मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत दरवर्षी पावसाळ्यात दादर हिंदमाता येथे पाणी साचते. यावर उपाय म्हणून पावसाळी पाणी साठविण्याच्या टाक्या बांधण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे हिंदमाता परिसराला पावसाळी पाणी साचण्याच्या समस्येतून मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल, असा विश्वास पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. तसेच मुंबईत सुरू असलेल्या नालेसफाई कामांची पुढच्या आठवड्यापासून पाहणी करणार असल्याचेही ठाकरे यांनी याप्रसंगी नमूद केले.
मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी रविवारी हिंदमाता येथील पावसाळी पाणी साठविण्यासाठी सेंट झेवियर्स मैदानात बांधण्यात येत असलेल्या भूमिगत पाणी साठवण्याच्या टाकीच्या कामाची पाहणी केली. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘हिंदमाता परिसराच्या भौगोलिक रचनेमुळे जोरदार पावसाप्रसंगी तेथील सखल भागात पाणी साचते. या समस्येवर मात करण्यासाठी महानगरपालिकेने सेंट झेविअर्स मैदानात भूमिगत पाणी साठवण्याच्या टाकीचे बांधकाम हाती घेतले असून हे काम पूर्णत्वाकडे आहे. तसेच या टाकीमध्ये २ कोटी ८७ लाख लीटर पाणी साठवता येणार आहे. त्यामुळे हिंदमाता परिसराला पावसाळी पाणी साचण्याच्या समस्येतून मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल. प्रमोद महाजन उद्यानातही अशाच स्वरुपाची भूमिगत जल धारण टाकी बांधली जात आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
हिंदमाता परिसरातील पावसाळी पाणी साचण्याच्या समस्येवर होणारी उपाययोजना ऐतिहासिक स्वरुपाची ठरणार आहे. कारण जोरदार पावसातही वाहतूक न थांबता सुरू राहण्यास मदत होणार आहे. पंपिंग स्टेशन व भूमिगत जलधारण टाकी यामुळे पावसाच्या पाण्याचा निचरा जलदगतीने होण्यास मदत होत आहे. परिणामी, पूर्वीच्या तुलनेत आता हिंदमाता परिसराला दिलासा मिळाला आहे आणि त्याचा अनुभव सर्वांनी घेतला आहे. मिलन सबवे आणि इतर सखल भागांचाही अभ्यास करून अशा प्रकारची उपाययोजना करण्यात येईल. मुंबईत सुरू असलेल्या नालेसफाई कामांची पुढच्या आठवड्यापासून पाहणी करणार असल्याचेही ठाकरे यांनी या प्रसंगी नमूद केले.