Friday, May 9, 2025

रायगड

जेएनपीटी बंदरामध्ये बॉयलरचा स्फोट एकाचा मृत्यू

जेएनपीटी बंदरामध्ये बॉयलरचा स्फोट एकाचा मृत्यू

उरण (वार्ताहर) : देशातील सर्वात मोठ्या बंदरांपैकी जेएनपीटी बंदरामध्ये बॉयलरचा स्फोट झाल्याने एका कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून एक गंभीर आणि एक किरकोळ जखमी आहे. एकंदरीत घडलेल्या या प्रकारामुळे बंदर कामगारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. घडणाऱ्या घटनांची सखोल चौकशी होण्याऐवजी ते दडपले जात असल्यानेच अशा घटना घडत असल्याचे बोलले जात आहे.


जेएनपीटी बंदरामध्ये चॅनल रुंदीकरणाचे सुरू असलेल्या कामाचे ड्रेझिंग सुरू असताना या ड्रेझिंगसाठी वापरात येणाऱ्या बॉयलरचा स्फोट झाला. या स्फोटाच्या धक्क्याने येथे काम करत असणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी अब्दुल स्लाम (२३) याचा जागीच मृत्यू झाला, तर हरीलाल प्रजापती हा कर्मचारी गंभीर भाजला असल्याने त्याला ऐरोली, नवी मुंबई येथे बर्न सेंटरमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे. यामध्ये अनुज राजवीर सिंग (२०) हा किरकोळ जखमी असून त्याच्यावर जेएनपीटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू करण्यात आले आहे.


एकूणच बंदर विभागात हजारो कोटींची कामे सुरू असताना सुरक्षिततेबाबत निष्काळजीपणा होत गेला असल्याचे समोर येत आहे. देशातील महत्त्वाच्या बंदरांमध्ये अशाप्रकारच्या घटना घडून त्यात जीवितहानी होणे हे प्रकल्पाच्या दृष्टीने धोक्याचे म्हटले जात आहे. अशा घटनाबाबत वेळीच ठोस उपाययोजना केली नाही तर भविष्यात त्याचे दुष्परिणाम उरणच्या जनतेला भोगावे लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Comments
Add Comment