Friday, March 21, 2025
Homeमहाराष्ट्रठाणेहनुमान, ओम कबड्डी, शिवशंकर, उजाळा उपांत्य फेरीत

हनुमान, ओम कबड्डी, शिवशंकर, उजाळा उपांत्य फेरीत

श्री विठ्ठल क्रीडा मंडळ पुरुष/महिला गट जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा

ठाणे (वार्ताहर) : ओम कबड्डी-कल्याण, शिवशंकर-कल्याण, उजाळा-वळ, भिवंडी, हनुमान-कल्याण यांनी श्री विठ्ठल क्रीडा मंडळ आयोजित जिल्हास्तरीय प्रथम श्रेणी पुरुष स्थानिक गटात उपांत्य फेरी गाठली. महिलांत छत्रपती राजश्री शाहू आणि छत्रपती शिवाजी उपांत्य फेरीत दाखल झाले. संघर्ष मंडळ विरुद्ध छत्रपती शिवाजी आणि छत्रपती राजश्री शाहू महाराज विरुद्ध ज्ञानशक्ती युवा अशा महिलांत, तर उजाळा मंडळ विरुद्ध शिवशंकर आणि ओम कबड्डी संघ विरुद्ध हनुमान मंडळ अशा पुरुषांत उपांत्य लढती होतील. ठाण्यातील लोकमान्य नगर येथील मंडळाच्या क्रीडांगणावर सुरू असलेल्या पुरुषांच्या उपांत्यपूर्व सामन्यात कल्याणच्या ओम कबड्डी संघाने काल्हेर-भिवंडीच्या जय हनुमान मंडळाचा ३८-१३ असा धुव्वा उडवीत आरामात उपांत्य फेरी गाठली. दोन्ही डावात १९-१९असे गुण मिळविणाऱ्या ओम कबड्डी संघाच्या विजयाचे श्रेय जयनाथ काळे, अक्षय भोपी, गिरीश इरणाक यांच्या चढाई-पकडीच्या झंजावाती खेळाला जाते. जय हनुमानाच्या खेळाडूंचा या सामन्यात प्रभाव पडला नाही.

दुसऱ्या सामन्यात कल्याणच्या शिवशंकर मंडळाने नवी मुंबईच्या ग्रीफीन्स जिमखानाचा प्रतिकार ३४-२० असा मोडून काढत उपांत्य फेरीत आगेकूच केली. सुमित साळुंखे, मिहीर पांडे यांच्या चतुरस्त्र खेळाच्या जोरावर शिवशंकरने पहिल्या डावात १६-०८ अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या डावात देखील तोच जोश कायम राखत सामना आपल्या बाजूने झुकविला. ग्रीफीन्स जिमखान्याचा सूरज दुदले एकाकी लढला. वळ-भिवंडीच्या उजाळा मंडळाने ठाण्याच्या आनंदस्मृती मंडळाचा कडवा संघर्ष २८-२७ असा संपवित उपांत्य फेरीत धडक दिली. मिहीर, शुभम व नितेश यांनी चढाई-पकडीचा उत्तम खेळ करीत उजाळाला पूर्वार्धात १७-०९ अशी आघाडी मिळवून दिली होती. शेवटी तीच त्यांच्या कामी आली. उत्तरार्धात आनंदस्मृतीच्या परेश पाटील, सागर पाटील यांनी आपला खेळ गतिमान करीत ही पिछाडी भरून काढली. तरीपण शेवटी विजयासाठी त्यांना २ गुण कमी पडले. शेवटच्या सामन्यात कल्याणच्या हनुमान मंडळाने डोंबिवलीच्या छत्रपती शिवाजी संघाला २८-१७ असे रोखत उपांत्य फेरी गाठली. मध्यांतराला १४-०६ अशी आघाडी घेणाऱ्या हनुमानने उत्तरार्धात देखील तोच धडाका कायम राखत हा विजय साकारला. सुजित हरड, साईराज साळवी, अजय आहेर यांच्या उत्कृष्ट खेळाला या विजयाचे श्रेय जाते. छत्रपती शिवाजी संघाचा शुभम शिर्के चमकला.

महिलांच्या उपांत्यपूर्व सामन्यात छत्रपती राजश्री शाहू संघाने संकल्प मंडळाचा प्रतिकार ५०-३१ असा संपुष्टात आणत उपांत्य फेरीत प्रवेश केला. पहिल्या डावात २७-१२ अशी आघाडी घेणाऱ्या राजश्री शाहू संघाने दुसऱ्या डावात देखील जोशपूर्ण खेळ करीत गुणांचे अर्धशतक गाठले. मेघना खेडेकर, सानिया खाडे, साक्षी हुबळे, स्वरा घोले यांच्या तुफानी खेळाला या विजयाचे श्रेय जाते. संकल्पच्या नीरा सिंघ, साधना व संध्या यादव यांचा खेळ संघाचा पराभव टाळण्यास कमी पडला. दुसऱ्या सामन्यात डोंबिवलीच्या छत्रपती शिवाजी मंडळाने ठाण्याच्या होतकरू मंडळाला ४९-४० असे नमवित आगेकूच केली. स्वप्ना साखळकरच्या आक्रमक खेळाने छत्रपती शिवाजीला पूर्वार्धात २१-१२अशी आश्वासक आघाडी मिळवून दिली होती. उत्तरार्धात होतकरूच्या प्राजक्ता पुजारी, चैताली बोराडे यांनी दमदार खेळ करीत सामन्यात चुरस निर्माण केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -