अत्यंत अभ्यासू लोकप्रतिनिधी आणि परखड प्रशासक, अशी नारायणराव राणेसाहेब यांची प्रतिमा आहे. कार्यकर्त्यांना ताकद देऊन त्यांच्यात जोश निर्माण करण्याची गरज असते. मोठ्या नेत्यांच्या खांद्यावरच ती जबाबदारी असते. कोकणावर जेव्हा जेव्हा संकट येतेम तेव्हा राणेसाहेब संतप्त होतात. कोकणातील माणसाचे दु:ख आणि वेदनांशी ते एकरूप झालेले आहेत. ते दु:ख त्यांनी अनुभवलेले आहे. म्हणूनच मागच्या पिढीने भोगलेल्या हालअपेष्टा पुढच्या पिढीच्या वाट्याला येऊ नयेत, यासाठी त्यांचे प्रयत्न असतात. कोकणातील अथवा मुंबईतील कोकणी माणसांच्या कोणत्याही कार्यक्रमाला ते जातात तेव्हा तेथील माणसाला स्वाभिमानाने जगण्याचे महत्त्व सांगतात. नोकरी करण्यापेक्षा उद्योजक व्हा, असे सांगून अशा होतकरू तरुणांना त्यांच्या पायावर उभे राहण्याचे केवळ मार्गदर्शन करीत नाहीत, तर तसे बळ त्यांना देतात.
बाळासाहेबांनी मराठी अस्मितेच्या विचारांची पेरणी केली आणि त्यांच्या बेधडक कृतीच्या मशागतीतून नेतृत्वाचे नवीन कोंब निर्माण झाले. पुढे या कोंबांना हिंदुत्वाचे खतपाणी मिळाले आणि ते कणखर झाले. या धुमऱ्यांतून असेच एक कणखर नेतृत्व महाराष्ट्रास पाहावयास मिळाले, त्यांचे नाव नारायणराव राणेसाहेब! सामान्य माणसाच्या हाकेला धावून जाणारे नेते म्हणून त्यांची ख्याती आहे.भावनिक मुद्द्यांच्या जंजाळात न अडकता वास्तवाचे भान ठेवून विकासाच्या दिशेने झेपावण्याची जबरदस्त ताकद त्यांच्यात आहे. एकेकाळी राज्यातील सर्वात मागासलेला जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला दरडोई उत्पन्नात राज्यात प्रगत समजल्या जाणाऱ्या पश्चिम महाराष्ट्राच्या बरोबरीला त्यांनी नेऊन ठेवले. कणखर नेता म्हणून त्यांची ओळख असली तरी तितकेच ते प्रेमळ आहेत. म्हणूनच त्यांचे वर्णन करायचे झाल्यास ‘मेणाहून मऊ आणि वज्राहून कठीण’ असे करता येईल.
युतीच्या काळात त्यांना मुख्यमंत्रीपदाचा अवघा आठ महिन्यांचा कालावधी मिळाला. या छोट्या काळातही सरकारचे नुकसान होईल, असे काहीही चालू दिले जाणार नाही, ही दक्षता त्यांनी कठोरपणे घेतली. दोन रुपयांत झुणका भाकर ही शिवसेनेची अति महत्त्वाकांक्षी योजना होती. पण ही योजना सरकारला तारणारी नव्हे तर बुडवणारी आहे, हे जेव्हा अभ्यासाअंती त्यांच्या लक्षात आले तेव्हा एका फटक्यात त्यांनी ती बंद करून टाकली. झुणका भाकर केंद्रांच्या नावाखाली मर्जीतील कार्यकर्त्यांना टपऱ्या उभारण्यासाठी मुंबईसारख्या शहरात मोक्याच्या ठिकाणी जागा देण्यात आल्या होत्या. झुणका भाकरसाठी सरकारकडून अवाच्या सव्वा अनुदान लाटण्यात येत होते. प्रत्येक टपरीधारकाने सुरुवातीला काही काळ दोन रुपयांत झुणका भाकर विकण्याचे नाटक केले. पण कालांतराने या सर्व केंद्रांवर झुणका भाकरी सोडून शीतपेये आणि अन्य चमचमीत पदार्थांचीच विक्री सुरू झाली. सरकारला या योजनेचे नाटक करून लाखो रुपयाला फसवण्यात येत आहे, हे जेव्हा नारायणराव राणेसाहेबांच्या लक्षात आले, तेव्हा त्यांनी हा खोटा धंदा कायमचा बंद करून टाकला.
प्रथम मुख्यमंत्रीपद आणि त्यापाठोपाठ पाच वर्षे विरोधी पक्षनेतेपद या काळात नारायणराव राणेसाहेब यांनी आपल्या परीने जे काम करून महाराष्ट्राला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, त्याची ग्रामीण महाराष्ट्राला पूर्ण जाणीव आहे. काही वर्षांपूर्वी कोकण म्हणजे मनिऑर्डरवर जगणाऱ्या लोकांचा प्रदेश अशी ओळख होती. उद्योग आणि व्यवसायाचा विचारही कोणी करत नव्हते. माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उद्योगमंत्री नारायणराव राणेसाहेब यांच्या रूपाने या परशूरामाच्या भूमीला एक नवा तारणहार लाभला. त्यांच्या आशाआकांक्षांनी, विकासाच्या ध्येयाने कोकणचा चेहरामोहराच बदलला. कोकणाचा विकास हाच एकमेव ध्यास ठेवून सर्वसामान्यांच्या, विकासाची स्वप्ने पाहाणाऱ्या आणि आकांक्षा ठेवणाऱ्या प्रत्येकाच्या पाठीशी दीपस्तंभासारखे कायम उभे राहिले. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक विकासशील नेतृत्व
म्हणून जनमानसांत त्यांची ओळख आहे.
प्रचारात बाजू आक्रमकपणे मांडण्याचे कौशल्य नारायणराव राणेसाहेब यांच्याकडे आहे. मनात इच्छा, डोळ्यांत स्वप्ने आणि मनगटात ताकद असणारा नेता ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. दांडगा लोकसंपर्क, प्रेमाने समोर येईल त्याला आपुलकीने आलिंगण आणि अंगावर येण्याच्या हेतूने समोर येणाऱ्याला शिंगावर घेऊन फेकून देण्याची ताकद हा त्यांचा स्वभावविशेष आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात स्वत:ची एक वेगळी छाप, हुकूमत असणारा आणि नारायण राणे यांच्या जवळपास पोहोचणारा एक तरी पुढारी कोकणात आहे काय? विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र या तीनही विभागांतील राजकारणाची खडानखडा माहिती असलेला नेता ही त्यांची जमेची बाजू आहे. अत्यंत कार्यक्षमतेने संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. नेत्याने बळ द्यावे, ही गावोगावच्या कार्यकर्त्यांची इच्छा असते, ते बळ नारायणराव राणेसाहेब देतील, याचा प्रत्येकाला विश्वास असतो.
सावंतवाडी शहराच्या नागराध्यक्षपदी पहिल्यांदाच भाजपचा नगराध्यक्ष निवडून आला याचे सर्व श्रेय राणेसाहेबांनाच जाते. या वेळी कार्यकर्त्यांना देखील त्यांनी कायम महत्त्व दिलं आहे. सिंधुदुर्गातील वर्तमानपत्रांत केवळ नारायण राणेसाहेब यांच्याविरोधात ‘स्टेटमेंट करून’ अस्तित्व टिकविण्याची धडपड करणारे, राणेसाहेब यांच्याविरोधात काम करणारे नेते काय म्हणतात याकडे फारसे पाहाण्याची आवश्यकता नाही. कोकणाच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन काम करण्याची कार्यपद्धत, सतत कोकणी माणसाच्या हिताचा विचार करून घेतले जाणारे निर्णय या पद्धतीने काम करणारा दुसरा समर्थ नेता नाही.
– प्रमोद कामत उपाध्यक्ष, सिंधुदुर्ग स्काऊट-गाइड संस्था, सिंधुदुर्ग