अनेकदा राजकारणातील आक्रमकता व्यक्तिमत्त्वाबाबत एक वेगळी छटा निर्माण करते. पण,नारायणराव राणे हे मनाने अतिशय कनवाळू आहेत. त्यांच्यातील माणुसकीचे, संवेदनशीलतेचे अनेकांचे अनुभव आहेत. गरजूला मदत करण्याची त्यांची आपली एक शैली आहे. मैत्रीला प्राधान्य देणारे हे व्यक्तिमत्त्व आहे.
देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते, विधानसभा, महाराष्ट्र
केंद्रीय मंत्री नारायणराव राणे! हे एक नाव नाही तर झंझावात आहे, निर्धार आहे. एखादी गोष्ट मनावर घेतली, तर ते तडीस नेण्याचे नाव आहे. प्रारंभी मंत्री आणि नंतर मुख्यमंत्री म्हणून त्यांनी अतिशय भरीव कामगिरी केली. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रश्नांची, बारीकसारीक विषयांची त्यांची जाण अतिशय चांगली आहे. अनेकदा नुसते विषय समजून चालत नाही, तर त्याबाबत घेतलेले निर्णय अमलात आणण्याची कलासुद्धा अवगत असावी लागते. नारायणराव राणे यांची प्रशासनावर राहिलेली घट्ट पकड यामुळे त्यांना कधीच हे काम कठीण गेले नाही. कोणताही अधिकारी चुकीची माहिती देण्याची किंवा अमुक एखादी जनहिताची गोष्ट शक्य नसल्याचे त्यांच्यापुढे सांगू शकत नसे. कोकणातील विकासाच्या बाबतीत त्यांनी घेतलेला पुढाकार तर अवर्णनीय आहे. अलीकडेच कोरोनाचे मोठे संकट येऊन गेले. त्यावेळी कोकणात आरटीपीसीआर चाचण्यांचीसुद्धा क्षमता नव्हती. नारायणराव राणे यांनी लगेचच आरटीपीसीआर चाचण्यांची सोय निर्माण केली. कोविड रुग्णालयसुद्धा उभारले आणि नागरिकांसाठी मोठीच सोय करून दिली. नारायणराव राणेंचा संपूर्ण राजकीय प्रवास हा अतिशय संघर्षाचा राहिला आहे. त्यांनी घेतलेले कष्ट आणि राजकारणातील सातत्य यामुळेच आज ते केंद्रात मंत्री आहेत. सतत खंबीर राहायचे आणि डगमगायचे नाही, हा त्यांच्या आयुष्याचा मंत्र राहिला आहे. त्यामुळे राजकारणातील अनेक चढ-उतार त्यांनी लीलया पचविले आणि प्रत्येक वेळी तितक्याच आक्रमकपणे पुढे आले. अनेकदा राजकारणातील आक्रमकता व्यक्तिमत्त्वाबाबत एक वेगळी छटा निर्माण करते. पण नारायणराव राणे हे मनाने अतिशय कनवाळू आहेत. त्यांच्यातील माणुसकीचे, संवेदनशीलतेचे अनेकांचे अनुभव आहेत. गरजूला मदत करण्याची त्यांची आपली एक शैली आहे. मैत्रीला प्राधान्य देणारे हे व्यक्तिमत्त्व आहे. ते आक्रमक आहेत, पण मिश्किलसुद्धा. ते स्पष्टवक्ते आहेत, पण हळवेसुद्धा. एकदा एखादी व्यक्ती राणेंशी मैत्री करती झाली की, मग ती कोणत्याही पक्षात असो, राणेंनी ती मैत्री कायम घट्ट जपली आहे आणि प्रसंगी चौकटीबाहेर जाऊन त्याला मदतसुद्धा केली आहे.
हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पठडीत ते तयार झालेले असल्याने ओठावर एक आणि मनात एक, अशी त्यांची अवस्था कधीही नसते. मग पूर्वीचे ते शिवसैनिक असोत की आताचे भाजप नेते. मला आठवते, आम्ही तरुण आमदार म्हणून राणे नेहमी आम्हाला मदत करीत असत. आमचे प्रश्न, अर्धा तास चर्चा, नागपूर अधिवेशनात त्या भागातील प्रश्न मांडल्यानंतर त्यांची सोडवणूक करण्यासाठी त्यांचा पुढाकार नेहमीच राहत असे. ते सत्ताधारी बाकांवर असोत की विरोधी बाकांवर त्यांच्याकडे जाण्यात कधीही अडचण नसायची. आमच्या विदर्भात आम्ही एखाद्याच्या काम करण्याच्या शैलीला उद्बोधून म्हणतो, यांचे काम कसे, तर ‘एक घाव, दोन तुकडे’. जलद निर्णयप्रक्रियेशी संबंधित हा वाक्प्रचार. राणेसाहेबांचे अगदी तसेच असायचे. काम होणार असेल, तर झटकन झाले पाहिजे आणि नसेल होणार, तर मार्ग शोधला पाहिजे. आर्थिक विषयात त्यांचा हातखंडा. वित्त विभागाचे ज्ञान. मुळात विषयांची साकल्याने माहिती असल्यामुळे त्यांचा प्रशासनात दरारा असतो. काय करायचे आहे, याची नेमकी जाण. ठोस व्हिजन असलेले नेते. राज्यात आमचे सरकार असताना मराठा आरक्षणासंदर्भात अनेक आंदोलने झाली. त्यावेळी प्रत्येक चर्चेत, प्रत्येक क्षणी नारायण राणे यांची अतिशय मोलाची साथ मला लाभली. अतिशय संयमाने त्यांनी प्रत्येक टप्प्यात पुढाकार घेतला. राज्यातील ही अतिशय जुनी आणि प्रलंबित मागणी मला पूर्ण करता आली, त्यात ज्या काही सहकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले, त्यात नारायणराव राणे यांचे नाव मी नेहमी घेतो. आता नारायणराव राणे सत्तरीचा टप्पा गाठ त आहेत. पण आजही त्यांचा उत्साह तरुणांना लाजविणारा आहे. शिवसेनेचे पदाधिकारी, मुंबई महापालिकेत नगरसेवक, बेस्ट समितीचे अध्यक्षपद, विधानसभा, मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, खासदार आणि नंतर केंद्रीय मंत्री असा त्यांचा प्रवास थक्क करणारा आहे. मी त्यांना वाढदिवसानिमित्त अनेकानेक शुभेच्छा देतो.
त्यांना उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो, अशा सदिच्छा व्यक्त करतो.