अल्माटी (प्रतिनिधी) : कझाकीस्तानमधील अल्माटी व नूर सुल्तान (अस्ताना) या दोन ठिकाणी नुकतीच मल्लखांबाची कार्यशाळा पार पडली. संदीप वसंत जाधव यांच्या सहकार्याने अल्माटी येथील ‘प्रज्ञा इंस्टिटयूट ऑफ योग’ येथे मल्लखांबाची पहिली तसेच शैक्षणिक राजधानी म्हणून ओळखले जाणारे शहर अस्ताना येथे मल्लखांबची दुसरी कार्यशाळा पार पडली.
कझाखस्तानच्या भारतीय दूतावासातील अधिकारी व स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्राचे संचालक संजय वेदी यांनी कार्यशाळेला भेट दिली व कझाखस्तानमध्ये अनेक ठिकाणी पुरलेला मल्लखांब सुरू करण्याबाबत व दुसऱ्या मल्लखांब विश्व अजिंक्यपद स्पर्धेत कझाखस्तानचा संघ पाठविण्याबाबत चर्चा झाली. दोन्ही वर्गांना कझाखस्तानमधील युवकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. दोनशेहून अधिक स्थानिक युवक-युवती व कझाख मुले-मुली या मल्लखांब प्रशिक्षण शिबिरात सहभागी झाले. विश्व मल्लखांब महासंघाचे संस्थापक संचालक आणि मानद सचिव तसेच श्री समर्थ व्यायाम मंदिराचे प्रमुख प्रशिक्षक उदय देशपांडे त्यांचे दोन राष्ट्रीय मल्लखांबपटू विद्यार्थी रजत कवडे व तमन्ना संघवी ह्यांनी मल्लखांबाचे प्रशिक्षण दिले.
मल्लखांबाच्या पहिल्या विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या निमित्ताने व्हिएतनाम, सिंगापूर, मलेशिया, जपान, जर्मनी, अमेरिका, इंग्लंड, आदि अनेक देशांमध्ये झालेली घोडदौड गेली दोन-तीन वर्षे कोरोनाच्या वैश्विक महामारीच्या संकटामुळे खंडित झाली होती, ती आता पुन्हा नव्या उमेदीने सुरू होत आहे. आफ्रिका खंडातील नायजेरिया व दक्षिण अमेरिका खंडातील उरुग्वे सारख्या छोट्या देशांनीही आता मल्लखांबात रस दाखविला आहे.