
वसंत भोईर
वाडा : तालुक्यातील आलमान येथे एका उद्योजकांने जागा विकत घेतली असून त्या जागेचे सपाटीकरण करण्यात येत आहे. हे सपाटीकरण करताना काही अत्यंत मौल्यवान अशी झाडे जेसीबीच्या सहाय्याने उखडून टाकली जात आहेत. ग्रामस्थांनी या संदर्भात वनविभागाकडे तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.
तालुक्यातील आलमान येथे गट नंबर १२२ ही जमीन असून ही जागा एका उद्योजकाने विकत घेतली आहे. या जागेच्या सपाटीकरणाचे काम सुरू असून या सपाटीकरणात साग, खैर, ऐन अशी मौल्यवान झाडे जेसीबीच्या सहाय्याने उखडून टाकली जात आहेत. कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता झाडे तोडली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दरम्यान, या संदर्भातील तक्रार ग्रामस्थ नीलेश मोकाशी यांनी वनविभागाकडे केली असून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
सदर जागेवर जाऊन पंचनामा केला असून फक्त दोन ऐनाची झाडे तोडलेली आहेत. तसेच इतर काटेरी झाडे तोडली आहेत. ऐनाच्या झाडांचा दंड त्यांना आकारण्यात येईल.
- पी. सी. वडमारे, वनक्षेत्रपाल, वाडा पश्चिम विभाग