Friday, May 9, 2025

पालघर

विरार लोकल: वय वर्षे १५५

विरार लोकल: वय वर्षे १५५

दीपक मोहिते


पालघर : विरार लोकल आज १५५ वर्षांची झाली. १२ एप्रिल १८६७ रोजी विरारहून मुंबईला पहिली लोकल धावली होती. त्यावेळी केवळ एकच गाडी सकाळी ६.४५ वाजता सुटायची आणि सांयकाळी ५.३० वाजता तीच गाडी परतीचा प्रवास करायची.


त्यावेळी लोकलमध्ये तीन श्रेणी असायच्या. पण प्रवासी दुसऱ्या श्रेणीतून प्रवास करायचे. दुसऱ्या श्रेणीच्या तिकिटाचा दर प्रती मैल सात पैसे होता, तर तिसऱ्या श्रेणीचा दर तीन पैसे इतका होता. या मार्गावर तेव्हा निअल (नालासोपारा), बसिन (वसई), पाणजू (नायगाव), बेरेवाला (बोरिवली), पहाडी (गोरेगाव), अंदारू (अंधेरी), सांताक्रूझ, बंदोरा (वांद्रे), माहीम, दादूरे (दादर) व ग्रांटरोड इत्यादी स्थानके होती.


दरम्यान, काळ बदलला तसे रेल्वेचे रूपडेही बदलले. त्याकाळी डब्यात केवळ दोन ते तीन प्रवासी असत. आता एका डब्यात चारशे ते पाचशे प्रवासी प्रवास करत असतात. उपनगरीय रेल्वे सध्या तीन विभागांत विभागली गेली असून पश्चिम, मध्य व हार्बर असे हे तीन विभाग आहेत. दिवसाकाठी चार ते पाच लाख प्रवासी या उपनगरीय गाड्यांमधून प्रवास करत असतात. या तिन्ही सेवा मुंबईच्या जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जातात.


पूर्वीकाळी रेल्वेचा प्रवास सुखदायक होता. पण आता हा प्रवास नकोसा वाटतो. गेल्या दीडशे वर्षांत मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, कर्जत, मीरा-भाईंदर, वसई, नालासोपारा, विरार, सफाळे, पालघर, बोईसर, डहाणू या परिसरांमध्ये लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्या तुलनेत रेल्वेनेही गाड्याच्या संख्येत वाढ केली. पण वाढत्या प्रवाशांच्या तुलनेत त्या तुटपुंज्या ठरल्या.


त्यावेळी विरार लोकलला असलेली स्थानके


विरार लोकल सुरू झाल्यानंतर ती ज्या स्थानकांवर थांबत असे, ती स्थानके आजही सुरू असून त्यातील काहींची नावे बदलली आहेत.


निअल (नालासोपारा), बसिन (वसई), पाणजू (नायगाव), बेरेवाला (बोरिवली), पहाडी (गोरेगाव), अंदारू (अंधेरी), सांताक्रूझ, बंदोरा (वांद्रे), माहीम, दादूरे (दादर) व ग्रांट रोड ही ती स्थानिके आहेत.

Comments
Add Comment