प्रेमातून उतराई होण्यासाठी मला संधी द्या; माझ्या खात्याचा फायदा करून घ्या…
संतोष राऊळ
ओरोस : ‘तुम्ही सर्वजण आहात म्हणून मी आहे. आम्हा राणे कुटुंबावर तुम्ही सर्व प्रेम करता म्हणूनच आम्हाला राज्यापासून दिल्लीतपर्यंत लोकप्रिय नेता म्हणून मानसन्मान आहे. मात्र, वय आणि झाड वाढले म्हणून चालत नाही, तर सावली आणि फळे दिली तर त्याचा उपयोग होईल. तुम्ही सर्व जनतेने माझ्या केंद्रीय उद्योग खात्याच्या माध्यमातून उद्योग – व्यवसाय करण्यासाठी पुढाकार घ्यावा. उद्योगातून जलद समृद्धी येते. तुम्ही घडावे, मोठे व्हावे, माझा कोकण उद्योगाच्या प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर असावा ही माझी इच्छा आहे. म्हणून मी आजचा ७० वा वाढदिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुमच्या सोबत साजरा करत आहे.
माझ्या खात्याच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास व्हावा याच माझ्यासाठी शुभेच्छा आहेत. येथील जनतेची प्रगती, श्रीमंती, विकास हेच माझे खरे समाधान आहे’, असे भावपूर्ण उद्गार केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी येथे काढले.
ओरोस येथे ७० व्या वाढदिवसा निमित्त आयोजित अभीष्टचिंतन सोहळ्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे बोलत होते. ते म्हणाले, ‘तुमच्या प्रेमामुळेच मी आज मोठा झालो. या प्रेमातून उतराई होण्यासाठी मला संधी द्या. माझ्या खात्याचा फायदा तुम्ही करून घ्या.
दरडोई उत्पन्नात देशात महाराष्ट्र आज ६ व्या क्रमांकावर आहे. स्पर्धा केल्याशिवाय विकास होत नाही, असे मानणारा मी आहे. इचलकरंजीचे आमदार आव्हाडे यांच्या सारख्यांमुळेच कोल्हापूर सारख्या जिल्ह्यात दरडोई उत्पन्न वाढले. त्यांचे योगदान पाहा आणि तुम्ही त्यांच्याकडून शिका आणि देशाला, राज्याला योगदान द्या’.
राज्य आणि देश आत्मनिर्भर करण्यासाठी योगदान द्या…
‘माझ्या केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग खात्यामध्ये ६ कोटी उद्योग येतात. या खात्यात ३० कोटी ६.५० लक्ष कोटी रुपये आहेत व राज्याचे बजेट ३ लक्ष कोटी आहे. तुमच्या प्रेमात राजकारण आणणार नाही. माझ्यातली माणुसकी कायम ठेव एवढेच मागणे देवाकडे करतो. गरिबी असल्याने घरी सण – उत्सव माहीत नव्हते. मात्र मी महत्त्वाकांक्षी आहे. त्यामुळे राज्य आणि देश आत्मनिर्भर करण्यासाठी आपले योगदान कायम असावे असे मला वाटते. कार्यकर्त्यांनी पाहिले घर पहावे, नंतर राजकारण, हे मी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून शिकलो, असे राणे यांनी यावेळी सांगितले.
प्रगती संकुचित नको…
प्रगती ही गाडी घेण्यापुरती नको. आपल्यातील कमीपणाचा न्यूनगंड नको, आपली जिद्द कायम ठेवा. गरीब म्हणण्यापेक्षा प्रामाणिकपणा आणि कष्ट, मेहनत याला बुद्धीची जोड दिली तर यश दूर नाही याचे उदाहरण मी स्वतः आहे. आयुष्यात कोणाला घाबरत नाही. काय होईल ते होईल… देवाने ठरवले ते होईल. जे काय जगलो आई – वडिलांची पुण्याई, असेही ना. नारायण राणे म्हणाले.
मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत झाला सोहळा
केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे यांचा ७० वा वाढदिवस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी केक कापून आणि दिवे ओवाळून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी जिल्हाभरातून असंख्य कार्यकर्ते ओरोस येथे उपस्थितीत होते. डोळ्यांचे पारणे फेडणारा हा शानदार वाढदिवस सोहळा ठरला. यावेळी व्यासपीठावर विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर,भाजप प्रदेश उपाध्यक्ष आ. प्रसाद लाड, आ. प्रकाश आवाडे, भाजप प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे, आमदार नितेश राणे, भाजप जिल्हा अध्यक्ष राजन तेली, प्रदेश चिटणीस प्रमोद जठार आदी उपस्थित होते.