शैलजा गायकवाड यांनी मराठीसोबतच हिंदी चित्रपटासाठीदेखील हेअर स्टाईलिस्ट म्हणून काम केले आहे. बादशाहो चित्रपट, देवदाससाठी तसेच वेबसीरिज सिक्रेट मॅनसाठी देखील काम केले आहे.
प्रियानी पाटील
सुरुवातीला एक हौस म्हणून एक करिअरच्या दृष्टीने सुरू केलेला पायाभूत पार्लरचा कोर्स हा पायाभूत न राहता जेव्हा कलेचे उत्तुंग शिखर गाठणारा ठरला तेव्हा कलेच्या प्रांगणात हेच करिअर दिमाखाने उजळले आणि विविध क्षेत्रांतील नामवंत कलाकारांच्या सान्निध्यात वावरताना कलेलाही उत्तम वाव देता आला. मेक-अप, हेअर स्टाइल हे सारं आता अगदी किरकोळ वाटत असलं तरी गेल्या २०-२५ वर्षांपूर्वी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि नाव देणारं असंच होतं.
विरारच्या ब्यूटीशियन शैलजा गायकवाड या आज नावाजलेल्या हेअर स्टाइलिस्ट म्हणून समाजात वावरत आहेत. सिनेक्षेत्रात त्या गेली ३० वर्षे उत्तम हेअर स्टाईलिस्ट म्हणून नावाजलेल्या आहेत.
सुप्रसिद्ध मेकअपमन पंढरी जुकर यांनी जेव्हा शैलजा यांना मेकअप करताना पाहिले, तेव्हा या हातात काहीतरी निश्चितच जादू आहे हे ओळखले. आणि त्यांना सिने क्षेत्रात पदार्पण करण्यास भाग पाडलं. हेअर स्टाइलिस्ट, मेकअपमन म्हणून काम करताना आतासारख्या मशीनरीज तेव्हा नव्हत्या. त्यामुळे हातांनी हेअर स्टाइल करताना बरीच मेहनत घ्यावी लागायची. वेगवेगळी हेअर स्टाइल करताना कलाकारांना त्यांच्या भूमिकांप्रमाणे त्यांच्या सौंदर्याला वाव देताना शैलजा यांचे कसब पणाला लागले आणि पंढरी जुकर यांचे मार्गदर्शन, त्यांच्यासोबत काम करतानाचा अनुभव शैलजा यांच्या पुढील करिअरसाठी उत्तम साथ देणारा ठरला. त्यातूनच त्यांना कोकाकोला, विमसारख्या जाहिरातींसाठी मॉडेलच्या हेअर स्टाइल्सचे काम त्यांना मिळाले.
हळूहळू सिनेक्षेत्र खुणावू लागले. आपल्याकडील कौशल्य पणाला लावून शैलजा यांनी या क्षेत्रात केलेले पदार्पण त्यांना उत्तम संधी देणारे ठरले. त्यानंतर ईटीव्हीवर जॉब मिळाला. तिथे विविध मालिकांच्या कलाकारांचे हेअर स्टायलिस्ट म्हणून काम करण्याची संधी मिळाली. स्टुडिओमध्ये काम करताना बऱ्याच कलाकारांच्या हेअर स्टाइल केल्या. सिद्धार्थ जाधव, पॅडी कांबळे त्याचबरोबर सुलेखा तळवलकर, स्पृहा जोशी, विविध सिने, मालिकांमधील कलाकारांच्या हेअर स्टाइल करताना तिथेच फार काळ रमल्याचे शैलजा सांगतात.
डान्ससाठी क्रांती रेडकर, हेमलता वणे आदींच्याही हेअर स्टाइल त्यांनी केल्या आहेत. त्यानंतर हिंदी चित्रपटासाठीदेखील हेअर स्टाइल केली आहे. बादशाहो चित्रपट, देवदाससाठी देखील शैलजा यांनी काम केले आहे. वेबसीरिज सिक्रेट
मॅनसाठी काम केले आहे.
गेली दोन वर्षे लॉकडाऊनमुळे कामावर तीव्र वाईट परिणाम झाल्याचे शैलजा यांनी सांगितले. अनेकदा हेअर स्टाइल करताना साधी सोपी हेअर स्टाइल करणं वेगळं ठरतं, तर अनेकदा काही कलाकारांना विग लावताना जरा कष्टाचं काम असतं. कारण विग लावताना ओरिजनल केस पूर्ण जेलने सेट करावे लागतात. केस जेलने पॅक करून त्यावर नेट लावून, त्यावर विग लावावा लागतो. पूर्वीच्या हेअर स्टाइल आणि आताच्या हेअर स्टाइलमध्ये खूप फरक असल्याचे शैलजा सांगतात. कारण आता अनेक मशीनरीजचा वापर केला जातो. तेव्हा क्लीपच्या सहाय्याने स्टाइल करावी लागायची. साध्या बटा काढतानासुद्धा हाताने त्या सेट करूनच मात्र आता जेल मशीनरीजच्या वापरामुळे स्टाइल बऱ्याच अंशी सोपी झाल्याचे त्या सांगतात.
या क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन अलीकडे वाढला आहे. त्यामुळे प्रचंड प्रमाणात तरुणाईचा कल या क्षेत्रात दिसून येतो. त्यामुळे जुनी माणसं जरी दुर्लक्षिली गेली, तरी त्यांच्या हाताची जादू नाकारता येणार नाही, हेही तितकेच खरे आहे, हे शैलजा यांचे कर्तृत्व पाहून लक्षात येते. देवदास या चित्रपटावेळी माधुरीची मेहंदी काढण्याचा सुवर्णयोग आल्याचे त्या सांगतात. त्यांचे पर्सनल हेअर स्टायलिस्ट होते. त्यामुळे त्यांच्यासमवेत असलेल्या बाकी मॉडेलचे हेअर स्टाइल यावेळी करण्याचा योग आल्याचे शैलजा सांगतात.
आजवरची ३० वर्षे या क्षेत्रात रमल्यानंतर आता जरा विसावा घ्यावा, असे वाटू लागल्याचे शैलजा सांगतात. पण हा विसावा म्हणजे त्यांच्या कार्य कर्तव्याला, करिअरला पूर्णविराम नाही, तर त्यांचे एक पार्लर आहे, तिथे अनेक मुली शिकत आहेत. मेकअप, फॅशन, हेअर स्टाइल्स, मेहंदी कोर्स, विवाहाच्या ऑर्डर्स अनेक गोष्टी यातून सुरू असतात. त्यामुळे सिनेक्षेत्र, मालिकांच्या माध्यमातूनही जेव्हा वेळ मिळतो तेव्हा तिथे वेळ देऊन आजवरची वाटचाल पुढे चालू ठेवावी, असे शैलजा यांनी ठरवले आहे. पण यातूनच एक मोठी अॅकॅडमी स्थापन करण्याचे आपले स्वप्न असल्याचे शैलजा यांनी सांगितले. त्यांच्या स्वप्नपूर्तीचे उद्दिष्ट पूर्ण होवो हीच सदिच्छा!