मुंबई (प्रतिनिधी) : आयपीएलच्या साखळी फेरीत रविवारी (१० एप्रिल) माजी विजेता कोलकाता नाइट रायडर्सची गाठ दिल्ली कॅपिटल्सशी पडेल. या लढतीद्वारे फॉर्मात असलेल्या श्रेयस अय्यर आणि कंपनीला रोखण्याचे आव्हान रिषभ पंत आणि सहकाऱ्यांसमोर आहे. कोलकाताने १५व्या हंगामात चारपैकी तीन सामने जिंकून अव्वल चार संघांमध्ये स्थान राखले आहे. सलामीला गतविजेता चेन्नई सुपर किंग्जला हरवून यंदाच्या मोसमाची दिमाखात सुरुवात करणाऱ्या नाइट रायडर्सना बंगळूरु रॉयल चॅलेंजर्सविरुद्ध सातत्य राखता आलेले नाही. मात्र पराभवातून बोध श्रेयसच्या नेतृत्वाखालील संघाने पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्सवर मात करताना दमदार पुनरागमन केले.
दिल्लीला तीन सामन्यांत सलग दोन पराभव पाहावे लागले. मुंबई इंडियन्सना हरवण्यात त्यांना यश आले तरी गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध काहीच चालले नाही. त्यामुळे प्रतिस्पर्ध्यांना सलग तिसऱ्या विजयापासून रोखताना विजयी मार्गावर परतण्यासाठी दिल्लीचा कस लागेल. कोलकाताकडून आंद्रे रसेल आणि वेंकटेश अय्यरला फलंदाजीत थोडे फार चांगले योगदान देता आले आहे. मात्र, फलंदाजी उंचावण्यासाठी कर्णधार श्रेयससह अनुभवी अजिंक्य रहाणे, नितीश राणा यांना फॉर्ममध्ये परतावे लागेल. बॉलिंगमध्ये मध्यमगती गोलंदाज उमेश यादवने नऊ विकेट घेत बऱ्यापैकी प्रभाव पाडला आहे.
त्याला वेगवान गोलंदाज टिम साउदीची चांगली साथ लाभली आहे. मात्र, ऑफस्पिनर सुनील नरिन, मध्यमगती वरुण आरोन यांना अधिक प्रभावी मारा करावा लागेल. दिल्ली कॅपिटल्सची सर्व आघाड्यांवर वाताहत झाली आहे. तीन सामन्यांनंतर एकाही बॅट्समनला अर्धशतकी मजल मारता आलेली नाही. सर्वाधिक नाबाद ४८ धावा ललीत यादवच्या आहेत. गोलंदाजीतही चायनामन स्पिनर कुलदीप यादवच्या ६ विकेट सर्वाधिक आहेत. त्यामुळे कोलकात्याला सलग तिसऱ्या विजयापासून रोखायचे असेल, तर कर्णधार रिषभ पंत, पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर या आघाडीच्या फलंदाजांसह अक्षर पटेल, शार्दूल ठाकूर, मुस्तफिझुर रहमान खेळ उंचवावा लागेल.
ठिकाण : ब्रेबॉर्न स्टेडियम, मुंबई वेळ : दु. ३.३० वा.