Tuesday, April 29, 2025
Homeराजकीयनराचा होतो नारायण...

नराचा होतो नारायण…

‘हतो वा प्राप्स्यसि स्वर्गं जित्वा वा भोक्ष्यसे महीम्
तस्मादुत्तिष्ठ कौन्तेय, युद्धाय कृतनिश्चय:’

भगवान श्रीकृष्णांनी कुरुक्षेत्राच्या रणभूमीवर अर्जुनास केलेल्या या उपदेशाने केवळ अर्जुनच नव्हे, तर त्यानंतरच्या प्रत्येक पिढीतील प्रत्येकास लढण्याची असीम ऊर्जा दिली. “आपल्या ध्येयप्राप्तीसाठी, आपल्या नीतीसाठी आणि आपल्या अस्तित्त्वासाठी लढणे हाच जर एकमेव पर्याय असेल, तर लढलेच पाहिजे. या लढाईत पराभव झाला, तर पुण्य पदरी पडून स्वर्गस्थान प्राप्त होईल. आणि विजय झाला, तर राजयोगाची प्राप्ती होईल. म्हणून, हे अर्जुना, ऊठ. हाती शस्त्र घे आणि युद्धास सज्ज होऊन निर्भयपणे शत्रूच्या अंगावर चाल कर…”

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळातील सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या राजकीय जीवनाचा आढावा घेतला, तर त्यांनीही श्रीकृष्णाच्या या उपदेशाचे पालन करून आपल्या राजकीय जीवनास दिशा दिली असावी, असे दिसते. आपण ज्या मातीत जन्मलो, ज्या मातीशी आपले नाते आहे, त्या लाल मातीच्या, म्हणजे कोकणाच्या आणि कोकण ज्या प्रांतात आहे त्या महाराष्ट्राच्या भल्यासाठी, या राज्याच्या जनतेसाठी काम करायचे, असे अगदी तरुण वयातच ठरवून वयाच्या जेमतेम १६व्या वर्षी राजकारणात पदार्पण केलेल्या नारायण राणे यांच्या राजकीय जीवनातील पाच दशकांहून अधिक काळ याच ध्येयपूर्तीसाठी सत्ता आणि संघर्षाभोवती फिरत राहिला. सत्ता हेच जनसेवेचे साधन आहे, याविषयी स्वतःची ठाम मते असल्याने, सत्तेचे राजकारण करताना काही तडजोडी कराव्या लागल्या, संघर्षही करावा लागला, सन्मानाचे क्षण वाट्याला आले, तसे अपमानाचेही कडवट प्रसंग झेलावे लागले. पण मनाशी निर्धार कायम असला, की अशा प्रत्येक प्रसंगास सामोरे जात, त्या-त्या प्रसंगाचाही मान राखत नारायण राणे नावाचा कोकणाच्या लाल मातीतला हा माणूस, शिवसेनाप्रमुखांचा कट्टर समर्थक, सामान्य शाखाप्रमुखापासून मुंबई महापालिकेतील शिवसेनेचा खंदा नेता, राज्याच्या मंत्रिमंडळातील महसूल मंत्री, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आणि आता केंद्रीय मंत्री अशा टप्प्याने यशाच्या पायऱ्या पादाक्रांत करत राहिला.

तसे पाहिले, तर महाराष्ट्राच्या एकंदर सत्ताकारणात कोकणाची कायमच उपेक्षा झाली. केंद्रात काही काळ मंत्रीपद मिळालेले मधु दंडवते आणि सुरेश प्रभू वगळता, महाराष्ट्राच्या राजकारणावर कोकणाच्या लाल मातीचा ठसा उमटलाच नव्हता. पश्चिम महाराष्ट्राच्या प्रस्थापित राजकारण-वर्चस्वाने कोकणाला सत्ताकारणात कधी शिरकावच करू दिला नव्हता. नारायण राणे यांच्या रूपाने तळकोकणाचे नाव महाराष्ट्राच्या राजकीय नकाशावर उमटले आणि कोकण हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदूही होऊन गेला. आता कोकणाला डावलून महाराष्ट्राचे राजकारणच नव्हे, तर अर्थकारण किंवा विकास योजनादेखील पुढे सरकू शकत नाहीत. कोकणाला प्राप्त झालेली ही किंमत कशामुळे, याचा फारसा कधी विचार कुणी केला नाही, पण थोडा इतिहास पाहिला, तर नारायण राणे यांच्या राजकीय स्थानामुळेच हा बदल झाला, हे मान्य करावेच लागते.

