरिंग कॉलेजसमोर श्रीजी होमने एक इमारत उभी केली आहे. त्यात काळ्या पैशांचा वापर झाल्याचा आरोप सोमय्यांनी केला. यासंदर्भात मी ईडी, कंपनी मंत्रालयाच्या सचिवांची भेट घेतली आहे. त्यासाठी मी दिल्लीला देखील गेलो होतो, असे सोमय्यांनी सांगितले.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्या श्रीजी होम्स या कंपनीमध्ये २९ कोटी ६२ लाख २९ हजार ३२० रुपये मनी लाँड्रिंगद्वारे आले आहेत. माझा उद्धव ठाकरेंना सरळ प्रश्न आहे की या कंपनीसोबत आपला काय संबंध आहे,” असे किरीट सोमय्या म्हणाले.
नंदकिशोर चतुर्वेदी कुठे आहे?
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना माझी विनंती आहे की, त्यांचे कौटुंबिक मित्र, हवाला ऑपरेटर असलेल्या नंदकिशोर चतुर्वेदीला आपण कुठे लपवले आहे त्याची माहिती जनतेला द्यावी. ठाकरे परिवारातील आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे आणि श्रीधर पाटणकर त्यांच्याबरोबर नंदकिशोर चतुर्वेदी यांच्यासोबतचे अनेक आर्थिक व्यवहार बाहेर आले आहेत. मी तपास यंत्रणांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. ते नंदकिशोर चतुर्वेदी यांना शोधत आहेत. त्यामुळे नंदकिशोर चतुर्वेदी यांना फरार घोषित करण्यात यावे ही आमची मागणी आहे. महाराष्ट्र सरकारचे भ्रष्टाचाराचे पैसे मनी लाँड्रिंग करण्यात यांनी मदत केली आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
हवाला ऑपरेटर नंदकिशोर चतुर्वेदी आणि आदित्य ठाकरे यांच्यातील तीन कंपन्यांमधील व्यवहार मी काही दिवसांपूर्वी समोर आणला होता. चतुर्वेदी याच्या बनावट कंपन्यांच्या माध्यमातून आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी कोट्यवधींचे व्यवहार केले आहेत. ठाकरे कुटुंबीयांनी याबद्दल एक शब्द ही उच्चारलेला नाही. तर मग ठाकरे कुटुंबिय नंदकिशोर चतुर्वेदी यांचा मनी लाँड्रिंगसाठी वापर करत होते हे सत्य मानायचे का?, असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.
प्रवीण कलमे आहे कुठे?
यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना सोमय्या म्हणाले की, माझ्या विरोधात आरोप करणारे प्रवीण कलमे कुठे आहेत? असे म्हणत याची माहिती जितेंद्र आव्हाड देणार का? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच आरोप करणारे कलमे भारतात आहेत की परदेशात हेही सांगावे असे म्हटले आहे. कलमे यांना जितेंद्र आव्हाड यांनी मदत केली? अनिल परब यांनी मदत केली की उद्धव ठाकरे यांनी मदत केली? असे अनेक प्रश्न यावेळी त्यांनी केले असून, कलमे यांनादेखील फरार घोषित केले जावे, अशी मागणी सोमय्या यांनी यावेळी केली आहे.
पुराव्यांनंतर उत्तर देणार
यावेळी सोमय्यांनी संजय राऊत यांनी केलेल्या शौचालय घोटाळ्याच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, आरोप करणारे राऊत जेव्हा या सर्व प्रकरणात पुरावे देतील तेव्हाच आपण उत्तर देऊ असे सोमय्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.