आपल्याकडे मदतीच्या अपेक्षेने येणारा कोणाही विन्मुख परत जाणार नाहीच, पण तो पुन्हापुन्हा आपल्याकडे येत राहील अशा रीतीने माणसे जोडणे हे नारायणरावांनी आपल्या कामातून साधले. आपली सेवा करून घेण्यासाठीच कोकणाच्या लाल मातीने आपल्याला जन्म दिला, असे ते मानतात. त्यामुळेच, सेवेच्या या संधीत कोणतीही त्रुटी राहू नये, याकरिता सत्ता हे साधन आपलेसे करणे व त्यासाठी प्रसंगी शक्य त्या सर्व तडजोडी करणेही त्यांनी कधी नाकारले नाही. कोकणातील गावागावांतील लोकांमध्ये मिसळणं, त्यांच्याशी गप्पा मारणं, या सुरुवातीच्या पक्ष रुजविण्याच्या काळातील क्लृप्त्यांचा पुढे कोकणात बस्तान बसविण्यासाठी राणे यांना चांगलाच उपयोग झाला. आणि कोकणी माणसं त्यांचा आदरही करू लागली.

नारायण राणे या नावाभोवती अनेक चर्चा व इतिहासाची वलये आहेत. राजकारणात वावरताना आजवर त्यांना अनेकदा अनेक आरोपांना सामोरे जावे लागले. पण त्यांच्या कोकणनिष्ठ राजकारणामुळेच कोकणातील विकासाची दारे खुली झाली, हा इतिहास कोणीच नाकारणार नाही. कोकणाचा कॅलिफोर्निया होईल तेव्हा होवो, पण किमान जगण्यासाठी ज्याला मुंबईचाच रस्ता धरावा लागत होता, त्या कुटुंबांना किमान रोजगाराच्या संधी मिळतील एवढ्या विकासाची बीजे कोकणात रुजू लागली. आज लाल मातीत वैद्यकीय महाविद्यालय झाले, विमानतळही झाला आणि आंबा-काजूला कोकणाबाहेरची बाजारपेठ मिळू लागल्याने हाती खुळखुळणाऱ्या पैशातून सामान्य माणूसही आपल्या गावातल्या आई-बापांना विमानातून मुंबई दाखवू शकला.

नारायण राणे यांचे जीवन हा मानवी जडणघडणीच्या परिवर्तनशीलतेचा एक चमत्कार आहे, हे त्यांचे चरित्र वाचताना जाणवते. या पुस्तकात त्यांनी आपल्या राजकीय वाटचालीअगोदरच्या जीवनाचा आढावा घेतला आहे. तारुण्याच्या कैफातील नाऱ्या नावाच्या एका तरुणाचे झालेल्या चुकांमधून शिकत, पुढे स्वतःमध्ये परिवर्तन घडविणे, हे तपश्चर्येहून वेगळे नसते. राणे यांच्या आयुष्यातील ‘नाऱ्या ते नारायणराव, जनतेच्या विश्वासाचा दादा.. हे परिवर्तन म्हणजे अशा तपश्चर्येचा एक प्रदीर्घ अध्याय आहे. कर्मभूमी मुंबई किंवा दिल्लीहून कोकणाच्या वाटेवर ये-जा करताना रस्तोरस्ती गप्पांचे फड झोडत टवाळक्या करणारी निरुद्योगी तरुणांची टोळकी बघून या नारायणरावांचे रक्त खवळून उठायचे. तो वाया गेलेला ‘नाऱ्या’ पुन्हा दिसू लागायचा आणि या तरुणांनी ‘नाऱ्या’ होऊ नये, त्यांचा ‘नारायण’ व्हावा याकरिता काही केले पाहिजे म्हणून नारायणराव सतत विचार करत राहायचे. कोकणाच्या विकासाची विविध स्वप्ने याच प्रवासात त्यांनी पाहिली आणि रोजगारक्षम उद्योग उभारून, कोकणाच्या तरुणास मुंबईसमोर हात पसरण्याची वेळ येऊ नये, यासाठी गावाच्या परिसरातच काही केले पाहिजे यासाठी अभ्यास सुरू झाला.

आता केंद्रातील मंत्रिपदामुळे कोकणच्या विकासाचे मार्ग अधिक सुसह्य होतील, असा त्यांचा विश्वास आहे. विमानतळ, मेडिकल कॉलेज, गोव्याला लाजविणाऱ्या निसर्गाचे संवर्धन आणि रोजगाराभिमुख विकास ही त्यांची त्रिसूत्री आहे. या त्रिसूत्रीनुसार कोकणाचा विकास झाला, की आपली कारकीर्द आणि सत्तेच्या राजकारणासाठी खाल्लेले सारे टक्केटोणपेदेखील सुफळ झाले, असे ते मानतात. आज त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी शुभेच्छा देणे हेच त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य ठरेल.

विनोद तावडे (लेखक भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय महासचिव आहेत)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -